शुक्रवार, २० मे, २०१६

नेत्रदान चळवळीचा 'सदिच्छादूत'


तुला पाहते रे तुला पाहते तुझी मूर्त माझ्या उरी राहते तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते.. गाण्यातील कविकल्पना ही भव्य आणि उदात्त असली तरी वास्तवात मात्र चित्र फार वेगळे आहे. भारतात आज सुमारे सव्वा कोटी लोक अंध आहेत. हे अंधत्व काहीना काही कारणाने आलेले असले तरी यातील सुमारे ३० लाख लोकांना पारपटल रोपणाने दृष्टी प्राप्त होऊ शकते. इतक्या लोकांना दृष्टी प्राप्त करून द्यायची असेल तर वर्षांला किमान एक ते दीड लाख लोकांचे मरणोत्तर नेत्रदान होणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने भारतात अवघ्या २५ ते ३० हजार व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान होत आहे. गेली ३५ वर्षे तळमळीने आणि ध्येयाने मरणोत्तर नेत्रदान प्रसाराचे कार्य करणारे ठाण्याचे श्रीपाद आगाशे यांनी या वास्तवाकडेच दृष्टी ठेवून आपले कार्य सुरू केले.

नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर आगाशे यांच्या नेत्रदान चळवळीच्या प्रचार आणि प्रसाराला अधिक वेग आला. मरणोत्तर नेत्रदान चळवळीचे ते ‘सदिच्छादूत’ झाले आहेत. या सगळ्या कामाची सुरुवात १९८१ मध्ये झाली. अणुशक्ती खात्यातील नोकरीच्या निमित्ताने आगाशे हे १९७१ ते १९९१ या कालावधीत चेन्नईजवळील कल्पाकम येथे वास्तव्यास होते. १९८० च्या सुमारास ‘रीडर्स डायजेस्ट’मधील एक लेख त्यांच्या वाचनात आला आणि त्यांची ‘दृष्टी’ बदलून गेली. श्रीलंकासारखा छोटा देश फक्त भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला डोळे पुरवतो, अशी माहिती त्या लेखात होती. ते वाचून आगाशे अस्वस्थ झाले. भारतापेक्षा कितीतरी पटीने लहान असणारा देश नेत्रदान चळवळीत इतके मोठे काम करू शकतो आणि आपण त्या तुलनेत कुठेच नाही, या लाजिरवाण्या वास्तवाने ते बैचैन झाले. नेत्रदानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी चेन्नईजवळील एगमोर येथील नेत्ररुग्णालय व नेत्रपेढीला भेट दिली. तेथील डॉक्टर्स व तज्ज्ञांशी बोलून हा विषय समजून घेतला. पुस्तके वाचून अभ्यास केला आणि याच विषयावर काम करण्याचे नक्की केले. नोकरीत असताना शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी त्यांनी हा विषय जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अर्थात नोकरीमुळे या कामावर काही मर्यादा होती. १ जानेवारी २०११ मध्ये आगाशे सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी पूर्णपणे या कामाला वाहून घेतले.

‘नेत्रदान एक राष्ट्रीय गरज’ या विषयावर त्यांनी मुंबई, ठाणे परिसर तसेच राज्यभरातही विविध ठिकाणी सुमारे अडीचशे व्याख्याने दिली आहेत. विविध ठिकाणी भरणारी प्रदर्शने, ग्राहक पेठा यातही आगाशे सहभागी होतात. येथे भेट देणाऱ्या लोकांपर्यंत पत्रके वाटप करून आणि त्यांच्याशी संवाद साधून आगाशे हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवितात. त्यासाठी आगाशे यांनी मराठीसह हिंदी, इंग्रजी आणि गुजराथी भाषेत नेत्रदान चळवळीविषयीची माहिती देणारी पत्रके छापून घेतली आहेत. नेत्रदान प्रचाराचे काम करत असताना त्यांना बऱ्या-वाईट अनुभवांना नेहमीच सामोरे जावे लागते. काही मंडळी आगाशे यांच्या कामाचे तोंडदेखले कौतुक करतात आणि आपल्यावर प्रसंग आला की नातेवाईक काय म्हणतील, रूढी, परंपरा यांचा विचार करून नेत्रदानाचे पाऊल मागे घेतात. खरे तर मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांची नेत्रदानात महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे त्यांनी अशा प्रसंगी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आगाशे सांगतात. मरणोत्तर नेत्रदान चळवळीत सुशिक्षित मंडळींपेक्षा कमी शिकलेल्या आणि अशिक्षित लोकांचा अधिक सहभाग आहे. तसेच स्त्रियांची संख्याही खूप मोठी असल्याचे निरीक्षण ते नोंदवितात.

मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला असेल तरच नेत्रदान करता येते आणि तसा अर्ज भरला नसेल तर नेत्रदान करता येत नाही, असा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये पसरला असल्याकडेही ते लक्ष वेधतात. खरे तर तसे काहीही नाही. एखाद्या व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला नसला तरीही त्याच्या मृत्यूनंतर जवळच्या नातेवाईकांनी ठरविले तर ते जवळच्या नेत्रपेढीला नुसता एक दूरध्वनी करून मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात. मृत्यूनंतर एक किंवा दोन तासांतच नेत्रदान केले पाहिजे असे सांगितले जाते, पण त्यात तथ्य नाही. सहा तासांपर्यंत नेत्रदान होऊ शकते. काही दिवसांच्या बालकांपासून ते ८० ते ९० वर्षांपर्यंतच्या वृद्ध व्यक्तींचे नेत्रदान केले जाऊ शकते. डोळे काढून घेतल्यानंतर पूर्ण डोळ्याचे रोपण केले जात नाही तर डोळ्यातील पारपटलाचे रोपण केले जाते. अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे डोळे दान करण्याची परवानगी स्थानिकपोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या अधिकारात देऊ शकतात. पण पोलिसांनाही या विषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे पोलिसांचेही प्रबोधन करणे आवश्यक आहे.

सर्व खासगी किंवा शासकीय रुग्णालयांतून रुग्णाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याच्या जवळच्या नातेवाईकांकडून एक अर्ज भरून घेतला जातो. त्यात शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, अशी एक अट असते. दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाला तर रुग्णाचे नेत्रदान करण्याविषयीची एक अटही त्या अर्जात टाकली तर नेत्रदानासाठी आणि अंधांना दृष्टी मिळवून देण्यासाठी त्याचा खूप फायदा होऊ शकेल, याकडेही आगाशे लक्ष वेधतात. अनेक सामाजिक संस्था, धार्मिक किंवा आध्यात्मिक गुरूंकडून लोकांचे मरणोत्तर नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले जातात. पण केवळ अर्ज भरून घेणे उपयोगाचे नाही. संबंधित व्यक्तीला ‘डोनर कार्ड’ मिळेल व सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केलेली आहे ना, याचीही खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आगाशे आवर्जून सांगतात. मरणोत्तर नेत्रदानाच्या प्रचाराबरोबरच गेल्या काही वर्षांपासून आगाशे मरणोत्तर अवयवदान तसेच त्वचादान याचाही प्रचार करत आहेत. आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाचे ते आजीव सदस्य आहेत. आगाशे यांच्या पत्नी पुष्पा तसेच अनिल आणि आशीष ही दोन्ही मुलेही त्यांच्या परीने या कामात आगाशे यांना मोलाची मदत करत असतात.

श्रीपाद आगाशे- ९९६९१६६६०७

(पूर्वप्रसिद्धी-लोकसत्ता ठाणे/ २० मे २०१६/ सेकंड इनिंग सदर/ पान क्रमांक ७

सोमवार, ९ मे, २०१६

'मंचविशी प'मध्ये रमलेल्यांसाठी... -चंद्रशेखर गोखले यांचा नवा काव्यसंग्रह


कविता किंवा गाणे कसे सुचते/स्फुरते, असा प्रश्न कवी किंवा गीतकाराला विचारला तर तो त्याच्यापरिने त्याचे उत्तर देतो.त्या कशा सुचतात याबाबतचे प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असू शकते.आपल्यापैकीही अनेकांनी विशिष्ट वयात किंवा विशिष्ट वेळी/प्रसंगात कविता केल्याही असतील. कविता किंवा आपल्याला जे व्यक्त करायचे आहे ते शब्दात मांडणे महत्वाचे. साधे-सोपे शब्द वाचकांच्या मनाचा ठाव घेतात, त्यांना ती कविता भावते.त्यांच्या कविता दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्या अमाप लोकप्रिय होतात, इतकेच नव्हे तर त्या कवीसारख्या कविता लिहिणारे अनेक नवीन कवी तयार होतात. तो काव्यप्रकार मराठी साहित्यात रुजतो. हे भाग्य २५/३० वर्षांपूर्वी चंद्रशेखर गोखले या कवीला लाभले. त्यांनी सादर केलेला 'चारोळी' हा काव्यप्रकार नवीन होता. गोखले यांनी फक्त चार ओळींमध्ये आपल्या मनातील भावना ताकदीने व्यक्त करण्याचे आव्हान आणि कसब 'मी माझा'च्या निमित्ताने पेलून दाखवले आणि संपूर्ण महाराष्टात 'मी माझा' हा काव्यसंग्रह आणि चारोळी हा काव्यपप्रकार लोकप्रिय झाला.

'मी माझा' नंतर गोखले यांचे 'पुन्हा मी माझा', 'मी नवा', 'माझे शब्द', 'माझ्या परीने मी' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. आता गोखले यांचा 'मंचविशी प' हा नवा काव्य/चारोळी संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. 'मी माझा'हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित करण्याबाबत गोखले यांनी काही प्रकाशकांशी संपर्क साधला होता. पण त्यांनी 'मी माझा' नाकारला आणि शेवटी गोखले यांनी 'मी माझा' स्वत;च प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला, त्यांनी तो प्रकाशितही केला व 'मी माझा'ने इतिहास घडविला. हिंदी, गुजराथी व इंग्रजी भाषेतही त्याचा अनुवाद झाला असून 'ब्रेल लिपी'तही 'मी माझा' प्रकाशित झाले आहे. खरे तर 'मी माझा'च्या ही अगोदर रॉय किणीकर यांचा 'उत्तररात्र'हा चार ओळींची कविता असलेला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. पण दुर्देवाने तो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. पण आपल्याही अगोदर चारोळी हा काव्यप्रकार किणीकर यांनी सादर केला होता, असे गोखले आवर्जून सांगतात.

गोखले यांच्या नव्या काव्यसंग्रहाचे शीर्षकच ते कोणत्या वयोगटातील व्यक्तींसाठी आहे, हे सांगते. त्यांनी काव्यसंग्रहाच्या अर्पण पत्रिकेतही 'जे जे आपल्या मंचविशीपमध्ये मनापासून रमलेत त्यांच्यासाठी' असे लिहिले आहे. पण असे असले तरी जे मनाने तरुण आहेत त्या सगळ्यांसाठी हा नवा काव्यसंग्रह आहे.

'मंचविशी प'ची सुरुवात
कितीदा तो तिच्या आधी येऊन बसायचा आणि कितीदा ती गेल्यावर तो तिथेच बसलेला दिसायचा या चारोळी ने केली आहे.

चारोळ्या वाचतांना पुढे

त्या दोघांतला संवाद असाच असायचा जरा वेळाने वाळूत चार रेघोट्या दिसायच्या

मनात एक असतं आणि ओठावरती भलतंच नंतर कितीही म्हटलं जाऊ दे तरी मनातलं मनात सलतंच

असं पाहू नकोस सगळं माहित असल्यासारखं तुला हवं असलेले उत्तर माझ्या डोळ्यांत दिसत असल्यासाऱखं

तुला काय शब्द ओठांत धरता येतात आणि कधी काजळासारखे डोळयांत भरता येतात

या आणि इतर चारोळ्या वाचकांसमोर येतात.

काव्यसंग्रहाच्या शेवटी

रंगाचा इवलासा टिळा तू लावून गेलास बंद दारावर आणि त्याचा नाजुकसा ठसा उमटला माझ्या उरावर ही चारोळी आहे.

अवघ्या ३२ पानांच्या या छोटेखानी (पॉकेट साईज आकारातील) पुस्तकात २९ चारोळ्या आहेत. एक चारोळी पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिली आहे. या सर्व चारोळ्या मनाचा ठाव घेणाऱया आहेत. चारोळ्या वाचतांना प्रत्येकालाच ती चारोळी म्हणजे आपला स्वतचा अनुभव वाटेल. मलपृष्ठावर दिलेल्या चारोळीत

डोळे भरुन आले की तुझं रुप कसं दिसायला लागतं छे, ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी हलक्या हातानी कुणी पुसावं लागतं

असे गोखले सहजपणे सांगून जातात आणि ते आपल्यालाही पटते.

@शेखर जोशी --------------------------------------

चंद्रशेखर गोखले यांचा ई-मेल आयडी

chandrashekhargokhale18@gmail.com