मंगळवार, १५ एप्रिल, २०२५
पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी 'मोक्षकाष्ठ'
रविवार, १४ एप्रिल, २०२४
'शबरी शिधा' देऊन उभारली प्रेमाची गुढी!
![]() |
| नंदुरबार तालुक्यातील एका आदिवासी महिलेला शिधा देण्यात आला |
'शबरी शिधा' देऊन उभारली प्रेमाची गुढी!
महाराष्ट्राच्या वनवासी/ आदिवासी भागात शबरी सेवा समिती गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहे. यापैकी 'शबरी शिधा' हा उपक्रम गेली पाच वर्षे राबविण्यात येत असून गुढीपाडव्याच्या दिवशी धुळे जिल्ह्यातील भिलटपाडा, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तसेच ठाणे जिल्ह्यातील जव्हार, वाडा, विक्रमगड येथील ४६५ कुटुंबांना दोन महिने पुरेल इतका शिधा देण्यात आला. या सर्व घरी गुढीही उभारण्यात आली.
![]() |
| धडगाव तालुक्यातील वयोवृद्ध, एकाकी महिलेस शिधा देण्यात आला. सोबत शेजारी आणि देवीसिंग पाडवी हे कार्यकर्ते |
येथील आदिवासी/ वनवासी कुटुंबांची हलाखीची परिस्थिती आहे. राहण्यासाठी जिथे धड घरही नाही तिथे दररोजच्या जेवणाची आणखीनच भ्रांत. राज्य शासनाकडून गहू, तांदूळ व अन्य काही वस्तू या आदिवासी/वनवासी कुटुंबांना शिधावाटप दुकानात मोफत मिळतात. पण त्याहीपेक्षा अधिक काही वस्तू शबरी सेवा समितीकडून या कुटुंबांना मोफत दिल्या जातात. यात तुरडाळ, मुगडाळ, तेल, काही कडधान्ये, बेसन, रवा,पोहे, शेंगदाणे, गुळ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. काही ठिकाणी आवश्यकता असेल तर कपडेही दिले जातात, अशी माहिती शबरी सेवा समितीचे संस्थापक प्रमोद करंदीकर यांनी दिली.
![]() |
| पिंपळोद येथील केशाबाई वळवी यांना शबरी शिधा देण्यात आला |
गेली पाच वर्षे कोणतीही शासकीय आर्थिक मदत न घेता हा उपक्रम सुरू आहे. राजकीय पक्ष/ नेते यांच्याकडूनही मदत घेण्यात येत नाही. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, सर्वसामान्य नागरिक यांच्या आर्थिक मदतीतून शबरी सेवा समितीचे विविध उपक्रम राबविले जातात. या गुढीपाडव्याला ४६५ कुटुंबांना जो सर्व शिधा देण्यात आला त्यासाठी आनंदकुमार गाडोदिया यांनी आर्थिक मदत केली होती. आता सुमारे दोन महिन्यांनतर या कुटुंबांना पुन्हा शिधा देण्यात येईल. शिधा देताना त्या कुटुंबांची गरज, आवश्यकता याचाही विचार केला जातो, असेही करंदीकर यांनी सांगितले. आपली पत्नी रंजना, शबरी सेवा समितीचे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, देणगीदार या सर्वांच्या सहकार्याने आमची वाटचाल सुरू आहे, असेही करंदीकर म्हणाले.
काही आणू नकोस, पण पुन्हा भेटायला नक्की ये...
![]() |
| भिलटपाडा येथील ताराबाई यांच्यासाठी जेवण तयार करताना प्रमिला |
धुळे जिल्ह्यातील आणि शिरपूर तालुक्यातील भीलटपाडा येथील एक अनुभव डोळ्यात पाणी आणणारा आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध असणा-या ताराबाई पवार यांच्या घराची अवस्था पाहून शबरी सेवा समितीच्या कार्यकर्त्या प्रमिला सायसिंग यांना हुंदका आवरता आला नाही. ताराबाई जिथे राहात होत्या त्या जागेला घर तरी कसे म्हणावे, अशी अवस्था होती. अक्षरशः उकिरडा झाला होता. प्रमिला यांनी ताराबाई यांचे घर आणि आजुबाजूचा परिसर स्वच्छ केला. प्रमिला यांनी गरम गरम स्वयंपाक केला व ताराबाईंना जेवण वाढले. त्यांच्या घरासमोर गुढी उभारली आणि त्यांना शबरी शिधा दिला. प्रमिला यांनी ताराबाई यांचा निरोप घेतला तेव्हा ताराबाई म्हणाल्या, पुन्हा भेटायला ये,पण काही आणू नको. मला म्हातारीला काय लागते? पण भेटायला मात्र ये. हो, अगदी नक्की परत येईन, असे सांगून प्रमिला यांनी ताराबाईंचा निरोप घेतला आणि त्या पुढच्या घराकडे निघाल्या.
शेखर जोशी
१४ एप्रिल २०२४
प्रमोद करंदीकर
शबरी सेवा समिती
संपर्क
+91 99205 16405
शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३
अवयवदान जनजागृती उद्यान
अवयव दान ही काळाची गरज असून याविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण झाली तर अनेक जीव वाचविण्यास मदत होणार आहे. अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच भविष्यात अशा स्वरूपाचे उद्यान राज्यातील इतर शहरात महापालिका आणि नगरपरिषदेतर्फे सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हे उद्यान कम्युनिटी पार्क, पोखरण रोड नं २, येथील सहा हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अवयवदान संदर्भातील माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रस्तावित उद्यानात मूत्रपिंड (किडनी), यकृत ( लिव्हर), हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे आतडे, डोळे, त्वचा, हाडे, हात या अवयवाच्या आणि पेशींच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसेच या अवयवांसंदर्भातील माहिती त्याठिकणी मोठ्या फलकावर लावण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
अवयवदानासंदर्भातील शास्त्रीय स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उद्यानात अवयव दान करण्याचा प्रतिज्ञा अर्ज नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना हा अर्ज भरायचा आहे त्यांच्याकडून तेथेच भरून घेण्यात येऊन तो अर्ज नोंदणीकरिता राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्थेच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदान करून ८ व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत आहे. मात्र मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.
सध्या राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण प्रतिक्षेत आहेत. ही आकडेवारी पुढीलप्रमाणे
मुत्रपिंड प्रत्यारोपण - ५,८३२, यकृत प्रत्यारोपण- १,२८४,
हृदय प्रत्यारोपण– १०८, फुफ्फुस प्रत्यारोपण – ४८, स्वादुपिंड प्रत्यारोपण – ३५, छोटे आतडे प्रत्यारोपण – ३
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...




.jpg)



