सोमवार, २१ एप्रिल, २०२५

ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे

ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे ही छायाचित्रे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील आहेत. छायाचित्रे पाहताक्षणी ती मेट्रो रेल्वेच्या कामाची आहेत असे वाटेल. पण नाही. ही छायाचित्रे आहेत डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसराला जोडणा-या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जाणाऱ्या अर्धवट बांधकामाची. ठाकुर्ली उड्डाणपुल नव्याने बांधला तो आत्ता जेवढ्या रुंदीचा आहे त्यापेक्षा अधिक रुंद व मोठा असायला हवा होता. मुळात तो पुढील २५/ ५० वर्षांचा विचार करून बांधायला हवा होता तसा बांधला गेला नाही. पुन्हा काही वर्षांनी तो पाडून नवा बांधण्यासाठीच असा बांधला असावा असा 'अर्थ' असावा.
याच पुलाची एक बाजू ( डोंबिवली पश्चिमेकडून पूर्वेकडे येताना डावीकडची आणि डोंबिवली पूर्व भागातून पश्चिमेला येताना उजवीकडची) आज वर्षानुवर्षे तशीच अर्धवट अवस्थेत आहे. ही बाजू ठाकुर्ली पूर्व स्थानकापर्यंत आणण्यात आलेली आहे. आधी असे सांगितले गेले होते की ही बाजू/ उड्डाणपुल थेट पत्रीपुलाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवलीहून कल्याणला आणि कल्याणहून डोंबिवलीला लांबचा फेरा न घेता अवघ्या काही मिनिटांत जाता येईल. पण म्हणे माशी शिंकली. या मार्गात एक वसाहत ( झोपडपट्टी) आडवी येत होती. ती हटविल्याशिवाय पुलाचे बांधकाम पुढे सरकणार नव्हते. अजूनही ती जागा मोकळी झालेली नाही.
हे एक बरे असते. सर्वपक्षीय राजकारण्यांनी गळ्यात गळे घालून रेल्वे मार्गाचा आजुबाजूचा भाग, रेल्वे किंवा शासकीय यंत्रणांच्या मालकीच्या मोकळ्या जागा हेरून तिथे अनधिकृत बांधकामे उभी करायची. इतकी वर्षे झाली म्हणून नंतर ती नियमित करायची. किंवा काही विकास कामे करायची असली की अनधिकृत बांधकामे तोडायला विरोध करायचा, पुनर्वसन झालेच पाहिजे म्हणून आंदोलने करायची. हे सर्व नीट मार्गी लागले तर ठिक. नाहीतर प्रकल्प रखडला किंवा खर्च वाढला. ठाकुर्ली उड्डाणपुलाचा कल्याणला जाण्याच्या मार्गातील हा अडथळा आता दूर झाला आहे असे म्हणतात. पण तसे झाले असले तरी आता ही अर्धवट राहिलेली बाजू ठाकूर्लीला ९० फूट रस्त्यावर उतरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. अर्धवट असलेली ही बाजू आधीप्रमाणे कल्याणला पत्रीपुलापर्यंत न्यायची म्हटली तरी ते कठीण होणार आहे. कारण या मार्गात आता ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पुर्व पश्चिम जोडणारा पादचारी पूल व सरकता जिना बांधण्यात आला आहे‌. त्यामुळे हे बांधकाम आधी पाडावे लागेल. आणि तसे केले तर यावर केलेला खर्च वाया जाईल. आणि म्हणूनच ही बाजू आता ठाकुर्ली ९० फूट रस्त्यावर उतरविण्यात येणार आहे, असे म्हणतात.
अर्थात आजच्या ( २१ एप्रिल २०२५) तारखेपर्यंत तरी कामाच्या बाबतीत काही हालचाल असल्याचे दिसले नाही. स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या अन्य महत्त्वाच्या कामातून वेळ मिळाला तर कदाचित ते या अनेक वर्षे रखडलेल्या कामात लक्ष घालतील. किंवा कडोंमपाची निवडणूक आली की मतं मिळवण्यासाठी पुन्हा या कामाचे ढोल पिटतील, आम्ही काहीतरी काम करतोय असे दाखविण्याचे नाटक करतील. बघू या... शेखर जोशी २१ एप्रिल २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: