शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

शाश्वत विकासासाठी सात्त्विकता आणि धर्माचरण आवश्यक

शाश्वत विकासासाठी सात्त्विकता आणि धर्माचरण आवश्यक
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय,‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या संशोधनातील निष्कर्ष
नवी दिल्ली, दि. ११ एप्रिल प्राचीन भारतीय धर्मशास्त्रांतील ‘सात्त्विकता’, धर्माचरण, भारतीय गायीचे महत्त्व आणि नामजप हेच खर्‍या अर्थाने शाश्वत विकासाचे मुख्य घटक आहेत.असा निष्कर्ष महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मांडण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्रामीण आर्थिक परिषदे’त(‘रूरल इकॉनॉमिक फोरम’मध्ये) हा निष्कर्ष मांडण्यात आला. शॉन क्लार्क यांनी हे सादरीकरण केले.‌
केवळ पर्यावरणपूरक तंत्रज्ञान नव्हे,तर अध्यात्मिक शुद्धतेवर आधारित विचारसरणीशिवाय मानवी जीवन आणि पृथ्वीचे भविष्य सुरक्षित राहणार नाही, असेही सादरीकरणात सांगण्यात आले.‌महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आतापर्यंत ११८ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले असून त्यापैकी १४ परिषदांमध्ये ‘सर्वोत्तम सादरीकरण’ पुरस्कार मिळविले आहेत.
औद्योगिक क्रांतीपासून आजवर विकासाच्या मार्गात पर्यावरणाचा विचार फारसा झाला नाही. ‘शाश्वत विकास’ ही संकल्पना वर्ष १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत मांडली गेली खरी; पण ५० वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही. आजच्या पर्यावरणीय संकटांची कारणे मानवी मनोवृत्तीत असलेल्या असात्त्विकतेत आहेत. म्हणूनच ‘विकास’ ही केवळ भौतिक संकल्पना न राहता ती आध्यात्मिकदृष्ट्याही सात्त्विक असली पाहिजे, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.
आंघोळीच्या पाण्यात गोमूत्राचे काही थेंब घातल्यावर व्यक्तीच्या देहातील सप्तचक्रे ६५ ते ७८ टक्के संतुलितरित्या कार्यरत होतात, तर गोमूत्राचे काही थेंब प्राशन केल्यावर ती ९० टक्के संतुलितरित्या कार्यरत होतात. गायीच्या उपस्थितीमुळे परिसरातील सकारात्मक स्पंदने २२ टक्क्यांनी वाढतात. गोमूत्राच्या वापरातून त्वचारोगावर आणि आरोग्यावर सकारात्मक होतात, असे ‘जीडीव्ही बायोवेल’ या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या एका प्रयोगात दिसून आले आहे.
अनेक विकार आणि व्यसनाधीनता यांचा उगम अध्यात्मिक कारणांमुळे असतो हे संशोधनातून अधोरेखित झाले. ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपामुळे व्यसनमुक्ती, मानसिक स्थैर्य आणि प्रारब्धजन्य विकारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते.३ महिने नियमितपणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यामुळे २० वर्ष जुना एक्झिमा (त्वचा रोग) फक्त नामजपाने बरा झाल्याचे उदाहरण या वेळी देण्यात आले.
अध्यात्मशास्त्रानुसार सध्या जगात पर्यावरणातील पालट आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम टाळण्यासाठी केले जाणारे उपाय हे वरवरचे आहेत. जगात असात्त्विकता वाढल्याने त्याचा विपरित परिणाम संपूर्ण विश्वाच्या हवामानाचे संचलन करणार्‍या पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर होतो. वातावरणातील सात्त्विकता वाढवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे साधना, असल्याचे मतही या वेळी मांडण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ