मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव?

राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव? शेखर जोशी राज्य शासनाने म्हणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला होता.‌ हाच का तुमचा राज्य महोत्सव... पुण्यात विसर्जन मिरवणूक ३५ तास, छातीत धडकी भरविणा-या डीजेच्या भींती, अचकट विचकट गाणी व अश्लील नृत्य, ढोल ताशांचा दणदणाट ( दोन/चार ढोल ताशे वादक असतील तर एकवेळ समजू शकतो, ढोल ताशा वादकांची पथके च्या पथके. पारंपरिक असले तरी एका मर्यादेपलीकडे त्याचाही त्रासच होतो), लेझर दिवे आणि धांगडधिंगा.‌(काही अपवाद वगळता) पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात काही अपवाद वगळता सर्वत्र हेच चित्र होते. स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय निर्लज्ज,कोडग्या लोकप्रतिनिधींचाच वरदहस्त या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर असल्याने वेगळे काय होणार? तुम्ही काहीही करा, सर्वसामान्य सुजाण व सुसंस्कृत नागरिकांना कितीही बोंबलू द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, या मानसिकतेमुळे ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व त्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोकावले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला खरा. पण उत्सवाचे विकृतीकरण आणि बाजारीकरण होणार नाही, हे ही राज्य शासन आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पाहायला हवे होते.‌ पण राज्यात काही सन्माननीय अपवाद वगळता कुठेही दिसले नाही. सोलापूरमध्ये शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडते तर राज्यात इतर ठिकाणी ते का होत नाही? रस्ता अडवून, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे भव्य मंडप उभारून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे हा हट्ट कशासाठी? शहरातील बंदिस्त सभागृह, मंगल कार्यालय याठिकाणी गणपती बसवणार असाल तर आणि तरच सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी दिली जाईल, याची कठोरात कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सत्ताधारी राज्यकर्ते आणि विरोधक यांनी धाडस दाखवले पाहिजे. डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली अनेक वर्षे त्यांचा गणेशोत्सव सुयोग मंगल कार्यालयात साजरा करत आहेत. मंडळाची गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणूकही पारंपरिक पद्धतीने निघते.फटाके, डीजेजा वापर नसतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे सदानकदा फडणवीस, शिंदे यांच्यावर तोंडसुख घेत असतात. टोमणेगिरी करतात. पण या प्रकरणी त्यांची अळी मिळी गूप चिळी आहे. अर्थात लोकानुनय न करता प्रसंगी कटू निर्णय घेऊन सत्ता राबवायची असते. शिवसेना एकसंघ असताना शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मुंबईतील गणेश मूर्तींच्या उंचीवर मर्यादा आणण्यासाठी महापौर असताना प्रयत्न सुरू केले होते. खरे तर पक्षप्रमुख आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या त्यांच्या या नातवाने महापौर डॉ. राऊळ यांना पाठिंबा देऊन हा विषय धसास लावायला हवा होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेत तर शिवसेनेचेच बहुमत होते, सत्ताही होती. पण उद्धव ठाकरे यांनी कच खाल्ली आणि धमक दाखवली नाही. मतपेढीवर डोळा ठेवून सद्गुण विकृती असलेले मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, चमकेश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी याची गंभीर दखल घेऊन कायदा धाब्यावर बसविणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई, शिक्षा केली पाहिजे. आम्ही अमूक करू, तमूक करु, कायद्याची अंमलबजावणी करू, यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी तोंडपाटीलकी न करता प्रत्यक्ष व ठोस कारवाई झाली असल्याचे लोकांना दिसू द्या. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा काळ सोकावत चालला आहे. शेखर जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: