सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

'एक प्रभाग एक गणपती' काळाची गरज

'एक प्रभाग एक गणपती' काळाची गरज शेखर जोशी दहीहंडी, गणपती, नवरात्र या सर्व उत्सवातील पावित्र्य, मांगल्य लोप पावले आहे. हे उत्सव आता इव्हेंट झाले असून सर्वपक्षीय राजकारण्यांनी त्यावर कब्जा केला आहे. गल्ली ते राज्य पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांसाठी तो मनी, मसल पॉवरचा खेळ झाला आहे. या सर्व उत्सवांचे झालेले विकृतीकरण आणि बाजारीकरण थांबविण्यासाठी आता 'एक प्रभाग एक गणपती' ही काळाची गरज बनली आहे. कटू वाटला तरी लोकानूनय न करता कठोरात कठोर निर्णय घेऊन ते कागदावर न राहता, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, ते पाहिले पाहिजे.‌ फटाके, डीजे, लेझर बंदी फक्त कागदावरच राहिली असून नियम, कायदा धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने सर्व काही सुरू आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर कोणतेही मंडळ असो ती मिरवणूक रात्री दहा वाजता संपलीच पाहिजे. फटाके, डीजे, लेझर बंदी म्हणजे बंदीच हवी. जी मंडळे याचे उल्लंघन करतील त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कायद्यानुसार गुन्हा दाखल करून मंडळाला जबरदस्त आर्थिक दंड ठोठावला पाहिजे. किमान एक तरी उदाहरण समोर आले तर कदाचित या बेबंद वागण्याला आळा बसेल.
उंचच उंच मूर्तींची स्पर्धा, रस्ते अडवून, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे मंडप उभारून, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत अचकट विचकट गाणी, अश्लील नृत्य, छातीत धडकी भरेल आणि कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्या आवाजातील डीजे, लेझर दिवे म्हणजेच गणपती उत्सव हे रूढ होत चालले आहे. आगमन आणि विसर्जन मिरवणुकींना वेळेचे बंधन, भान जराही राहिलेले नाही. निवासी परिसर, रुग्णालये परिसरातही छातीत धडकी भरेल आणि कानठळ्या बसतील अशा आवाजात मिरवणूक काढली जाते. आपल्यामुळे इतरांना त्रास होतो, ही गोष्ट मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही जाणवत असणारच. पण आमचे कोणी, काही वाकडे करू शकत नाही, अशा माजात वर्षानुवर्षे हे सुरू आहे. दहीहंडी, गणपती, नवरात्र उत्सवाचे विकृतीकरण, बाजारीकरण झाले आहे.‌ सण/ उत्सवातील हे बाजारीकरण, विकृतीकरण, मनी व मसल पॉवरची स्पर्धा म्हणजे हिंदुत्व, असे केले म्हणजेच सण/ उत्सव साजरे करणे नाही, सुजाण, सुसंस्कृत आणि सारासार विचार करण्यारे याच्याशी नक्कीच सहमत असतील.
खरे तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा महापालिका क्षेत्रात 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविली पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अर्थात हे स्वप्नच आहे. निगरगट्ट आणि कोडगे सर्वपक्षीय राजकीय नेते हे कधीच होऊ देणार नाही. 'पार्टी विथ डिफरन्स' असे स्वतःला म्हणवून घेणाऱ्या भाजपने, मुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधींनी तरी किमान एक वर्ष तरी आपापल्या कार्यक्षेत्रात, मतदार संघात, शहरात 'एक प्रभाग एक गणपती' हा उपक्रम राबवून दाखवावा.‌
खरे तर घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणपती मूर्तीची उंची अनुक्रमे दोन फूट आणि पाच इतकीच असली पाहिजे. रस्ते अडवून, पादचारी व वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे मंडप उभारून सार्वजनिक दहीहंडी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव बंदच झाले पाहिजेत. 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविली पाहिजे. प्रभागातील शाळा, महाविद्यालय किंवा खासगी सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे. मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणली की हे करणे सहज शक्य आहे. अर्थात हे सर्व करण्यासाठी तळमळ, आच असायला हवी. लोकानुनय न करता कटू निर्णय घेऊन ते राबविण्याची धमक आणि त्याला पाठिंबा देण्याची तयारी अनुक्रमे सत्ताधारी आणि विरोधकांनी दाखवली पाहिजे. अर्थात निगरगट्ट आणि कोडग्या सर्वपक्षीय राजकारण्यांकडून ही अपेक्षा बाळगणे म्हणजे स्वप्नरंजनच आहे. शेखर जोशी ८ सप्टेंबर २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: