सांस्कृतिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सांस्कृतिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १९ जून, २०२५

प्रयोगात्मक कलांच्या अभ्यासासाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीत संशोधन केंद्र

प्रयोगात्मक कलांसाठी पु.ल. देशपांडे कला अकादमीत शाहीर साबळे यांच्या नावाने संशोधन केंद्र - सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड आश‍िष शेलार यांची घोषणा मुंबई, दि. १९ जून महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कलांचे सखोल संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागातर्फे पु.ल. देशपांडे कला अकदामीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड. आश‍िष शेलार यांनी गुरुवारी येथे केली. या केंद्राला शाहीर साबळे यांचे नाव देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत ॲड. शेलार बोलत होते.‌सांस्कृतिक कला संचनालयाचे संचालक बिभीषण चवरे, संबंधित अध‍िकारी, लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे यावेळी उपस्थ‍ित होते. महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कला हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ज्या कलांमध्ये महाराष्ट्राच्या जढणघडणीचे ऐतहास‍िक संदर्भ दडलेले आहेत. त्यांचा उलगडा करुन संशोधन व अभ्यास होण्याची गरज आहे. त्यासाठी हे संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे ॲड. शेलार म्हणाले.

बुधवार, ११ जून, २०२५

'पु.ल. कट्टा' दर शुक्रवारी पुन्हा रंगणार

पु ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा 'पु.ल. कट्टा' दर शुक्रवारी पुन्हा रंगणार - पुलंच्या स्मृतीदिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई, दि. ११ जून 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर उद्या (१२ जून) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमापासून 'पु.ल.कट्टा' हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. यापुढे हा उपक्रम दर शुक्रवारी अकादमीच्या खुल्या रंगमंचावर रंगणार असून राज्यभरातील सर्व कलाकारांना आपापली कला या रंगमंचावर सादर करण्याची संधी मिळणार आहे. १२ जून रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत होणा-या कार्यक्रमात गायक शार्दूल कवठेकर, गायिका अदिती पवार , संवादिनी वादक प्रणव हरिदास, तबला वादक सौरभ शिर्के, अभिवाचक अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी, डाॅ कविता सोनावणे, नृत्यांगना राधिका जैतपाळ आणि डॉ. शिरीष ठाकूर हे कलाकार सहभागी होणार आहेत.‌ पुलंच्या साहित्यकृतीवर आधारित हा कार्यक्रम असून तो सर्वांसाठी खुला आहे.

सोमवार, २६ मे, २०२५

डोंबिवलीकर रमले 'अक्षरांच्या बागेत'!

डोंबिवलीकर रमले 'अक्षरांच्या बागेत'! -निनाद आजगावकर आणि सहकारी यांची भावसंगीत मैफल -तीन पिढ्यांनी सादर केली 'टाळ मृदंगाची धून' डोंबिवली, दि. २६ मे स्वरनिनाद आणि संगीतज्ञानानंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'अक्षरांच्या बागेत' या मराठी भाव संगीताच्या मैफलित डोंबिवलीकर मंत्रमुग्ध झाले. गायक निनाद आजगावकर आणि सहकारी गायकांनी अविट गोडीची सुरेल मराठी गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे ज्येष्ठ गायक व संगीतकार वसंत आजगावकर, त्यांचे सुपुत्र निनाद, निनाद यांच्या कन्या नीरजा या तीन पिढ्यांनी 'आली कुठुनशी कानी साद टाळ मृदुंगाची धून' हे अजरामर गाणे सादर केले. सर्वेश सभागृहात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मराठी भावसंगीताच्या सुवर्ण काळातील एकाहून एक अविट गाणी निनाद आजगांवकर, डॉ. शिल्पा मालंडकर आणि नीरजा आजगांवकर यांनी सादर केली. मिलिंद परांजपे ( कीबोर्ड), तुषार आग्रे (तबला), मनीष भुवड (हँडसॉनिक) यांनी संगीत साथ केली तर रश्मी आमडेकर यांनी निवेदन केले. ज्येष्ठ गायक वसंत आजगावकर कार्यक्रमास उपस्थित होते. श्रोत्यांच्या आग्रहावरून त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले. कवी सोपानदेव चौधरी यांनी लिहिलेले आणि स्वतः आजगावकर यांनी संगीतबद्ध केलेले व गायलेले 'आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाची धून' हे अजरामर गाणे स्वतः आजगावकर, निनाद, नीरजा या तीन पिढ्यांनी सादर केले. उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आपली दाद दिली. मराठी भावसंगीतात अमूल्य योगदान देणारे गीतकार, संगीतकार यांची लोकप्रिय तसेच अपरिचित गाणी कार्यक्रमात सादर करण्यात आली.

गुरुवार, ८ मे, २०२५

डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण

डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ ते ११ मे या कालावधीत संपूर्ण गीतरामायण सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष असून कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. धनंजय भोसेकर संपूर्ण गीतरामायण सादर करणार असून कार्यक्रमाचे निवेदन भोसेकर यांच्या पत्नी देवयानी भोसेकर यांचे आहे. धनंजय भोसेकर यांच्या भगिनी नीला सोहनी, त्यांचे पती प्रमोद सोहनी हे अनुक्रमे संवादिनी व तबल्याची तर व्यंकटेश कुलकर्णी तालवाद्य साथ करणार आहेत. सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असून ९ व १० मे रोजी रात्री साडेआठ आणि ११ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. धनंजय भोसेकर यांच्या वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल दिला जाणारा 'सदगुरू चंद्रकांत अनंत भोसेकर सेवाव्रती पुरस्कार' यंदाच्या 'पै फ्रेण्ड्स लायब्ररी'चे संस्थापक पुंडलिक पै यांना प्रदान करण्यात येणार आहे. तीन दिवस अनुक्रमे प्रा.डॉ. विनय भोळे, प्रा. डॉ शुभदा जोशी आणि अजित करकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या दैनंदिन विनामूल्य प्रवेशिका सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली पूर्व येथे तिकीट खिडकीवर कार्यक्रमाच्या आधी एक तास उपलब्ध होणार आहेत.

बुधवार, ७ मे, २०२५

संगीतकार अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर

संगीतकार अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर मुंबई, दि. ७ मे संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा 'कृतज्ञता गौरव पुरस्कार'ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि रोख ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष असून पुरस्कार वितरण सोहळा येत्या १० मे रोजी संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल व पौडवाल कुटुंबीयांच्या उपस्थितीत उत्तरा केळकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पार्श्वगाय जी. मल्लेश, संगीतकार राम कदम,यशवंत देव, प्रभाकर जोग,दत्ता डावजेकर,अशोक पत्की,संगीत संयोजक श्यामराव कांबळे, तालवादक जयसिंग भोई, प्रमोद साने, संतूर वादक - उल्हास बापट, गीतकार जगदीश खेबुडकर,शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर,भावगीत गायक अरुण दाते आणि अन्य मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उत्तरा केळकर यांच्या गायन कारकिर्दीला ५३ वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी १२ विविध भाषांमध्ये ४२५ हुन अधिक चित्रपटांसाठी तर साडेसहाशेहून अधिक ध्वनीफिती,सीडी तसेच अनेक लघुपट, जाहिरातींसाठी पार्श्वगायन केले आहे.

गुरुवार, १ मे, २०२५

कार्टूनिस्ट्स कंबाईनतर्फे मुंबईत व्यंगचित्र संमेलनाचे आयोजन

कार्टूनिस्ट्स कंबाईनतर्फे मुंबईत व्यंगचित्र संमेलनाचे आयोजन मुंबई, दि. १ मे जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त कार्टूनिस्ट्स कंबाईनतर्फे येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईत व्यंगचित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी १९८३ मध्ये कार्टूनिस्ट्स कंबाईन संस्थेची स्थापना केली होती. मराठी व्यंगचित्रकारांची ही अखिल भारतीय संघटना आहे. यंदाचे व्यंगचित्र संमेलन ओला वाकोला हॉल, सांताक्रूझ (पूर्व) येथे होणार असून शिवसेना नेते सुभाष देसाई हे विशेष अतिथी म्हणून संमेलनास उपस्थित राहणार आहेत. व्यंगचित्र प्रदर्शन,व्यंगचित्र स्पर्धा,व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिकासह व्याख्याने,परिसंवाद या संमेलनात होणार आहेत. रसिक प्रेक्षकांना आपले स्वतःचे व्यंगचित्रही संमेलनात काढून घेता येणार आहे. या संमेलनात शंभर वर्षापूर्वीचीही दुर्मिळ व्यंगचित्रेही पाहता येणार आहेत. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत व्यंगचित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.कार्टूनिस्ट्स कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, शिवसेना आमदार संजय पोतनीस,ओला वाकोलाचे संदेश चव्हाण यांनी या संमेलनाचे आयोजन केले आहे.‌

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळे यांना जाहीर

व्ही.शांताराम, राज कपूर जीवन गौरव आणि लता मंगेशकर पुरस्कार जाहीर - महेश मांजरेकर,अनुपम खेर,भीमराव पांचाळे काजोल देवगण,मुक्ता बर्वे मानकरी मुंबई, दि. १७ एप्रिल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारे व्ही.शांताराम, राज कपूर जीवन गौरव आणि लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.‌सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. पुरस्कारांचे वितरण येत्या २५ एप्रिल रोजी एन.एस.सी.आय. डोम, वरळी येथे होणार आहे. या वर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. १० लाख रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे याचे स्वरूप आहे्‌.चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना जाहीर झाला असून ६ लाख रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल देवगण यांना जाहीर झाला आहे.दोन्ही पुरस्कार अनुक्रमे १० लाख रुपये व ६ लाख या रकमेचे आहेत. १९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. १० लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र असे याचे स्वरुप आहे. संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे येत्या २० एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे खास सांगीतिक मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमात सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य सन्मानिका शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर देण्यात येणार आहेत, असेही ॲड.शेलार यांनी सांगितले.

रविवार, ५ मार्च, २०२३

'वसंत' ऋतूचे संगीत

 

संगीतकार वसंत प्रभू 

‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला’, ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’, ‘कळा ज्या लागल्या जिवा’, ‘चाफा बोलेना’, ‘जेथे सागरा धरणी मिळते’, ‘जन पळभर म्हणतीतल हाय हाय’, ‘मानसीचा चित्रकार तो’, ‘राधा कृष्णावरी भाळली’ ही आणि अशी अनेक अवीट गोडीची गाणी संगीतबद्ध करणारे संगीतकार वसंत प्रभू यांचे जन्मशताब्दी वर्ष या वर्षीच्या जानेवारी (१९ जानेवारी) पासून सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने...

पी. सावळाराम यांनी लिहिलेल्या ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’ या गाण्याने इतिहास निर्माण केला. पुणे रेल्वे स्थानकावर एका नवविवाहित मुलीची सासरी पाठवणी करताना आईच्या डोळ्यांत अश्रू होते. आईने मुलीची ‘सासरी सुखी राहा, डोळ्यात पाणी आणू नको’अशा शब्दांत समजूत काढली. पी. सावळराम हे त्या प्रसंगाचे एक साक्षीदार होते. प्रतिभावान सावळाराम यांनी त्या प्रसंगाला डोळ्यांसमोर ठेवून ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा’ हे गाणे लिहिले. लता मंगेशकर यांच्या आर्त स्वरातील या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक निर्माण केला. त्या काळात तर गाजलेच, पण आजही प्रत्येक मराठी लग्न या गाण्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आचार्य अत्रे यांनी या गाण्याचे कौतुक करताना ‘गंगा जमुना हे गाणे एका पारडय़ात आणि इतर सगळी गाणी दुसऱ्या पारडय़ात टाकली तरीही ‘गंगा जमुना’चे पारडेच जड होईल’ असे म्हटले होते. संगीतकार वसंत प्रभू, कवी/गीतकार पी. सावळाराम आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्रयीने मराठी भाव व चित्रपट संगीताला अनेक अवीट गोडीच्या गाण्यांची अमूल्य भेट दिली.


साधी व सोपी आणि सहज गुणगुणता येईल अशी चाल हे प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याचे ठळक वैशिष्टय़. संगीतकार अशी ओळख असलेल्या प्रभू यांनी सुरुवातीला हिंदी चित्रपटात ‘बाल अभिनेता’ म्हणून काम केले. वसंत प्रभू यांचे मूळ नाव व्यंकटेश प्रभू. पण हिंदी चित्रपटासाठी हे नाव चालणार नाही म्हणून त्यांचे ‘वसंत’ असे नामकरण करण्यात आले. प्रभू यांनी बाल कलाकार म्हणून पाच हिंदी चित्रपटांत काम केले. १९३८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जमाना’ या हिंदी चित्रपटात प्रभू यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन राम दर्यानी यांचे होते. ‘व्यंकटेश’ हे नाव चित्रपटासाठी योग्य ठरणार नाही म्हणून दर्यानी यांनी व्यंकटेशचे नामकरण ‘वसंत’ असे केले. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत ‘बाल अभिनेता वसंत’ असे त्यांचे नावही देण्यात आले. ‘जमाना’ या चित्रपटाखेरीज प्रभू यांनी ‘मास्टर मॅन’, ‘राजकुमारी’, ‘देखा जाएगा’, ‘जीवनसाथी’ या हिंदी चित्रपटात काम केले होते.


भार्गवराव पांगे हे प्रभू यांचे गुरू. त्यांच्या मेळ्यामधून ते काम करायला लागले. मेळ्यात ते गाणीही म्हणत असत. ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील एक गाणे २४ वेळा म्हटल्यामुळे (वन्समोअर घेत) त्यांचा आवाज फुटला. त्यामुळे त्यांना गाता येईना. त्यामुळे पांगे यांनी त्यांना मोरे नावाच्या गृहस्थांकडे नृत्य शिकायला पाठविले. नृत्य शिकल्यानंतर काही काळ त्यांनी नृत्यशिक्षक म्हणूनही काम केले. त्या काळात वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले ‘अरे पाटलाच्या पोरा जरा जपून’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. प्रभू ज्या मोरे यांच्याकडे नृत्य शिकायला जात होते, त्यांचा मोठा भाऊ कविता करायचा. त्यांनी याच गाण्यासारखे ‘अगं पाटलाच्या पोरी जरा जपून’ हे गाणे लिहिले व त्याला चाल लावायला प्रभू यांना सांगितले. प्रभू यांनी त्याला चालही लावली. ‘एचएमव्ही’ने त्याची ध्वनिमुद्रिका काढली. प्रभू यांची ती पहिली ध्वनिमुद्रिका. ‘पाटलाचा पोर’ हा संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता, 

प्रभू यांनी काही काळ ‘एचएमव्ही’मध्येही संगीत दिग्दर्शक म्हणून नोकरी केली. ‘एचएमव्ही’चे वसंतराव कामेरकर यांनी प्रभू यांच्यातील गुणवत्ता आणि प्रतिभा हेरली होती. ‘एचएमव्ही’मध्ये नोकरी करत असतानाच्या काळातही प्रभू यांच्याकडून अनेक उत्तमोत्तम गाणी तयार केली गेली. प्रभू यांनी सुमारे २५ चित्रपटांना संगीत दिले. भावगीतांप्रमाणेच त्यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटांतील गाणीही गाजली. ‘मानसीचा चित्रकार’ हे वसंत प्रभू यांचे चरित्र/आत्मचरित्र प्रसिद्ध असून ते मधू पोतदार यांनी लिहिले आहे. 

भगवान श्रीकृष्णाने ‘ऋतुनाम कुसुमाकर:’ अशा शब्दात भगवद्गीतेमध्ये वसंत ऋतूचे कौतुक केले आहे. मराठी साहित्यातही अनेक लेखक आणि कवींनी वसंत ऋतूचे वेगवेगळ्या शब्दांत वर्णन केले आहे. हर्षांचा, उत्साहाचा आणि संपूर्ण सृष्टीला नवे रूप देणारा ऋतू म्हणून वसंत ऋतूचे विशेष महत्त्व आहे. मराठी संगीतातही संगीतकार वसंत देसाई, वसंत पवार आणि वसंत प्रभू या तीन ‘वसंत’ नावांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. वेगवेगळ्या प्रकारची अजरामर गाणी देऊन संगीतात ‘वसंत’ऋतू निर्माण केला. १९ जानेवारी १९२४ मध्ये जन्मलेल्या 'वसंत' ऋतूचा ( प्रभू) १३ ऑक्टोबर १९६८ या दिवशी अस्त झाला.‌

 प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली काही लोकप्रिय गाणी 

आली हासत पहिली रात, कळा ज्या लागल्या जिवा, कोकिळ कुहूकुहू बोले, घट डोईवर घट कमरेवर, जो आवडतो सर्वाना, डोळे हे जुलमी गडे, मानसीचा चित्रकार तो, रघुपती राघव गजरी गजरी, राधा कृष्णावरी भाळली, राधा गौळण करिते, रिमझिम पाऊस पडे सारखा, पाहुनी रघुनंदन सावळा, लाजली सीता..सप्तपदी हे रोज चालते, हरवले ते गवसले का, प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला, मधु मागसी माझ्या सख्या परी, सखी शेजारिणी