साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १४ जून, २०२५

समीक्षक आणि नाटककार जयंत पवार स्मृती संमेलन येत्या २२ जूनला मालवण येथे

समीक्षक आणि नाटककार जयंत पवार स्मृती संमेलन येत्या २२ जूनला मालवण येथे मुंबई, दि. १४ जून ज्येष्ठ समीक्षक, कथाकार, नाटककार जयंत पवार स्मृती संमेलन येत्या २२ जून रोजी मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते, नाट्यदिग्दर्शक अनिल गवस यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान-सिंधुदुर्ग आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण- मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे संमेलन मालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उदघाटन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परवडेकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर 'जयंत पवार यांचे कथात्म साहित्य'या विषयावर डॉ. दत्ता घोलप यांचे व्याख्यान होणार आहे. 'जयंत माणूस आणि लेखक, कलावंत' या विषयावर संमेलनाध्यक्ष गवस यांची प्रगट मुलाखतही यावेळी होणार आहे. समाज साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या मराठीतील ७५ कवींच्या 'सृजन रंग' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तसेच निमंत्रित कवी संमेलनही होणार आहे.

गुरुवार, १२ जून, २०२५

अंबरनाथच्या साप्ताहिक आहुतीचे हिरकमहोत्सवी वर्षांत पदार्पण!

अंबरनाथ येथील 'साप्ताहिक आहुती'ने ११ जून रोजी हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले. स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव त्रिवेदी आणि त्यांच्या पत्नी मनोरमाबेन त्रिवेदी यांनी ११ जून १९६६ रोजी 'साप्ताहिक आहुती' सुरू केले. मुंबईच्या मोठ्या वृत्तपत्रात स्थानिक बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळत नाही हा 'आहुती' सुरू करण्यामागील मुख्य उद्देश होता. वसंतराव त्रिवेदी यांचे सुपुत्र गिरीश वसंत त्रिवेदी हे 'साप्ताहिक आहुती' चे संपादक असून त्यांना वडीलबंधू, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. येत्या १ जानेवारी २०२६ रोजी साप्ताहिक आहुतीचा हिरक महोत्सवी वर्धापन दिन विशेषांक प्रकाशित करण्याचा तसेच हिरक महोत्सवी वर्षांत विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय साप्ताहिक आहुतीचे संपादक गिरीश त्रिवेदी यांनी साप्ताहिक आहुतीच्या ताज्या अंकातील संपादकीयात व्यक्त केला आहे.‌ स्थानिक पातळीवर गेली ५९ वर्षं साप्ताहिक प्रकाशित करणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे‌. त्यासाठी साप्ताहिक आहुतीच्या सर्व चमूला शुभेच्छा. हिरकमहोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त अभिनंदन आणि शुभेच्छा. या निमित्ताने साप्ताहिक आहुतीच्या सौजन्याने 'आहुती'च्या संपादकीयचा हा संपादित अंश. अंबरनाथच्या साप्ताहिक आहुतीचे हिरकमहोत्सवी वर्षांत पदार्पण! मुंबई येथील मोठ्या वर्तमानपत्रात स्थानिक बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळत नाही म्हणून साप्ताहिक आहुतीची मुहूर्तमेढ वसंतराव त्रिवेदी यांनी रोवली. सामाजिक बांधिलकी जपत हे साप्ताहिक सुरु आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, अध्यात्मिक अशा विविध उपक्रमांना सचित्र आणि सविस्तर प्रसिद्धी देण्याच्या हेतूनेच आहुतीची सुरुवात करण्यात आली. गेल्या ५९ वर्षात खून, मारामारी, बलात्कार आदी गुन्हे स्वरूपाच्या बातम्या देण्याचे कटाक्षाने टाळले आहे. या पुढेही तेच धोरण राहील. वसंतराव त्रिवेदी यांनी घालून दिलेल्या तत्वानेच आहुतीची वाटचाल अखंडपणे सुरु आहे. गेल्या तब्बल ५९ वर्षांत वाचकांना सकारात्मक आणि चांगलेच द्यायचा प्रयत्न केला आहे. गेल्या ५९ वर्षातील आहुतीची ही वाटचाल एक दिशादर्शक वाटचाल आहे. गेल्या ५९ वर्षात आहुतीने केवळ वृत्तपत्र प्रकाशित करण्याचे काम केले नाही तर अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदि अनेक क्षेत्रात आपले योगदान दिले. साप्ताहिक आहुतीचा वर्धापन दिन साजरा करताना राजकीय, शासकीय वरिष्ठाना निमंत्रित करून त्या त्या परिसरातील समस्यांना वाचा फोडण्याची प्रथा आहुतीने सुरु केली. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर व्हावे यासाठी आहुती आणि त्रिवेदी परिवार सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या प्रयत्नांना आता निश्चित अशी दिशा मिळाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहर हे 'मंदिराचे शहर' अर्थात टेम्पल सिटी करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरु केला आहे. १४० कोटी खर्चाचा प्रस्ताव मंजुर होऊन काम सुरु झाले आहे. अंबरनाथ तालुका व्हावा, प्रशासकीय इमारत उभारून सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावी ही मागणी आहुतीने लावून धरली होती. भ्रमणध्वनी कंपन्यांनी मुंबई महाराष्ट्रातून वेगळी केली आहे ती पुन्हा एक करावी अर्थात मुंबई आणि महाराष्ट्र हे एकच सर्कल असावे यासाठीही आहुतीने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला काही प्रमाणात यश येवून सरकारी बी एस एन एल आणि एम टी एन एल या कंपन्यांनी मुंबई आणि महाराष्ट्र सर्कल एक केले आहे. कल्याण महापालिकेतून अंबरनाथ आणि बदलापूर स्वतंत्र पालिका कराव्यात या मागणीसाठीही आहुतीने योगदान दिले आहे. १४ एप्रिल १९९२ रोजी या दोन पालिका स्वतंत्र झाल्या. कल्याण जिल्ह्याची निर्मिती व्हावी यासाठी सुद्धा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. वेगवेगळ्या विषयावर, वेगवेगळ्या आकारात विशेषांक प्रकाशित करून आहुतिने इतिहास रचलेला आहे. वर्धापन दिन असो वा दिवाळी विशेष अंक असो एक विषय घेवून त्या विषयावर आहुतीने विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्यात "आई", प्राचीन शिवमंदिर विशेष अंक (शिवमंदिर विशेष अंकाच्या दोन आवृत्या प्रकाशित झाल्या.) आहुतीच्या इतिहासात गाजलेला विशेष अंक म्हणजे शिवमंदिर विशेष अंक. १४ जून १९९२ रोजी आहुतीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी शिव मंदिरात जावून दर्शन घेतले त्यावेळी मधुकरराव चौधरी, मनोहर जोशी आदींनी साबिरभाई शेख यांना विचारले की या मंदिराची माहिती देणारी पुस्तिका आहे का ? त्यावेळी सर्वांनी नकारार्थी उत्तर दिले. त्याच वेळी वसंतराव त्रिवेदी यांनी आदेश दिले की आहुतीचा शिवमंदिर विशेषांक प्रकाशित करायचा. त्याची पहिली आवृत्ती ९ मार्च १९९४ रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री' येथे प्रकाशित झाली. शिवमंदिराचा अभ्यास करणाऱ्यांना कमी किमतीत भरपूर माहिती द्यायची याच हेतूने हा अंक अवघ्या पाच रुपयात उपलब्ध करून दिला होता. त्या अंकाच्या प्रती संपल्या नंतर २००९ मध्ये शिवमंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. याचे प्रकाशन २२ ऑगस्ट २००९ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. गो. बं. देगलूरकर, पद्मश्री डॉ. सदाशिव गोरक्षकर, डॉ. कुमुद कानिटकर, सदाशिव टेटविलकर, सदाशिव साठे, लक्ष्मणराव कुलकर्णी अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. शेती, इतिहास, पर्यटन, करोना, उद्योग, प्रशासकीय अधिकारी संधी आणि आव्हाने, कृषी उद्योग, विशेष मुलांच्या व्यथा आणि व्यवस्था आदी विविध विषयावर दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आले आहेत. वृत्तपत्रांमध्ये अलीकडे जी स्पर्धा सुरु आहे ती गुणात्मक स्पर्धा वाटत नसून ती जीवघेणी स्पर्धा वाटत आहे असे वाटते. या पार्श्वभूमीवर एक उदाहरण आहुतीचे द्यावेसे वाटते. साप्ताहिक विवेकने अंबरनाथ शहरावर एक विशेषांक प्रकाशित केला होता. याचा प्रकाशन सोहळा अंबरनाथ शहरात आयोजित करण्यात आला. त्यावेळी "विवेक" साप्ताहिकाचे स्वागत करणारा, त्या चमूची माहिती देणारा आहुतीचा स्वतंत्र विशेषांक प्रकाशित करण्यात आला होता. वृत्तपत्रांनी अथवा पत्रकारांनी एकमेकांचे हेवेदावे न करता एकमेकाना सहकार्य करावे असे वसंतराव त्रिवेदी यांचे मत होते आणि त्याच तत्वाने आजही आहुतीची वाटचाल सुरु आहे. आहुतीचे रौप्य महोत्सवी वर्ष जोरदार साजरे करण्यात आले. १४ जून १९९२ रोजी हा अविस्मरणीय असा सोहळा पार पडला. आहुतीचा सुवर्ण महोत्सवी वर्षारंभ मातृवंदनाने ११ जून २०१५ रोजी करण्यात आला. (साप्ताहिक आहुतीच्या सौजन्याने)

बुधवार, ११ जून, २०२५

'पु.ल. कट्टा' दर शुक्रवारी पुन्हा रंगणार

पु ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा 'पु.ल. कट्टा' दर शुक्रवारी पुन्हा रंगणार - पुलंच्या स्मृतीदिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई, दि. ११ जून 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर उद्या (१२ जून) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमापासून 'पु.ल.कट्टा' हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. यापुढे हा उपक्रम दर शुक्रवारी अकादमीच्या खुल्या रंगमंचावर रंगणार असून राज्यभरातील सर्व कलाकारांना आपापली कला या रंगमंचावर सादर करण्याची संधी मिळणार आहे. १२ जून रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत होणा-या कार्यक्रमात गायक शार्दूल कवठेकर, गायिका अदिती पवार , संवादिनी वादक प्रणव हरिदास, तबला वादक सौरभ शिर्के, अभिवाचक अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी, डाॅ कविता सोनावणे, नृत्यांगना राधिका जैतपाळ आणि डॉ. शिरीष ठाकूर हे कलाकार सहभागी होणार आहेत.‌ पुलंच्या साहित्यकृतीवर आधारित हा कार्यक्रम असून तो सर्वांसाठी खुला आहे.

'उदकशांंत' दीर्घांकाचे शनिवारी कल्याणला सादरीकरण

शरद तळवलकर स्मृती दीर्घांक स्पर्धेतील विजेत्या 'उदकशांंत'चे शनिवारी कल्याणला सादरीकरण - मुलगा गमावलेल्या आई वडिलांच्या भावनिक संघर्षाची कहाणी डोंबिवली, दि. ११ जून शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या 'उदकशांत' या दीर्घांकाचा प्रयोग येत्या १४ जून रोजी रात्री साडेआठ वाजता आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण येथे आयोजित करण्यात आला आहे. हा प्रयोग सशुल्क असून प्रयोगाचा कालावधी सलग एक तास २० मिनिटे इतका आहे. आपला मतीमंद मुलगा आता या जगात नाही हे सत्य मुलाच्या आईने स्विकारले आहे पण मुलाचे वडील ते स्विकारायला तयार नाहीत. मुलाच्या मृत्यूची सावली या दोघांच्याही आयुष्यावर पडली आहे.‌ ही सावली इतकी गडद आहे की ते दोघे सुखाने जगूही शकत नाहीत. या आई-वडिलांच्या भावनिक संघर्षाची कहाणी 'उदकशांत' या दीर्घांकात सादर करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे यंदा पहिल्यांदाच शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत डॉ. समीर मोने लिखित आणि अभिनेते मिलिंद अधिकारी दिग्दर्शित 'उदकशांत' या दीर्घांकाला प्रथम क्रमांक मिळाला. डोंबिवलीच्या तिहाई कलासाधक संस्थेने हा दीर्घांक सादर केला होता. महाराष्ट्रातून एकूण २७ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. 'उदकशांत' दीर्घांकात प्रतिक खिसमतराव, श्रद्धा भालेकर, धनंजय धुमाळ, मिनाक्षी जोशी, देवेश काळे हे कलाकार आहेत.‌ दिग्दर्शशनासह नेपथ्याची जबाबदारी मिलिंद अधिकारी यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजना अनुक्रमे आशुतोष वाघमारे व राजेश शिंदे यांची आहे.
'उदकशांत' मधील जोडप्याचा मतिमंद मुलगा गेल्याला आता एक वर्ष झाले आहे. परंतु ते दोघेही त्याच्या आठवणी विसरू शकत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारे ते दोघेही आपल्या मतिमंद मुलाचे मरण स्विकारायला तयार नाहीत. हा दीर्घांक एका रात्रीतला असला तरी त्याची पार्श्वभूमी त्या जोडप्याच्या पूर्ण आयुष्याचे भोगणे असल्याचे 'उदकशांत' चे दिग्दर्शक व‌ नेपथ्यकार मिलिंद अधिकारी यांनी सांगितले. 'एका कोंडीतून मुक्त होणाऱ्या जोडप्याची गोष्ट', असा प्रवास आपल्याला जाणवला आणि मी त्या पद्धतीने नाटक बसवत गेलो. सर्व कलाकारांची उत्तम साथ मिळाली आणि हा प्रयोग चांगल्या प्रकारे सादर करू शकलो, असेही अधिकारी म्हणाले.‌ शरद तळवलकर स्मृती दीर्घांक स्पर्धेत 'उदकशांत'ने पुढील पारितोषिकेही पटकावली आहेत.‌ दिग्दर्शक (मिलिंदअधिकारी)- प्रथम संगीत (आशुतोष वाघमारे) - प्रथम अभिनेत्री ( श्रद्धा भालेकर) - प्रथम अभिनेत्री (मीनाक्षी जोशी)- तृतीय अभिनेता ( प्रतिक खिसमतराव) - तृतीय

'सहा सरसंघचालक' पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन

'सहा सरसंघचालक'पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन छत्रपती संभाजीनगर, दि. ११ जून प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर लिखित'सहा सरसंघचालक'तसेच प्रा. डॉ. रवींद्र बेम्बरे (देगलूर) यांनी लिहिलेल्या‘नैसर्गिक आपत्तीत मराठी संतांचे मनोविज्ञान’या दोन पुस्तकांचे प्रकाशन येत्या १३ जून रोजी येथे होणार आहे.साहित्यभारती,देवगिरी प्रांत,शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.‌ माजी लोकायुक्त-गोवा व माजी न्यायमूर्ती अंंबादासराव जोशी, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे सहसंघटनमंत्री मनोजकुमार,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा कार्य प्रमुख प्रा. डाॕ. उपेंद्र कुलकर्णी,साहित्य भारतीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बळिराम गायकवाड हे प्रमुख पाहुणे तर देवगिरी प्रांताचे संघचालक अनिल भालेराव हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.'सहा सरसंघचालक' या पुस्तकावर प्रा. डॉ. कैलास अतकरे भाष्य करणार आहेत.‌ हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता दामूअण्णा दाते सभागृह, डॉ. हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.‌

मंगळवार, १० जून, २०२५

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक वामन देशपांडे यांचे निधन

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक वामन देशपांडे यांचे निधन डोंबिवली, दि. १० जून संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक वामन देशपांडे यांचे मंगळवारी सकाळी डोंबिवलीत एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशपांडे यांच्यावर डोंंबिवलीत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्यांची अखेरचा श्वास घेतला. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दैनंदिन ज्ञानेश्वरी, दैनंदिन दासबोध, संत तुकाराम आदी धार्मिक विषयांवर तसेच कविता, भावगीते, भक्तिगीते, कथा, समीक्षा, कांदबरी इत्यादी विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले होते. देशपांडे यांची १२५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संत साहित्यासह विविध विषयांवरील ११८ पुस्तकांना वामन देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिल्या होत्या. धार्मिक विषयांसह विविध विषयांवरील सुमारे तीन हजाराहून अधिक पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे होता. 'अच्युतानंद' या टोपण नावाने त्यांनी ज्ञानेश्वरीवर लिखाण केले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते.‌ संत साहित्यावर ते प्रवचनही करत असत.

सोमवार, ९ जून, २०२५

अशी ही साता-याची त-हा-! विशेष लेख

इंट्रो आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा साता-यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्याचा योग जुळून आला आहे. त्यानिमित्ताने साहित्य, चित्रपट, कविता यातील 'अशी ही साता-याची त-हा'! 'अशी ही साता-याची त-हा-!' शेखर जोशी मराठी साहित्य व्यवहारातील 'कुंभमेळा' अशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ओळख आहे. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या साहित्य संमेलनाचा आता 'इव्हेंट' झाला असून हे संमेलन राजकारण्यांच्या ताब्यात गेले आहे. साहित्य संमेलन आणि वाद ,कार्यक्रमातील साचेबद्धपणा हे नेहमीचे रडगाणे असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही मराठी साहित्य व्यवहारातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदा सातारा येथे साहित्य संमेलनाचा फड रंगणार आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर सातारा शहराला ऐतिहासिक वारसा असून हे शहर कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे. छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे साता-याच्या गादीचे पहिले संस्थापक. १८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९ असा त्यांचा कार्यकाळ होता. १७०८ मध्ये त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. ब्रिटिशांच्या काळात सातारा हे एक अग्रगण्य संस्थान म्हणून ओळखले जात होते.‌ शहराभोवती असलेल्या सात किल्ल्यांवरून शहराला सातारा हे नाव मिळाले.‌ प्रत्येक शहराची स्वतःची काही ना काही अशी स्वतंत्र ओळख असते. अजिंक्यतारा किल्ला, व्योम धरण, कास पठार, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, जरंडेश्वर हनुमान, बारा मोट्याची विहीर, ही साताऱ्या जवळील काही प्रसिद्ध ठिकाणे सातारा शहर आणि जिल्ह्याची मुख्य ओळख ठरली आहेत. सातारी कंदी पेढे आणि सातारी जर्दा ही सुद्धा साता-याची वेगळी ओळख आहे. साहित्य, चित्रपटातील सातारा 'सातारा' हे नाव असलेला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 'अलगूज' कादंबरीवर आधारित 'अशी ही साता-याची त-हा' हा चित्रपटही सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. अरुण सरनाईक, उमा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरलीधर कापडी यांनी केले होते. चित्रपटातील 'परभणीहुनी कुणी आलेत पाहुणे मला घालाया मागणी, काय करू काय करू' हे गाणे प्रसिद्ध आहे. https://youtu.be/q7tTNzfDX5w?feature=shared या लिंकवर हे गाणे पाहता व ऐकता येईल. अशाच एका अत्यंत लोकप्रिय गाण्यात/ लावणीत 'सातारा' आलेला आहे. 'सांगत्ये ऐका' चित्रपटातील 'बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला गं जाता साताऱ्याला ' हे ते गाणे. आज इतक्या वर्षांनंतरही गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.‌ https://youtu.be/lSLMTR0tCZY?feature=shared या लिंकवर क्लिक करून हे गाणे ऐकता येईल. गदिमांचा 'जोगिया' 'आधुनिक वाल्मिकी' अशी ओळख असलेले कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांचा 'जोगीया' हा पहिला काव्यसंग्रह. यातील १६ कविता संगीतबद्ध करून एक सांगितिक अल्बम प्रकाशित झाला आहे. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या अल्बमची निर्मिती केली असून सुरेश देवळे यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. श्रीधर फडके रवींद्र साठे उत्तरा केळकर चारुदत्त आफळे, ज्ञानदा परांजपे यांनीही गाणी गायली आहे. चारुदत्त आफळे यांची किर्तनकार/ प्रवचनकार अशी महाराष्ट्राला ओळख आहे. मात्र या आल्बममध्ये आफळे बुवांनी चक्क गदिमांनी लिहिलेली 'ही घोळ निऱ्यांचा पदी अडखळे, जलद चालणे जरा, दिसे ही साताऱ्याची तऱ्हा' ही लावणी गायली आहे. लावणीचे शब्द, संगीत आणि स्वर एकदम फक्कड आहेत. रसिक वाचकांना ही लावणी https://www.gadima.com/jogia/index.php#google_vignette या लिंकवर ऐकता येईल. साताऱ्यात होणारे ४ थे साहित्य संमेलन आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होणार आहे. या आधीही तीन संमेलने साता-यात झाली होती. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी 'ग्रंथकार संमेलन' सुरु केल्यानंतर १९०५ मध्ये तिसरे संमेलन रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते. १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे तर १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात झाले होते. सातारा येथे होणाऱ्या आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनाचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनला मिळाला आहे. असाही एक योगायोग सातारा येथे होणारे नियोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे. १९९३ साली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच ठिकाणी झाले होते. हे स्टेडियम १४ एकरात असून तिथे एक मुख्य मंडप, दोन अन्य मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर परिसंवाद/कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहेही उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये २५ हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी आहे. स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर आहे.‌ स्टेडियमच्या मागील बाजूस पोलीस परेड ग्राउंडची मोठी जागा असून त्याचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे. पूर्ण--

शुक्रवार, ६ जून, २०२५

ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे निधन ठाणे, ६ जून ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे अल्प आजाराने शुक्रवारी ठाण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे. पणशीकर यांनी लिहिलेली महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता?, कथामृतम, कणिकनिती, शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित स्तोत्र गंगा (दोन भाग), अपरिचित रामायण (पाच भाग), गानसरस्वती किशोरी आमोणकर - आदिशक्तीचा धन्योद्गार आणि इतर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पणशीकर यांनी देशविदेशात सुमारे अडीच हजार व्याख्याने दिली असून काही वृत्तपत्रातूनही त्यांनी लिहिलेल्या विविध लेखमाला प्रसिद्ध झाल्या आहेत. पणशीकर यांच्या पार्थिवावर शनिवार ७ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता जवाहर बाग स्मशानभूमी, ठाणे पश्चिम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची रविवारी बैठक - संमेलन स्थळ औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर की सातारा?

साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची रविवारी बैठक - संमेलन स्थळ औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर की सातारा? मुंबई, दि. ६ जून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची बैठक येत्या रविवारी ८ जून रोजी पुण्यात होत आहे. या बैठकीत आगामी ९९ वेळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे घ्यायचे? त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. अलीकडेच नवी दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आता तीन वर्षांसाठी पुण्यात आले आहे. त्यामुळे स्थळ निवड समितीची बैठक पुण्यात होणार असून बैठकीनंतर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ जाहीर केले जाणार आहे. ९९ वे साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी महामंडळाकडे सदानंद साहित्य मंडळ -औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी- सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत.

बुधवार, ४ जून, २०२५

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत 'स्मार्ट लायब्ररी''

ठाणे, दि. ४ जून ठाणे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये २८ स्मार्ट ग्रंथालये उभारण्यात आली आहेत. भिवंडी, कल्याण तसेच शहापूर या तालुक्यांतील ग्रामपंचातींचा यात समावेश आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही ग्रंथालये उभारण्यात आली आहेत.विविध विषयांवरील तब्बल २ हजारांहून अधिक पुस्तकांसह ऑडिओबुक्स, स्मार्ट टीव्ही आणि वाय-फाय इत्यादी सुविधाही या ग्रंथालयात देण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी कॉमिक्स, बोधकथापर पुस्तके, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरित्र ग्रंथ, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ पुस्तके इथे वाचायला मिळणार आहेत. ग्रंथालयात सर्व गटातील वाचकांना विनामूल्य प्रवेश आहे.

सोमवार, १९ मे, २०२५

महाराष्ट्राची बदललेली भाषा आणि वाणी क्लेशदायक- माजी न्यायमूर्ती धर्माधिकारी

महाराष्ट्राची बदललेली भाषा आणि वाणी क्लेशदायक - माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी मुंबई, दि. १९ मे महाराष्ट्राची बदललेली सामाजिक, राजकीय संस्कृती, भाषा आणि वाणी क्लेशदायक असून हे चित्र बदलण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करू या, असे आवाहन माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी रविवारी येथे केले. ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक, रंगकर्मी यांच्या संकल्पनेतून साकारलेले 'अध्यक्ष नसलेले 'माझे' असेही एक पत्रकार संमेलन' दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे साजरे झाले. त्या संमेलनात धर्माधिकारी बोलत होते. विविध मराठी वृत्तपत्रातील जुने, नवे आणि ज्येष्ठ पत्रकार संमेलनास उपस्थित होते. सामान्य माणसालाही सामान्य माणसासारखे वागता येत नाही, बोलता येत नाही. ही मुळ्ये काकांची फार मोठी खंत आहे. लोकं असे का वागतात, का बोलतात? फक्त युद्धजन्य परिस्थिती आली की आपण सर्व एकत्र येतो. बाकीच्या वेळी एकत्र का येऊ शकत नाही ? महाराष्ट्रात सध्या भाषा आणि वाणीचे हे जे काही झाले आहे ती मुळ्ये काकांची वेदना आहे, आपण सर्व पत्रकार आहात, आज ती वेदना मी आपल्यापर्यंत पोहोचवित आहे, असेही धर्माधिकारी म्हणाले. मुळ्ये काकांना सुचणा-या कल्पना भन्नाट असतात. आगळे वेगळे कार्यक्रम, संमेलने आयोजित करून ते आपल्याला जे काही देतात त्याचे मोल करता येणार नाही. ते अनमोल आहे. मुळ्ये काकांसारख्या व्यक्ती समाजासाठी आवश्यक असतात. आपण त्यांच्या कायम ऋणात राहिले पाहिजे, असे माझ्या वडिलांनी मला सांगितले होते, मी तोच प्रयत्न करतो, असेही धर्माधिकारी यांनी सांगितले. माध्यमांपासून खरेतर न्यायालयांनी दूर राहिले पाहिजे. नागरिकांचे जे काही म्हणणे असते ते कोणालाच समजत नसते. काही जागरूक पत्रकार/ प्रसार माध्यमांच्यामार्फत ते न्यायाधीश/ न्यायालयापर्यंत पोहोचत असते‌. पण तरीही तो संबंध चांगला नाही. आज बरेचदा काय होते की भावनेच्या भरात लोकं काहीही बोलतात. त्याने न्यायालयाचा अवमान होत नाही, पण ती संधी मिळू शकते‌. आणि ते झाले की जे अपरिमित नुकसान होते ते भरता येत नाही, अशी खंतही धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना जाहीर झाला आहे.‌ त्यानिमित्ताने रविवारच्या पत्रकार संमेलनात धर्माधिकारी यांच्या हस्ते म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना म्हात्रे म्हणाले, तीन दशकांच्या पत्रकारितेत खूप शिकायला मिळाले. समाजाबरोबरच स्वतःला बदलण्याचे सामर्थ्य पत्रकारितेत आहे. मुळ्ये काका हे एक वेगळेच रसायन असून त्यांच्या सारखी निस्पृह वृत्तीने काम करणारी माणसे विरळाच. उपेक्षितांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचे त्यांचे काम खूप मोठे आहे. एबीपी माझाचे प्रसन्न जोशी यांनी म्हात्रे यांचा परिचय करून दिला. 'माझ्या खिशात दमडा नाही पण ज्यांच्या खिशात दमडा आहे ते सारे माझ्या खिशात आहेत', अशा शब्दांत शाब्दिक फटकेबाजीने सुरुवात करत पत्रकार संमेलन घेण्यामागील संकल्पना आणि आजवर आयोजित केलेले अनेक आगळे वेगळे कार्यक्रम, संमेलने, उपक्रम याची सविस्तर माहिती मुळ्ये काकांनी दिली.
अनेक मंडळी, संस्था माझ्यावर भरभरून प्रेम करतातच आणि माझ्या सर्व कार्यक्रमांना सढळ हस्ते आर्थिक मदतही करतात.‌आजवर केलेल्या सर्व कार्यक्रमांना प्रसिद्धी देऊन ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सर्व वृत्तपत्रे, वृत्तपत्रांचे संपादक आणि पत्रकारांनी केले आहे. या सर्वांच्या सहकार्यानेच आपण हे कार्यक्रम करत असतो. आजवरच्या आयुष्यात या सर्व मंडळींच्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही, आणि यापुढेही जाऊ देणार नाही. या सर्वांचा मी ऋणी आहे, असेही मुळ्ये काकांनी सांगितले. संमेलनात विद्या करलगीकर, डॉ.शिल्पा मालंडकर आणि प्रसिद्ध गायक श्रीरंग भावे यांनी अविट गोडीची मराठी भावगीते व चित्रपट गीते सादर केली. त्यांना प्रसाद पंडित (तबला) व सागर साठे (संवादिनी) यांनी संगीतसाथ केली. ' या सुखानो या' गाण्याने सुरू झालेल्या मैफलीची सांगता श्रीरंग भावे यांनी गायलेल्या विविध अभंगांच्या मेडलीने झाली.
-शेखर जोशी १९ मे २०२५

गुरुवार, १ मे, २०२५

कार्टूनिस्ट्स कंबाईनतर्फे मुंबईत व्यंगचित्र संमेलनाचे आयोजन

कार्टूनिस्ट्स कंबाईनतर्फे मुंबईत व्यंगचित्र संमेलनाचे आयोजन मुंबई, दि. १ मे जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त कार्टूनिस्ट्स कंबाईनतर्फे येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईत व्यंगचित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी १९८३ मध्ये कार्टूनिस्ट्स कंबाईन संस्थेची स्थापना केली होती. मराठी व्यंगचित्रकारांची ही अखिल भारतीय संघटना आहे. यंदाचे व्यंगचित्र संमेलन ओला वाकोला हॉल, सांताक्रूझ (पूर्व) येथे होणार असून शिवसेना नेते सुभाष देसाई हे विशेष अतिथी म्हणून संमेलनास उपस्थित राहणार आहेत. व्यंगचित्र प्रदर्शन,व्यंगचित्र स्पर्धा,व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिकासह व्याख्याने,परिसंवाद या संमेलनात होणार आहेत. रसिक प्रेक्षकांना आपले स्वतःचे व्यंगचित्रही संमेलनात काढून घेता येणार आहे. या संमेलनात शंभर वर्षापूर्वीचीही दुर्मिळ व्यंगचित्रेही पाहता येणार आहेत. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत व्यंगचित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.कार्टूनिस्ट्स कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, शिवसेना आमदार संजय पोतनीस,ओला वाकोलाचे संदेश चव्हाण यांनी या संमेलनाचे आयोजन केले आहे.‌

गुरुवार, २७ मार्च, २०२५

नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात कामगार साहित्याचा जागर होणार

नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात कामगार साहित्याचा जागर होणार - सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा मुंबई, दि. २७ मार्च पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून कवीवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे नारायण सुर्वे यांच्या साहित्य संपदेवर आधारित कार्यक्रमाची निर्मिती तसेच राज्यात विविध ठिकाणी कामगार साहित्याचा जागर केला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी येथे केली.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या 'मराठी आठव दिवस' चा तृतीय वर्धापन दिन आणि सुर्वे साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ॲड. शेलार बोलत होते. कामगार साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या एका साहित्यिकाला माझ्याकडून ५० हजार रुपयांचा पुरस्कार 'मराठी आठव दिवस' च्या नारायण सुर्वे वार्षिक साहित्य संमेलनात पुढील वर्षापासून दिला जाईल, अशी घोषणाहीम्हणाले. ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिवसभर झालेल्या सुर्वे साहित्य संमेलनात सर्वश्री भाऊ कोरगावकर, डॉ. महेश केळुसकर, अशोक नायगावकर या 'मराठी आठव दिवस' च्या सुरुवातीपासूनच्या पाठीराख्यांना कृतज्ञता सन्मानाने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रदीप आवटे, योगिता राजकर, मधुकर मातोंडकर, सुनील उबाळे, सुजाता राऊत, सफरअली इसफ या नवोदित साहित्यिकांना 'जाहीरनामा पुरस्कार' देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दर महिन्याच्या २७ तारखेला ' मराठी आठव दिवस' कार्यक्रम करण्यासाठी राज्यभरातून अनेक मराठी दानशूर व्यक्ती उत्स्फूर्तपणे पुढे येत असल्याबद्दल संस्थापक रजनीश राणे यांनी समाधान व्यक्त केले.

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

राम मंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे'

पुस्तक परिचय '

राम मंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे'

राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन आणि कारसेवेचा थरार

शेखर जोशी 

मोरया प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 'राम मंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे' या पुस्तकात राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा संक्षिप्त इतिहास, १९९० आणि १९९२ मध्ये झालेल्या कारसेवेचा थरार आणि आता अयोध्येत उभ्या राहणाऱ्या राम मंदिराच्या कामाची अनुभूती या पुस्तकात सादर करण्यात आली आहे.

डोंबिवलीतील प्रकाश बापट, प्रदीप पराडकर आणि अन्य काही कार्यकर्ते १९९० व १९९२ च्या कारसेवेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. कारसेवेचा थरार या सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी यांची प्रस्तावना पुस्तकास लाभली आहे. प्रकाश बापट आणि त्यांच्या काही मित्रांनी काही महिन्यांपूर्वी वाराणसी, अयोध्येला भेट दिली होती. बापट यांच्याबरोबर प्रदीप पराडकर, शैलेश दिवेकर, शिरीष गोगटे ही मंडळी होती. बापट यांनी हे अनुभव 'फेसबुक' या लोकप्रिय समाज माध्यमावर 'पर्यटन नव्हे तीर्थाटन' या लेखमालिकेत लिहिले होते. त्या लेखांवर आधारित हे पुस्तक आहे. 

पुस्तकांच्या पहिल्या प्रकरणात श्रीराम जन्मभूमी मुक्ती लढ्याचा पूर्वइतिहास लेखक प्रकाश बापट यांनी सांगितला आहे. सन पंधराशे १५२८ ते २९ या काळात मुघल आक्रमक बाबरचा सेनापती मीर बाकी याने श्रीराम मंदिराचा विध्वंस करून तिथे मशिदीची उभारणी केली आणि तेव्हापासूनच मंदिराच्या पुनर्नमानाचा धडा सुरू झाला वेळोवेळी असंख्य लढाया आंदोलने आणि चळवळ उभारून स्वाभिमानी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी प्राण्यांची आहुती तिथे आणि हा लढा धगधगत ठेवला त्यानंतर सुमारे ३३२ वर्षांनी सन १८५० मध्ये हिंदूंनी या जागेचा ताबा मिळवण्याची मागणी केली मात्र तत्कालीक शासकाने मागणी फेटाळली. तेव्हापासून ते ५ ऑगस्ट २०२० या दिवशी राममंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला, इथपर्यंतचा इतिहास थोडक्यात मांडला आहे.

१९९० आणि १९९२ च्या अयोध्येतील कारसेवेसाठी डोंबिवलीतून शंभरहून अधिक कारसेवक गेले होते. लेखकाने पुस्तकात जे अनुभव सांगितले आहेत ते चित्तथरारक आणि अंगावर काटा आणणारे आहेत. वेगवेगळ्या नोकरी, व्यवसायातील या कार्यकर्त्यांनी राममंदिर आणि कारसेवेसाठी प्राण पणाला लावले होते, या सर्वांना मनापासून नमस्कार. ३० ऑक्टोबर १९९० या दिवशी रामजन्मभूमीवरील उध्वस्त केलेल्या मंदिराच्या जागेवरील विवादास्पद वास्तूवर भगवा कसा फडकला, त्याचा दिनक्रम सांगितला आहे.

 राममंदिर प्रकल्प समन्वयक जगदीश आफळे यांचा परिचय तसेच राममंदिर कसे असेल? संपूर्ण परिसरात काय असणार आहे, याची माहितीही देण्यात आली आहे. अयोध्येतील या राममंदिरच्या प्रदक्षिणा मार्गावर रामायणातील निवडक शंभर प्रसंग शिल्पस्वरुपात साकारले जाणार आहेत. महाराष्ट्रातील शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा महत्त्वाचा सहभाग यात आहे. पुस्तकात कांबळे यांची मुलाखत आहे. 

अयोध्येतील इतर महत्त्वाची ठिकाणे, रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा ज्ञानकोश चंपतराय यांची तसेच रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात ज्यांचे महत्त्वाचे योगदान आहे त्या व्यक्तींची थोडक्यात ओळख पुस्तकात करून देण्यात आली आहे. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन, अयोध्येतील नियोजित राममंदिर, अयोध्येतील इतर महत्त्वाची ठिकाणे यांचीही छायाचित्रे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, श्रीरामजन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांचे शुभेच्छा संदेश पुस्तकात आहेत. 

राममंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे

मोरया प्रकाशन

पृष्ठे- १२६, मूल्य- १५० रुपये

संपर्क क्रमांक

७०२१९१३६४५/८६००१६६२९७

ई मेल

info@morayaprakashan.com

संकेतस्थळ

www.morayaprakashan.com

गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

डोंबिवलीत साकारणार ५० हजारांहून अधिक पुस्तकांपासून राममंदिर प्रतिकृती


पै फ्रेंड्स लायब्ररीच्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात

५० हजारांहून अधिक पुस्तकांपासून राममंदिर प्रतिकृती

- १९ ते २८ जानेवारी २०२४ या  दरम्यान डोंबिवलीत आयोजन 

शेखर जोशी

येथील पै फ्रेंड्स लायब्ररी आयोजित पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात पन्नास हजारांहून अधिक पुस्तकांपासून अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.‌ येत्या १९ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत डोंबिवलीत बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळा आयोजित करण्यात आला असून सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे.

राममंदिर प्रतिकृती उभारण्याचा शुभारंभ गुरुवारी (१४ डिसेंबर) संध्याकाळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील प्रा. सुरेंद्र बाजपेयी सभागृहात पार पडला. पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक- संचालक पुंडलिक पै यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. त्याआधी गणपती, भूमी वराह आणि विष्णुकर्मा पूजा करण्यात आली.‌

कल्याण डोंबिवली महापालिका, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवार यांचे विशेष सहकार्य या सोहळ्यासाठी लाभले आहे. 'विज्ञान आणि वैज्ञानिक' अशी यावेळच्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याची संकल्पना असून त्याअनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे पुंडलिक पै यांनी यावेळी सांगितले.

पुस्तकांची ही राममंदिर प्रतिकृती ८० फूट रुंद आणि ४० फूट उंच असून अशा प्रकारे तयार होणारी ही प्रतिकृती भारतातील नव्हे तर जगातील पहिली प्रतिकृती असणार आहे. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राममंदिराचे उदघाटन होणार आहे. या दिवशी पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात सामुहिक रामरक्षा पठण होणार असून यात एक हजार शालेय विद्यार्थी आणि डोंबिवलीकर नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहितीही पै यांनी यावेळी दिली.

यावेळी सिद्धेश बागवे (डिझायनर), रवी घाडीगांवकर ( सुतार), नरेश ( वेल्डर), नवनाथ मोरे ( रंगारी) यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. ही मंडळी आणि त्यांचे सहकारी पुस्तकांची राममंदिर प्रतिकृती उभारणार आहेत. कडोंमपाच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील प्रा. सुरेंद्र बाजपेयी सभागृहात हा पुस्तक आदानप्रदान सोहळा होणार आहे.

१४ डिसेंबर २०२३

-----

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वाचन जागर’!

 


माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वाचन जागर’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर या जन्मगावी होणारा कार्यक्रम हे यंदाच्या वाचन प्रेरणा दिनाचे वैशिष्ठ्य असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांनी सांगितले.

१३ ऑक्टोबर रोजी कर्मवीर आ. मा. पाटील महाविद्यालय, पिंपळनेर व दीपरत्न माध्यमिक विद्यालय, पानखेडा, धुळे आणि भीमराव शिंदे महिला महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाई; १४ ऑक्टोबर रोजी राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोल्हापूर आणि १५ ऑक्टोबर रोजी ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलन; मराठी विश्वकोश कार्यालयात ग्रंथ प्रदर्शन, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. दीक्षित यांनी दिली.‌

भाषा आणि भाषांतर, विदेशी मराठी साहित्य, वाचन संस्कृती आणि आव्हाने, मराठी विश्वकोश परिचय, कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण, वाचन संवाद आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

 वाई विश्वकोश कार्यालयातील संपादकीय विभाग व प्रशासकीय विभागाकडून या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, १९ एप्रिल, २०२३

पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे 'पुस्तक रस्ता' उपक्रम

पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे २३ एप्रिल रोजी 

डोंबिवलीत' पुस्तक रस्ता' उपक्रमाचे आयोजन 

- महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिला, आगळा उपक्रम 

पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार याबरोबरच वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररी विविध उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त येत्या २३ एप्रिल रोजी पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत 'पुस्तक रस्ता' उपक्रमातचे आयोजन करण्यात आले आहे.


हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिला उपक्रम असल्याचे पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक संचालक पुंडलिक पै यांनी सांगितले. डोंबिवली पूर्व येथे मॉडर्न कॅफे ते अप्पा दातार चौकापर्यंतर स्त्यावर गालिचा अंथरून विविध विषयांवरील सुमारे एक लाख पुस्तके मांडण्यात येणार आहेत. हे काम आदल्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिल रोजी रात्री केले जाणार असल्याचे पै म्हणाले.

मांडण्यात येणारी पुस्तके बहुभाषिक असून यात कथा कादंबरी, ऐतिहासिक, अनुवादीत, विज्ञानविषयक पुस्तकांसह लहान मुलांच्या इंग्रजी व मराठी गोष्टींच्या पुस्तकांचा समावेश आहे. डोंबिवलीतील विविध संघटनांचे २०० हून अधिक स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. येथे भेट देणा-या प्रत्येक वाचकाला पुस्तक रस्त्यावरील कोणतेही एक पुस्तक मोफत दिले जाणार आहे.

शेखर जोशी