बुधवार, ११ जून, २०२५

'उदकशांंत' दीर्घांकाचे शनिवारी कल्याणला सादरीकरण

शरद तळवलकर स्मृती दीर्घांक स्पर्धेतील विजेत्या 'उदकशांंत'चे शनिवारी कल्याणला सादरीकरण - मुलगा गमावलेल्या आई वडिलांच्या भावनिक संघर्षाची कहाणी डोंबिवली, दि. ११ जून शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या 'उदकशांत' या दीर्घांकाचा प्रयोग येत्या १४ जून रोजी रात्री साडेआठ वाजता आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण येथे आयोजित करण्यात आला आहे. हा प्रयोग सशुल्क असून प्रयोगाचा कालावधी सलग एक तास २० मिनिटे इतका आहे. आपला मतीमंद मुलगा आता या जगात नाही हे सत्य मुलाच्या आईने स्विकारले आहे पण मुलाचे वडील ते स्विकारायला तयार नाहीत. मुलाच्या मृत्यूची सावली या दोघांच्याही आयुष्यावर पडली आहे.‌ ही सावली इतकी गडद आहे की ते दोघे सुखाने जगूही शकत नाहीत. या आई-वडिलांच्या भावनिक संघर्षाची कहाणी 'उदकशांत' या दीर्घांकात सादर करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे यंदा पहिल्यांदाच शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत डॉ. समीर मोने लिखित आणि अभिनेते मिलिंद अधिकारी दिग्दर्शित 'उदकशांत' या दीर्घांकाला प्रथम क्रमांक मिळाला. डोंबिवलीच्या तिहाई कलासाधक संस्थेने हा दीर्घांक सादर केला होता. महाराष्ट्रातून एकूण २७ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. 'उदकशांत' दीर्घांकात प्रतिक खिसमतराव, श्रद्धा भालेकर, धनंजय धुमाळ, मिनाक्षी जोशी, देवेश काळे हे कलाकार आहेत.‌ दिग्दर्शशनासह नेपथ्याची जबाबदारी मिलिंद अधिकारी यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजना अनुक्रमे आशुतोष वाघमारे व राजेश शिंदे यांची आहे.
'उदकशांत' मधील जोडप्याचा मतिमंद मुलगा गेल्याला आता एक वर्ष झाले आहे. परंतु ते दोघेही त्याच्या आठवणी विसरू शकत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारे ते दोघेही आपल्या मतिमंद मुलाचे मरण स्विकारायला तयार नाहीत. हा दीर्घांक एका रात्रीतला असला तरी त्याची पार्श्वभूमी त्या जोडप्याच्या पूर्ण आयुष्याचे भोगणे असल्याचे 'उदकशांत' चे दिग्दर्शक व‌ नेपथ्यकार मिलिंद अधिकारी यांनी सांगितले. 'एका कोंडीतून मुक्त होणाऱ्या जोडप्याची गोष्ट', असा प्रवास आपल्याला जाणवला आणि मी त्या पद्धतीने नाटक बसवत गेलो. सर्व कलाकारांची उत्तम साथ मिळाली आणि हा प्रयोग चांगल्या प्रकारे सादर करू शकलो, असेही अधिकारी म्हणाले.‌ शरद तळवलकर स्मृती दीर्घांक स्पर्धेत 'उदकशांत'ने पुढील पारितोषिकेही पटकावली आहेत.‌ दिग्दर्शक (मिलिंदअधिकारी)- प्रथम संगीत (आशुतोष वाघमारे) - प्रथम अभिनेत्री ( श्रद्धा भालेकर) - प्रथम अभिनेत्री (मीनाक्षी जोशी)- तृतीय अभिनेता ( प्रतिक खिसमतराव) - तृतीय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: