गुरुवार, १२ जून, २०२५
अंबरनाथच्या साप्ताहिक आहुतीचे हिरकमहोत्सवी वर्षांत पदार्पण!
अंबरनाथ येथील 'साप्ताहिक आहुती'ने ११ जून रोजी हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले. स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव त्रिवेदी आणि त्यांच्या पत्नी मनोरमाबेन त्रिवेदी यांनी ११ जून १९६६ रोजी 'साप्ताहिक आहुती' सुरू केले. मुंबईच्या मोठ्या वृत्तपत्रात स्थानिक बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळत नाही हा 'आहुती' सुरू करण्यामागील मुख्य उद्देश होता. वसंतराव त्रिवेदी यांचे सुपुत्र गिरीश वसंत त्रिवेदी हे 'साप्ताहिक आहुती' चे संपादक असून त्यांना वडीलबंधू, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.
येत्या १ जानेवारी २०२६ रोजी साप्ताहिक आहुतीचा हिरक महोत्सवी वर्धापन दिन विशेषांक प्रकाशित करण्याचा तसेच हिरक महोत्सवी वर्षांत विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय साप्ताहिक आहुतीचे संपादक गिरीश त्रिवेदी यांनी साप्ताहिक आहुतीच्या ताज्या अंकातील संपादकीयात व्यक्त केला आहे.
स्थानिक पातळीवर गेली ५९ वर्षं साप्ताहिक प्रकाशित करणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. त्यासाठी साप्ताहिक आहुतीच्या सर्व चमूला शुभेच्छा. हिरकमहोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त अभिनंदन आणि शुभेच्छा. या निमित्ताने साप्ताहिक आहुतीच्या सौजन्याने 'आहुती'च्या संपादकीयचा हा संपादित अंश.
अंबरनाथच्या साप्ताहिक आहुतीचे
हिरकमहोत्सवी वर्षांत पदार्पण!
मुंबई येथील मोठ्या वर्तमानपत्रात स्थानिक बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळत नाही म्हणून साप्ताहिक आहुतीची मुहूर्तमेढ वसंतराव त्रिवेदी यांनी रोवली. सामाजिक बांधिलकी जपत हे साप्ताहिक सुरु आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, अध्यात्मिक अशा विविध उपक्रमांना सचित्र आणि सविस्तर प्रसिद्धी देण्याच्या हेतूनेच आहुतीची सुरुवात करण्यात आली. गेल्या ५९ वर्षात खून, मारामारी, बलात्कार आदी गुन्हे स्वरूपाच्या बातम्या देण्याचे कटाक्षाने टाळले आहे. या पुढेही तेच धोरण राहील. वसंतराव त्रिवेदी यांनी घालून दिलेल्या तत्वानेच आहुतीची वाटचाल अखंडपणे सुरु आहे. गेल्या तब्बल ५९ वर्षांत वाचकांना सकारात्मक आणि चांगलेच द्यायचा प्रयत्न केला आहे.
गेल्या ५९ वर्षातील आहुतीची ही वाटचाल एक दिशादर्शक वाटचाल आहे. गेल्या ५९ वर्षात आहुतीने केवळ वृत्तपत्र प्रकाशित करण्याचे काम केले नाही तर अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदि अनेक क्षेत्रात आपले योगदान दिले. साप्ताहिक आहुतीचा वर्धापन दिन साजरा करताना राजकीय, शासकीय वरिष्ठाना निमंत्रित करून त्या त्या परिसरातील समस्यांना वाचा फोडण्याची प्रथा आहुतीने सुरु केली.
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर व्हावे यासाठी आहुती आणि त्रिवेदी परिवार सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या प्रयत्नांना आता निश्चित अशी दिशा मिळाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहर हे 'मंदिराचे शहर' अर्थात टेम्पल सिटी करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरु केला आहे. १४० कोटी खर्चाचा प्रस्ताव मंजुर होऊन काम सुरु झाले आहे. अंबरनाथ तालुका व्हावा, प्रशासकीय इमारत उभारून सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावी ही मागणी आहुतीने लावून धरली होती. भ्रमणध्वनी कंपन्यांनी मुंबई महाराष्ट्रातून वेगळी केली आहे ती पुन्हा एक करावी अर्थात मुंबई आणि महाराष्ट्र हे एकच सर्कल असावे यासाठीही आहुतीने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला काही प्रमाणात यश येवून सरकारी बी एस एन एल आणि एम टी एन एल या कंपन्यांनी मुंबई आणि महाराष्ट्र सर्कल एक केले आहे. कल्याण महापालिकेतून अंबरनाथ आणि बदलापूर स्वतंत्र पालिका कराव्यात या मागणीसाठीही आहुतीने योगदान दिले आहे. १४ एप्रिल १९९२ रोजी या दोन पालिका स्वतंत्र झाल्या. कल्याण जिल्ह्याची निर्मिती व्हावी यासाठी सुद्धा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
वेगवेगळ्या विषयावर, वेगवेगळ्या आकारात विशेषांक प्रकाशित करून आहुतिने इतिहास रचलेला आहे. वर्धापन दिन असो वा दिवाळी विशेष अंक असो एक विषय घेवून त्या विषयावर आहुतीने विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्यात "आई", प्राचीन शिवमंदिर विशेष अंक (शिवमंदिर विशेष अंकाच्या दोन आवृत्या प्रकाशित झाल्या.) आहुतीच्या इतिहासात गाजलेला विशेष अंक म्हणजे शिवमंदिर विशेष अंक. १४ जून १९९२ रोजी आहुतीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी शिव मंदिरात जावून दर्शन घेतले त्यावेळी मधुकरराव चौधरी, मनोहर जोशी आदींनी साबिरभाई शेख यांना विचारले की या मंदिराची माहिती देणारी पुस्तिका आहे का ? त्यावेळी सर्वांनी नकारार्थी उत्तर दिले. त्याच वेळी वसंतराव त्रिवेदी यांनी आदेश दिले की आहुतीचा शिवमंदिर विशेषांक प्रकाशित करायचा. त्याची पहिली आवृत्ती
९ मार्च १९९४ रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री' येथे प्रकाशित झाली. शिवमंदिराचा अभ्यास करणाऱ्यांना कमी किमतीत भरपूर माहिती द्यायची याच हेतूने हा अंक अवघ्या पाच रुपयात उपलब्ध करून दिला होता. त्या अंकाच्या प्रती संपल्या नंतर २००९ मध्ये शिवमंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. याचे प्रकाशन २२ ऑगस्ट २००९ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. गो. बं. देगलूरकर, पद्मश्री डॉ. सदाशिव गोरक्षकर, डॉ. कुमुद कानिटकर, सदाशिव टेटविलकर, सदाशिव साठे, लक्ष्मणराव कुलकर्णी अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. शेती, इतिहास, पर्यटन, करोना, उद्योग, प्रशासकीय अधिकारी संधी आणि आव्हाने, कृषी उद्योग, विशेष मुलांच्या व्यथा आणि व्यवस्था आदी विविध विषयावर दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आले आहेत.
वृत्तपत्रांमध्ये अलीकडे जी स्पर्धा सुरु आहे ती गुणात्मक स्पर्धा वाटत नसून ती जीवघेणी स्पर्धा वाटत आहे असे वाटते. या पार्श्वभूमीवर एक उदाहरण आहुतीचे द्यावेसे वाटते. साप्ताहिक विवेकने अंबरनाथ शहरावर एक विशेषांक प्रकाशित केला होता. याचा प्रकाशन सोहळा अंबरनाथ शहरात आयोजित करण्यात आला. त्यावेळी "विवेक" साप्ताहिकाचे स्वागत करणारा, त्या चमूची माहिती देणारा आहुतीचा स्वतंत्र विशेषांक प्रकाशित करण्यात आला होता. वृत्तपत्रांनी अथवा पत्रकारांनी एकमेकांचे हेवेदावे न करता एकमेकाना सहकार्य करावे असे वसंतराव त्रिवेदी यांचे मत होते आणि त्याच तत्वाने आजही आहुतीची वाटचाल सुरु आहे.
आहुतीचे रौप्य महोत्सवी वर्ष जोरदार साजरे करण्यात आले. १४ जून १९९२ रोजी हा अविस्मरणीय असा सोहळा पार पडला. आहुतीचा सुवर्ण महोत्सवी वर्षारंभ मातृवंदनाने ११ जून २०१५ रोजी करण्यात आला.
(साप्ताहिक आहुतीच्या सौजन्याने)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा