बुधवार, १८ जून, २०२५

'देफ' ना दुसरे शरद पवार होण्याची हौस ती किती?

'देफ' यांचा मास्टर स्ट्रोक! दुसरे 'शरद पवार' होण्याची हौस ती किती? शेखर जोशी आमच्या पक्षात कोणी येणार असेल तर निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करतो. त्यांच्याकडून फक्त हीच अपेक्षा असते की, त्यांनी त्यांचा जुना इतिहास आणि वागण्याची जी पद्धत असेल ती बाजूला ठेवून आता भारतीय जनता पार्टीच्या नियमांनुसार वागले पाहिजे. - देवेंद्र फडणवीस ---------------------- भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांची ईडी चौकशी सुरू झाली त्या राष्ट्रवादीतील अनेकांना आणि इतरांनाही पक्षात प्रवेश दिला होताच. आता बडगुजर निमित्ताने भविष्यात अशा अनेक 'वाल्यां'ना 'वाल्मिकी' करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला. देफ यांचा मास्टर स्ट्रोक! या न्यायाने आता आणखी कोणा कुख्यातांना प्रवेश देणार? यादी तयार असेल ना? 'देफ' हे दुसरे शरद पवार होत चालले आहेत, नव्हे झालेच आहेत. भाजपच्या स्थानिक पातळीवरील अनेकांचा या प्रवेशला विरोध होता. तो विरोध डावलून, मोडून काढून हा प्रवेश झाला आहे. अर्थात हे निर्णय देफ एकटे घेत नसणार. मोदी, शहा यांच्याशी चर्चा करूनच वाल्यांना वाल्मिकी करून घेण्यासाठी लाल गालिचा अंथरला जात असणार. 'निष्ठावंतांचे पोतेरे आणि आयारामांसाठी पायघड्या'. आता संजय राऊत यांनाही पक्षात प्रवेश देऊन त्यांनाही त्यांचा जुना इतिहास आणि वागण्याची पद्धत बदलण्याची संधी जरुर द्यावी. भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते माधव भांडारींसारख्यांना अजूनही विधान परिषदेची उमेदवारी दिली जात नाही. आणि जुना इतिहास व वागण्याची पद्धत बदलण्याची 'प्रविण' असणाऱ्यांना 'प्रसाद' मिळतो. शेखर जोशी १८ जून २०२५ ----------------------------- सहा वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर २०१९ या दिवशी फेसबुकवर पोस्ट केलेली कविता. https://www.facebook.com/share/p/19BmQ2mNyA/ देवेंद्रू तू दयाळू पक्षप्रवेश दाता केले घोटाळे मी अभय दे आता पक्षात प्रवेश देऊनी केले मला तू पावन जुने सर्व विसरुनी अपराधांवर घाल पांघरुण तुझ्याच पावलांशी लाभली ही स्वस्थता आता सुटकेचा निश्वास 'ईडी'पासूनही मिळे मुक्तता 'पार्टी विथ डिफरन्स' तुझे गुणगान गाता तुझ्यामुळेच मी झालो 'वाल्या'चा वाल्मिकी'आता ©️शेखर जोशी ११ सप्टेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: