मनोरंजन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मनोरंजन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २३ जुलै, २०२५

लोकल प्रवासात फुलली प्रेमाची गोष्ट'! 'मुंबई लोकल' येत्या १ ऑगस्टला प्रदर्शित होणार

लोकल प्रवासात फुलली प्रेमाची गोष्ट'! 'मुंबई लोकल' येत्या १ ऑगस्टला प्रदर्शित होणार मुंबई, दि. २३ जुलै मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासात त्याची आणि तिची नजरानजर होते आणि सुरू होतो दोघांचेही आयुष्य बदलणारा प्रवास. त्या दोघांची ही गोष्ट 'मुंबई लोकल' या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या १ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या विशेष उपस्थितीत चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रकाशन व सादरीकरण करण्यात आले. अभिनेता प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.‌ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अभिजीत यांनी केले असून बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्सने चित्रपटाची निर्मिती केली आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती आणि आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो 'मुंबई लोकल' प्रवासात एकमेकांना पाहतात. प्रवासातच त्यांच्या प्रेमकहाणीला हिरवा कंदील मिळतो. पण पुढे त्यांच्या आयुष्यात जे घडते ते चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे इत्यादी कलाकार आहेत.

शनिवार, २१ जून, २०२५

जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या रेडिओचे महत्त्व अबाधित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या रेडिओचे महत्त्व अबाधित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. २१ जून रेडिओवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी रेडिओवरील कार्यक्रमांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविले आहे. त्यामुळे रेडिओचे महत्व कधीही कमी होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध एफएम रेडिओ वाहिन्यांच्या सिद्धू, अक्की, अर्चना, ब्रजेश, भूषण, सपना भट या रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे यावेळी उपस्थित होते. लहानपणी दिवसाची सुरूवात रेडिओ ऐकण्यापासून व्हायची. 'विविध भारती' वरील सकाळची गाणी अगदी न चूकता ऐकली जायची. त्यामुळे रेडिओशी लहानपणापासूनच जुळला गेलो‌‌. रेडिओचे महत्व पूर्वीपासून असून आजही ते अबाधीत आहे. रेडिओ हे समाजातील शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहोचण्याचे सशक्त माध्यम असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी या मुलाखतीत रेडिओवरील संगीत ऐकणे, गाणी लिहिणे आदी छंदाविषयीही सांगितले. शीघ्र कविता करत फडणवीस यांनी गाणेही गायले. या कार्यक्रमात आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार २०२५ विश्वनाथ ओक यांना प्रदान करण्यात आला. आशा सर्वोत्कृष्ट पुरूष निवेदक पुरस्कार रेडिओ मिर्ची वाहिनीचे रेडिओ जॉकी जितूराज, आशा सर्वोत्कृष्ट महिला निवेदक पुरस्कार रेड एफ एम वाहिनीच्या रेडिओ जॉकी मल्लिशा यांना प्रदान करण्यात आला. आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार रेडिओ सिटीला, आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्राचा पुरस्कार विकास भारती रेडिओ केंद्र नंदूरबार यांना देण्यात आला. यासह अन्य १२ गटात रेडिओ पुरस्कार देण्यात आले. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.‌ आशिष शेलार यांनीही मनोगत व्यक्त केले.

मंगळवार, १७ जून, २०२५

देशातील पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत - २१ जून रोजी 'आशा रेडिओ' पुरस्काराचे वितरण

देशातील पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत - २१ जून रोजी 'आशा रेडिओ' पुरस्काराचे वितरण मुंबई दि. १७ सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने येत्या २१ जून रोजी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव' पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी मुंबईत दिली. मराठी निवेदक, अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक, तंत्रज्ञ, संपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कला, साहित्य, संस्कृतीचे जतन व्हावे, असा आमचा प्रयत्न असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.
प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात 'आशा रेडिओ गौरव पुरस्कार' ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावाने देण्यात येणार आहे. याचबरोबर सर्वोत्कृष्ट रेडीओ केंद्र, कम्युनिटी रेडिओ, मनोरंजन कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, पुरुष निवेदक, महिला निवेदक इत्यादी गटातही पुरस्कार देण्यात येणार असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात येणार आहेत. संबंधित कलाकार, तंत्रज्ञ, रेडिओ केंद्र यांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करायची आहे. मानचिन्ह आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेडिओ निवेदकांसोबत संवाद साधणार असून तसेच रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्यांत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी, किस्से यांचेही सादरीकरण होणार आहे. येत्या २१ जून रोजी नरिमन पॉइंट, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

बुधवार, ११ जून, २०२५

'उदकशांंत' दीर्घांकाचे शनिवारी कल्याणला सादरीकरण

शरद तळवलकर स्मृती दीर्घांक स्पर्धेतील विजेत्या 'उदकशांंत'चे शनिवारी कल्याणला सादरीकरण - मुलगा गमावलेल्या आई वडिलांच्या भावनिक संघर्षाची कहाणी डोंबिवली, दि. ११ जून शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या 'उदकशांत' या दीर्घांकाचा प्रयोग येत्या १४ जून रोजी रात्री साडेआठ वाजता आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण येथे आयोजित करण्यात आला आहे. हा प्रयोग सशुल्क असून प्रयोगाचा कालावधी सलग एक तास २० मिनिटे इतका आहे. आपला मतीमंद मुलगा आता या जगात नाही हे सत्य मुलाच्या आईने स्विकारले आहे पण मुलाचे वडील ते स्विकारायला तयार नाहीत. मुलाच्या मृत्यूची सावली या दोघांच्याही आयुष्यावर पडली आहे.‌ ही सावली इतकी गडद आहे की ते दोघे सुखाने जगूही शकत नाहीत. या आई-वडिलांच्या भावनिक संघर्षाची कहाणी 'उदकशांत' या दीर्घांकात सादर करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे यंदा पहिल्यांदाच शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत डॉ. समीर मोने लिखित आणि अभिनेते मिलिंद अधिकारी दिग्दर्शित 'उदकशांत' या दीर्घांकाला प्रथम क्रमांक मिळाला. डोंबिवलीच्या तिहाई कलासाधक संस्थेने हा दीर्घांक सादर केला होता. महाराष्ट्रातून एकूण २७ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. 'उदकशांत' दीर्घांकात प्रतिक खिसमतराव, श्रद्धा भालेकर, धनंजय धुमाळ, मिनाक्षी जोशी, देवेश काळे हे कलाकार आहेत.‌ दिग्दर्शशनासह नेपथ्याची जबाबदारी मिलिंद अधिकारी यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजना अनुक्रमे आशुतोष वाघमारे व राजेश शिंदे यांची आहे.
'उदकशांत' मधील जोडप्याचा मतिमंद मुलगा गेल्याला आता एक वर्ष झाले आहे. परंतु ते दोघेही त्याच्या आठवणी विसरू शकत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारे ते दोघेही आपल्या मतिमंद मुलाचे मरण स्विकारायला तयार नाहीत. हा दीर्घांक एका रात्रीतला असला तरी त्याची पार्श्वभूमी त्या जोडप्याच्या पूर्ण आयुष्याचे भोगणे असल्याचे 'उदकशांत' चे दिग्दर्शक व‌ नेपथ्यकार मिलिंद अधिकारी यांनी सांगितले. 'एका कोंडीतून मुक्त होणाऱ्या जोडप्याची गोष्ट', असा प्रवास आपल्याला जाणवला आणि मी त्या पद्धतीने नाटक बसवत गेलो. सर्व कलाकारांची उत्तम साथ मिळाली आणि हा प्रयोग चांगल्या प्रकारे सादर करू शकलो, असेही अधिकारी म्हणाले.‌ शरद तळवलकर स्मृती दीर्घांक स्पर्धेत 'उदकशांत'ने पुढील पारितोषिकेही पटकावली आहेत.‌ दिग्दर्शक (मिलिंदअधिकारी)- प्रथम संगीत (आशुतोष वाघमारे) - प्रथम अभिनेत्री ( श्रद्धा भालेकर) - प्रथम अभिनेत्री (मीनाक्षी जोशी)- तृतीय अभिनेता ( प्रतिक खिसमतराव) - तृतीय

शुक्रवार, ६ जून, २०२५

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर - अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर - अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर मुंबई, दि. ६ जून नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
परिषदेतर्फे व्यावसायिक नाट्य पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. गेली ५१ वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अनुराग कल्याण या संस्थेला विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात गोविंदायन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात संगीत शारदा संगीत संशय कल्लोळ संगीत मृच्छकटिक नाटकातील प्रवेश सादर होणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा येत्या १४ जून रोजी दुपारी चार वाजता यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे होणार आहे. या सोहळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सोमवार, २६ मे, २०२५

कॅलिफोर्निया येथे तीन दिवसीय 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव

कॅलिफोर्निया येथे तीन दिवसीय 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव मुंबई, दि. २६ में सॅनहोजे, कॅलिफोर्निया येथे येत्या २५ ते २७ जुलै या कालावधीत नाफा' मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देऊळ' आणि 'भारतीय' चित्रपटांचे निर्माते अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन'ची (नाफा) स्थापना करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पहिला 'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव पार पडला होता. उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असणाऱ्या सुमारे साडेपाच लाख मराठी माणसांपर्यंत मराठी चित्रपट पोहचविण्याचा प्रयत्न 'नाफा'च्या माध्यमातून घोलप करत आहेत. गेल्या वर्षीपासून दर महिन्याला एक मराठी चित्रपट 'उत्तर अमेरिका - कॅनडा'मध्ये प्रदर्शित होत आहेत. ‘गुलकंद’, ‘सुजित सुशीला’, ‘संगीत मानापमान’, ‘चिकीचीकी बुबुम्बुम’, ‘पाणी’, ‘गुलाबी’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘अशी ही जमवा जमावी’, ‘स्थळ’, ‘सलतात रेशीम गाठी’ इत्यादी चित्रपट आतापर्यंत अमेरिका आणि कॅनडामधील चित्रपटगृहांमध्ये महाराष्ट्रातील प्रदर्शनाच्याच दिवशी प्रदर्शित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील मातब्बर निर्मिती व वितरण संस्थांसोबत नाफाने करार केले आहेत. आमच्या 'देऊळ’ चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्ण-कमळ पुरस्कार मिळाल्यानंतर उत्तर अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टी स्थापन करावी असा विचार मनात होता. या विचाराशी सहमत असलेले पाचशेहून अधिक सदस्य अल्पावधीतच या कामाशी जोडले गेले. दोन लघुपटाची निर्मिती करण्याचे ध्येय ठेवून ‘फिल्म क्लब’च्या तयारीला लागलो. अनेक कलावंत, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, गायक, कवी, सिनेमॅटोग्राफर्स, संकलक यांनी फिल्म क्लबमध्ये नोंदणी केली. त्यासाठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची कार्यशाळा आयोजित केली. याशिवाय टॉक शोज, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, डॉ. सलील कुलकर्णी, सचिन खेडेकर, समीर चौघुले, अभिजीत देशपांडे यांच्या कार्यशाळा, चर्चासत्रांच्या माध्यमातून आमचे काम सुरू असल्याचे घोलप यांनी सांगितले. यावर्षीच्या 'नाफा''मराठी चित्रपट महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.

बुधवार, ७ मे, २०२५

संगीतकार अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर

संगीतकार अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर मुंबई, दि. ७ मे संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा 'कृतज्ञता गौरव पुरस्कार'ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि रोख ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष असून पुरस्कार वितरण सोहळा येत्या १० मे रोजी संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल व पौडवाल कुटुंबीयांच्या उपस्थितीत उत्तरा केळकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पार्श्वगाय जी. मल्लेश, संगीतकार राम कदम,यशवंत देव, प्रभाकर जोग,दत्ता डावजेकर,अशोक पत्की,संगीत संयोजक श्यामराव कांबळे, तालवादक जयसिंग भोई, प्रमोद साने, संतूर वादक - उल्हास बापट, गीतकार जगदीश खेबुडकर,शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर,भावगीत गायक अरुण दाते आणि अन्य मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उत्तरा केळकर यांच्या गायन कारकिर्दीला ५३ वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी १२ विविध भाषांमध्ये ४२५ हुन अधिक चित्रपटांसाठी तर साडेसहाशेहून अधिक ध्वनीफिती,सीडी तसेच अनेक लघुपट, जाहिरातींसाठी पार्श्वगायन केले आहे.

सोमवार, ५ मे, २०२५

'मुक्काम पोस्ट देवाच घर' पाच भारतीय भाषांमध्ये डब

पाच भारतीय भाषांमध्ये डब केलेला पहिला मराठी चित्रपट 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' मुंबई, दि‌ ५ मे हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'हा मराठी चित्रपट डब करण्यात आला असून पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट पाहता येणार आहे.‌ कीमाया प्रॉडक्शन्सची निर्मित असलेल्या या चित्रपटाचे निर्माते आणि निर्माते महेश कुमार जायस्वाल,कीर्ती जायस्वाल आहेत. चित्रपटाची कथा कोणत्याही एका विशिष्ठ भाषेतील लोकांची नसून आपल्या सर्वांच्या सभोवताली घडणारी आहे.ही कथा देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाच भारतीय भाषांमध्ये चित्रपट डब करण्यात आल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले.

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

सुलट प्रेमाची उलट गोष्ट 'मंगलाष्टक रिटर्न'!

सुलट प्रेमाची उलट गोष्ट 'मंगलाष्टक रिटर्न'! मुंबई, दि. २८ एप्रिल 'सुलट प्रेमाची उलट गोष्ट' अशी टॅगलाईन असलेला 'मंगलाष्टक रिटर्न' हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या दोन कुटुंबांतील युवक व युवती एकाच महाविद्यालयात एकत्र येतात. एकमेकांचे विरोधक असलेल्या कुटुंबात व या दोघांच्याही आयुष्यात पुढे काय घडते? हे ' मंगलाष्टक रिटर्न' मध्ये पाहायला मिळणार आहे. वृषभ शाह, शीतल अहिरराव या नव्या जोडीसह चित्रपटात प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर इत्यादी कलाकार आहेत‌. शारदा फिल्म्स प्रॉडक्शनच्या वीर कुमार शहा यांनी निर्मिती या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले असून डॉ. भालचंद्र यांनी कथा आणि संवादलेखन, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन, विकास सिंह यांनी छायांकन, एस. विक्रमन यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.

सोमवार, २१ एप्रिल, २०२५

सोनी मराठी वाहिनीवर आज काय बनवू या...?

सोनी मराठी वाहिनीवर येत्या ५ मेपासून ‘आज काय बनवू या...? मधुरा स्पेशल’ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. ‘मधुराज् रेसिपीज्’ या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या मधुरा बाचल हा कार्यक्रम सादर करणार आहेत. महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या पाककृती आणि प्रेक्षकांचे आवडते पदार्थ यात पाहायला मिळतील.
सोमवार ते शुक्रवार, दुपारी एक वाजता कार्यक्रम प्रसारित होणार आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातील विशेष खाद्यपदार्थ कार्यक्रमात तयार करून दाखवले जाणार आहेत.

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

'चित्रपताका' महोत्सवाची नावनोंदणी प्रक्रिया सुरू

'चित्रपताका'महोत्सवाच्या नावनोंदणी प्रक्रिाेला सुरूवात मुंबई, दि. १२ एप्रिल महाराष्ट्र शासनाच्या 'चित्रपताका' या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. चित्रपट रसिकांना https://evnts.info/chitrapatakafest2025 या लिंकवर ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे.तसेच प्रभादेवी, दादर येथील पु .ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात ऑफलाइन पद्धतीनेही नावनोंदणी करता येणार असून महोत्सवात विनामूल्य प्रवेश आहे. महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी,दादर येथे हा महोत्सव होणार आहे. महोत्सवामध्ये प्रेक्षकांना नाटकांसह विविध विषयांवरील ४१ आशयघन चित्रपट विनामूल्य पाहता येणार आहेत.परिसंवाद, मुलाखत, कार्यशाळाही यावेळी होणार आहेत.

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

रहस्यमय'छबी'पुढील महिन्यात प्रदर्शित होणार

रहस्यमय'छबी'पुढील महिन्यात प्रदर्शित होणार मुंबई, दि. १० एप्रिल कोकणात छायाचित्रण करणा-या एका छायाचित्रकाराला आलेल्या गूढ व रहस्यमय अनुभवाची गोष्ट 'छबी' या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.चित्रपटाचा टीझर प्रकाशित झाला असून हा चित्रपट येत्या ९ मेपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.केके फिल्म्स क्रिएशन,उप्स डिजिटल एंटरटेन्मेेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. छायाचित्र स्पर्धेसाठी एक तरूण छायाचित्रकार कोकणातील एका गावात छायाचित्रे काढतो.मात्र त्या छायाचित्रात कोणीच दिसत नाही. हे गूढ काय आहे? याचा शोध हा छायाचित्रकार घेतो. ध्रुव छेडा,सृष्टी बाहेकर,अनघा अतुल,रोहित लाड,ज्ञानेश दाभणे , अपूर्वा कवडे आणि समीर धर्माधिकारी,मकरंद देशपांडे,शुभांगी गोखले,राजन भिसे,जयवंत वाडकर हे कलाकार चित्रपटात आहेत. जया तलक्षी छेडा निर्मात्या असून चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांचे आहे. टिझर लिंक https://youtu.be/93Euj4tUOuY?si=3VOv-cMi2eN-L9hF

'मुक्काम पोस्ट देवाचं घर'आता ॲमेझॉन प्राइमवर

'मुक्काम पोस्ट देवाचं घर'आता ॲमेझॉन प्राइमवर मुंबई,दि. १० एप्रिल देवाचं घर म्हणजे काय? ते नक्की कुठे असते? या एका लहान मुलीला पडलेल्या प्रश्नाचे 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात सादर करण्यात आले आहे. या वर्षी ३१ जानेवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ॲमेझॉन प्राइम ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महेशकुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे चित्रपटाचे निर्माते असून वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत मानेंसह सुमित गिरी यांनी पटकथालेखन व संवादलेखन केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केले आहे.‌ बाल कलाकार मायरा वायकुळसह सविता मालपेकर,उषा नाडकर्णी,प्रथमेश परब,मंगेश देसाई,कल्याणी मुळे,रेशम श्रीवर्धन हे कलाकार चित्रपटात आहेत.

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण

पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुंबई दि.८ महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोधचिन्हाचे अनावरण झाले.महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार- मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, तसेच महोत्सवाचे संचालक ज्येष्ठ निर्माते,दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे उपस्थित होते. मराठी सिनेमाची चित्रपताका घेऊन अटकेपार जाणारा मावळा या अर्थाने राज्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे नाव 'चित्रपताका' असे ठेवण्यात आले आहे. त्याचेच प्रतिकात्मक रूप बोधचिन्हात उमटले असून घोड्यावर बसलेला, हातात पताका आणि रिळ स्वरूपातील ढाल घेऊन पुढे चाललेला मराठी चित्रपटकर्मी मावळा या बोधचिन्हात दाखविण्यात आला आहे, असे ॲड. शेलार यांनी सांगितले. चार दिवसांच्या चित्रपट महोत्सवात एकूण ४१ दर्जेदार मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. चित्रपटांची निवड करण्यासाठी डॉ.संतोष पाठारे, सुकन्या कुलकर्णी, समीर आठल्ये आणि पुरुषोत्तम बेर्डे या तज्ज्ञांची निवड समिती नेमण्यात आली होती. महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील विविध विषयांवर पाच परिसंवाद, दोन मुलाखती आणि दोन कार्यशाळा होणार असल्याचेही ॲड. शेलार म्हणाले. महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेश असून ऑनलाईन वा प्रत्यक्ष कला अकादमी येथे येऊन महोत्सवासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे.

मंगळवार, २५ मार्च, २०२५

नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार

नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार

- पोलिसांच्या गणवेशाचा अवमान करणारी जाहिरात हटवली

मुंबई, दि. २५ मार्च

हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांच्या गणवेशात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकींना दाखवणारी आणि जनतेला जुगार खेळण्यास प्रवृत्त करणारी वादग्रस्त ‘बिग कॅश पोकर’ जाहिरात सोशल मीडियावरून अखेर हटविण्यात आली आहे. मात्र दोषींवर कारवाई अद्याप झालेली नाही. 

जाहिरात हटवण्यात आली असली, तरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश’चे मालक अंकुर सिंग यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सुराज्य अभियानाने या प्रकरणात वेळोवेळी फेसबुक, यू-ट्यूब आणि ट्विटर (X) यांच्या तक्रार निवारण अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. अखेरीस तक्रार अपील समिती (GAC) कडे तक्रार केली आणि त्यानंतरच ही जाहिरात हटवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता अमिता सचदेवा यांच्या कायदेशीर हस्तक्षेपामुळे हे यश मिळाले आहे. 

सुराज्य अभियानाच्या वतीने सतीश सोनार, रवी नलावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली आणि ही जाहिरात पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.‌ गृहराज्यमंत्री कदम यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांना तपास करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

जे पोलीस खाते जुगार खेळणार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करते, त्याच पोलिसांच्या वेशात अशी जाहिरात केली जाते, हे पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे आणि व्यावसायिक फायद्यासाठी समाजाची दिशाभूल करणारे आहे. यात ‘बडे काम का खेल’ असे म्हणून ‘जुगार’ हा गुन्हे उकलण्यासाठी आवश्यक कौशल्य असल्याचे पोलीस वेशातील नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यांकडून प्रचारित करण्यात आले होते, तसेच यात भगवद्गीतेचाही अवमान करण्यात आला होता. त्यामुळे सुराज्य अभियानाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश पोकर’ आस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची, तसेच भविष्यात पोलीस दलाच्या प्रतिमेचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर धोरण आखण्याची मागणी सरकारकडे केली आहे. 

रविवार, ७ एप्रिल, २०२४

महाभाग कसला? महाबोगस एपिसोड... प्रेक्षकहो, 'ठरलं तर' मालिकेला आपटवा

महाभाग कसला? महाबोगस एपिसोड...

प्रेक्षकहो, 'ठरलं तर' मालिकेला आपटवा 

शेखर जोशी 

अगं बाई तुला एखाद्या गरीब, गरजू माणसाला मदत करायची आहे तर एखाद्या चांगल्या संस्थेत जा आणि आर्थिक मदत कर. कोण, कुठला, ओळख ना पाळख असलेला रस्त्यावरचा माणूस भेटतो आणि सायली त्या माणसाला आपल्या योजनेत सामील करून घेते? प्रथितयश वकील असलेला अर्जुन या कामासाठी त्याच्या माहितीतील शिक्षा भोगून सुटलेल्या एकाची मदत घेणार असतो तर सायली आपली अक्कल पाजळते आणि त्याला विरोध करते. 

 रविराज किल्लेदार. हा ही हुषार, गाजलेला वकील. पण आपला भाऊ, आपली मुलगी प्रिया काय करतात? हे त्याला कळत नाही. दोघेही त्याला गुंडाळून ठेवतात. प्रिया कोणत्या कॉलेजमध्ये जाते? तिथे काय दिवे लावते? स्टडी टूरच्या नावाखाली काय करते? हे याला कळत नाही. 

तो चैतन्य महामुर्ख. अण्णा व साक्षीच्या घरात राहतो. पण या दोघांचे बोलणे कधीच त्याच्या कानावर पडत नाही. सायलीला कीडनॅप करून घरात आणून ठेवलाय, तिला तिथून दुसरीकडे घेऊन जाताहेत आणि घरात इतकं काय काय घडताय पण चैतन्यला यातले काही कळत नाही.

अस्मिता गेल्या अनेक महिन्यांपासून माहेरीच येऊन राहिलेली आहे. सायली विरोधात कट कारस्थाने सुरू आहेत. स्वतः काही गुन्ह्यात पकडली गेली आहे. तरी ती अजूनही माहेरीच राहते आहे. मधुनच कधीतरी तिची आई व पूर्णा आजी तिला मी मारल्यासारखे करते आणि तू रडल्यासारखे कर असे बोलतात पण तिला येथून चालती हो म्हणत नाहीत. 

प्रतिमा कुठे गायब झाली? 

सगळ्यात महत्त्वाचे. प्रतिमा. काही भागात तिला दाखवून आता पूर्णपणे गायब केली आहे. त्या कुसुमच्या घरून ती कुठे गेली? अदृश्य झाली काही पत्ता नाही. मधुभाऊ बिचारे अजून विलासच्या खुनाच्या आरोपाखाली आतच आहेत. वात्सल्य आश्रम खटला, प्रतिमा हे मालिकेतील मुख्य घटक आहेत, पण तेच कुठे दिसत नाहीत. मधेच कधीतरी त्यांची आठवण होते आणि चटणी, कोशिंबीरीसारखे तोंडी लावायला त्यांचा उल्लेख केला जातो. हे मूळ कथानक पुढे जाण्याऐवजी फालतू आणि रटाळ उपकथानक जोडून एपिसोड वाढवत चालले आहेत. महाएपिसोडच्या नावाखाली तासभर प्रेक्षकांच्या माथी काहीही थोपवले जात आहे. सायली अर्जुनचा हनिमून, माथेरान भाग त्याचाच एक भाग होता. 

शेजो उवाच 

https://youtu.be/rGdvBpCttvo?feature=shared

प्रेक्षक मालिका पाहताहेत म्हणून तुम्ही टीआरपीत सध्या एक नंबरवर आहात. पण असा एपिसोडकाढूपणा केलात तर धाडकन खाली आपटायला वेळ लागणार नाही. नव्हे आता ती वेळ आली आहे. फक्त प्रेक्षकांनी 'ठरलं तर मग' असे म्हटले पाहिजे. इथे काही जण म्हणतील, रिमोट तुमच्या हातात आहे, बंद करा, पाहू नका. अनेक प्रेक्षक तसे करतातही. पण

आपण प्रेक्षकांच्या जे माथी मारू ते चांगलेच आहे, आम्ही आम्हाला पाहिजे ते करू असे करण्याचा ठेका वाहिनी, लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांना कोणीही दिलेला नाही. निषेधाचा सूर उटटलाच पाहिजे. प्रेक्षकांनी मालिकेला आपटायचे ठरवले, समाज माध्यमातून टीका केली की मालिकांना कशा प्रकारे गाशा गुंडाळावा लागतो, वेळ बदलावी लागते त्याची उदाहरणे आहेत. 'ठरलं तर मग' असे प्रेक्षकांनी मनाशी ठरवून तुमची मालिका पाडायच्या आधी जागे व्हा, कथानक वेगाने पुढे न्या, महाएपिसोडच्या नावाखाली काहीही प्रेक्षकांच्या माथी मारू नका. 

- शेखर जोशी 

७ एप्रिल २०२४

शेजो उवाच

 https://youtu.be/rGdvBpCttvo?feature=shared


शुक्रवार, २३ जून, २०२३

भूमिकांची उलटापालट आणि दुतोंडीपणा उघड

'आदिपुरुष'च्या निमित्ताने...

भूमिकांची उलटापालट आणि दुतोंडीपणा उघड 

शेखर जोशी

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या वादग्रस्त, बिभत्स चित्रपटाच्या निमित्ताने तथाकथित ढोंगी पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्या भूमिकांची उलटापालट झाली असल्याचे दिसून येत आहे. आणि या दोन्ही बाजूंचा दुतोंडीपणाही उघड झाला आहे.

सहा महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर/ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याचवेळी दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपटाच्या सादरीकरणावर प्रचंड टीका झाली. खरे तर त्या टिझरवरूनच चित्रपट टुकार, बीभत्स आणि तमाम भारतीयांच्या मनातील रामायणाचे प्रतिमाभंजन करणारा आहे हे लक्षात आले होते. त्यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी चित्रपटाला विरोध केला तर मनसेचे अमेय खोपकर यांनी राऊत यांना समर्थन दिले. चित्रपट पूर्ण पाहा आणि मग ठरवा, ओम राऊत हे हिंदुत्ववादी आहेत, अशी भलामण त्यांनी केली. चित्रपट प्रदर्शित झाला. आणि आता भाजपचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व नेते, लोकप्रतिनिधी यांची आणि मनसेची, राज ठाकरे यांचीही अळी मिळी गुप चिळी आहे.

आधुनिक काळातील क्रूरकर्मा मुस्लिम दहशतवादी किंवा इतिहासातील क्रूरकर्मा अफझलखानासारख्या दिसणा-या विध्वंसक मुसलमानाच्या वेषातील रावण, त्याच्याच जवळ जाणारा हनुमान, बीभत्स आणि वटवाघूळ सदृश्य पुष्पक विमान, काळोखी लंका, टॅट्यू काढलेला इंद्रजित, हनुमानाच्या तोंडी दिलेले 'जली' असले टपोरी प्रकारचे संवाद आणि बरेच काही. हे सर्वच न पटणारे आहे. काहीतरी नवीन, वेगळे करण्याच्या नावाखाली, दिग्दर्शकीय स्वातंत्र्याच्या नावाखाली ओम राऊत यांनी ज्या विकृत, बीभत्स पद्धतीने आदिपुरुष सादर केला आहे, ते पाहता कोणाही सुजाण, भारतीय संस्कृती, आपले वेद, पुराणे, पौराणिक देव देवता याविषयी आस्था, प्रेम, आदर असणा-यांना चीडच येईल. झापडे लावून याचे समर्थन करणेच चुकीचे आहे. 

हिंदुत्व, भारतीय संस्कृती, परंपरा याचा अभिमान, गर्व असणारी लोकं उजवी म्हणून ओळखली जातात, त्यांना कुचेष्टेने प्रतिगामी म्हटले जाते. तर बहुसंख्यांकांची आस्था, त्यांची दैवते, हिंदुत्व, हिदू संस्कृतीची टिंगल टवाळी करणे, अल्पसंख्याकांचे विशेषतः मुस्लिमांचे लांगुलचालन करणे म्हणजे पुरोगामी असल्याचे समजले जाते. काश्मीर फाईल्स, केरळ स्टोरी या चित्रपटांना याच ढोंगी पुरोगामी मंडळींनी विरोध केला. खरे तर भारतात काश्मीर प्रश्नांबाबत जे काही घडले त्याचे आणि लव्ह जिहादच्या भयाणतेचे वास्तव चित्रण अनुक्रमे या दोन्ही चित्रपटातून सादर करण्यात आले. ते कटू असले तरी सत्य होते. इतर वेळी भावना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणा-या ढोंगी पुरोगामी मंडळींनी दोन्ही चित्रपटाला विरोध केला. यात सर्व कॉंग्रेसी,डावे, समाजवादी, निधर्मवादी, सर्वधर्मसमभाववादी या पुरोगाम्यांचा समावेश होता. दोन्ही चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही यांनी केली होती. तर हिंदुत्ववादी म्हणवून घेणारा भाजप, कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर काही हिंदुत्ववादी संघटना, नेते यांनी या चित्रपटांचे समर्थन केले. 

आता आदिपुरुष बाबतीत याच भूमिकांची उलटापालट झाली आहे. आदिपुरुष म्हणजे रामायणाचे आणि त्यातील व्यक्तिरेखांचे उघडपणे केलेले प्रतिमाभंजनच आहे हे दिसताय. पण तरीही महाराष्ट्रातील किंवा देशातील एकाही भाजप नेत्यांने, लोकप्रतिनिधीने, पदाधिकाऱ्यांने चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलेली नाही. सादरीकरणावरून दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मुंतशीर यांचा विरोध/ निषेध केलेला नाही. 'पठाण' चित्रपटात भगवी बिकिनी घातली म्हणून तो चित्रपट बंद पाडण्याची भाषा करणारे हिंदुत्ववादी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिपुरुषबाबत मूग गिळून गप्प आहेत. आणि याच्या उलट डावे, कॉंग्रेसी, समाजवादी असे तथाकथित पुरोगामी चित्रपटाच्या विरोधात बोलत आहेत. बंदी घालण्याची मागणी करत आहेत. राज ठाकरे, मनसेही गप्प आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत आलो असे सांगणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चित्रपटाचा निषेध किंवा विरोध केलेला नाही. आता शिंदे गटातील खासदार श्रीरंग बारणे यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 


मुळात हा चित्रपट केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने मंजूर कसा केला हे कोडे आहे. याच केंद्रीय सेन्सॉर बोर्डावर प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, हिंदुत्ववादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रमेश पतंगे सदस्य आहेत. चित्रपटासाठी तज्ज्ञ अभ्यासक म्हणून व्याख्याते, प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे यांनी काम केले आहे. ज्या देवदत्त नागे यांनी 'खंडोबा' ची भूमिका केली ते या चित्रपटात हनुमानाच्या भुमिकेत आहेत. याशिवाय अजय अतुल, प्रसाद सुतार, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे ही मंडळीही चित्रपटाशी संबंधित आहेत. या सर्वांनी झापडे लावून, डोळ्यांवर पट्टी बांधून काम केले का? चित्रपटाचा टिझर आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, सर्व स्तरातून प्रचंड टीका होत असताना, समाज माध्यमांतूनही अत्यंत प्रक्षुब्ध भावना व्यक्त होत असताना ही सर्व मंडळी गप्प आहेत. ओम राऊत, मनोज मुंतशीर यांच्याकडून किंवा वरील अन्य काही जणांकडून केलेल्या कृतीचे समर्थन करण्यात येत आहे ते अजिबात न पटणारे व चीड आणणारे आहे. तुम्ही चुकलात, माती खाल्ली हे मान्य करायला, कबुली द्यायला हिंमत लागते, ती तुम्ही दाखवावी.

तुमच्याविषयी सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनात जी प्रतिमा आहे, त्याला तुम्ही स्वतःच तडा देण्याचे कृती केली आहे. 'काम केले/झाले, सर्व काही मिळाले' आता होऊ दे काहीही. समाज माध्यमातून लोक चार दिवस बोलतील आणि विसरून जातील., अशी तुमची भूमिका आहे आणि असणार. म्हणूनच तुम्ही सर्व गप्प आहात. तुमचेही बरोबरच आहे म्हणा. खरेच आहे, लोकं चार, आठ दिवसांत सर्व काही विसरून जातात. अशा लिहिण्याने काही फरक पडणार नाही, हे माहीत असूनही मनातील खदखद व्यक्त केली आहे. मला वाटले ते लिहिले.

शेखर जोशी

२३ जून २०२३

रविवार, ५ मार्च, २०२३

'वसंत' ऋतूचे संगीत

 

संगीतकार वसंत प्रभू 

‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला’, ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’, ‘कळा ज्या लागल्या जिवा’, ‘चाफा बोलेना’, ‘जेथे सागरा धरणी मिळते’, ‘जन पळभर म्हणतीतल हाय हाय’, ‘मानसीचा चित्रकार तो’, ‘राधा कृष्णावरी भाळली’ ही आणि अशी अनेक अवीट गोडीची गाणी संगीतबद्ध करणारे संगीतकार वसंत प्रभू यांचे जन्मशताब्दी वर्ष या वर्षीच्या जानेवारी (१९ जानेवारी) पासून सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने...

पी. सावळाराम यांनी लिहिलेल्या ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’ या गाण्याने इतिहास निर्माण केला. पुणे रेल्वे स्थानकावर एका नवविवाहित मुलीची सासरी पाठवणी करताना आईच्या डोळ्यांत अश्रू होते. आईने मुलीची ‘सासरी सुखी राहा, डोळ्यात पाणी आणू नको’अशा शब्दांत समजूत काढली. पी. सावळराम हे त्या प्रसंगाचे एक साक्षीदार होते. प्रतिभावान सावळाराम यांनी त्या प्रसंगाला डोळ्यांसमोर ठेवून ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा’ हे गाणे लिहिले. लता मंगेशकर यांच्या आर्त स्वरातील या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक निर्माण केला. त्या काळात तर गाजलेच, पण आजही प्रत्येक मराठी लग्न या गाण्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आचार्य अत्रे यांनी या गाण्याचे कौतुक करताना ‘गंगा जमुना हे गाणे एका पारडय़ात आणि इतर सगळी गाणी दुसऱ्या पारडय़ात टाकली तरीही ‘गंगा जमुना’चे पारडेच जड होईल’ असे म्हटले होते. संगीतकार वसंत प्रभू, कवी/गीतकार पी. सावळाराम आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्रयीने मराठी भाव व चित्रपट संगीताला अनेक अवीट गोडीच्या गाण्यांची अमूल्य भेट दिली.


साधी व सोपी आणि सहज गुणगुणता येईल अशी चाल हे प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याचे ठळक वैशिष्टय़. संगीतकार अशी ओळख असलेल्या प्रभू यांनी सुरुवातीला हिंदी चित्रपटात ‘बाल अभिनेता’ म्हणून काम केले. वसंत प्रभू यांचे मूळ नाव व्यंकटेश प्रभू. पण हिंदी चित्रपटासाठी हे नाव चालणार नाही म्हणून त्यांचे ‘वसंत’ असे नामकरण करण्यात आले. प्रभू यांनी बाल कलाकार म्हणून पाच हिंदी चित्रपटांत काम केले. १९३८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जमाना’ या हिंदी चित्रपटात प्रभू यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन राम दर्यानी यांचे होते. ‘व्यंकटेश’ हे नाव चित्रपटासाठी योग्य ठरणार नाही म्हणून दर्यानी यांनी व्यंकटेशचे नामकरण ‘वसंत’ असे केले. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत ‘बाल अभिनेता वसंत’ असे त्यांचे नावही देण्यात आले. ‘जमाना’ या चित्रपटाखेरीज प्रभू यांनी ‘मास्टर मॅन’, ‘राजकुमारी’, ‘देखा जाएगा’, ‘जीवनसाथी’ या हिंदी चित्रपटात काम केले होते.


भार्गवराव पांगे हे प्रभू यांचे गुरू. त्यांच्या मेळ्यामधून ते काम करायला लागले. मेळ्यात ते गाणीही म्हणत असत. ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील एक गाणे २४ वेळा म्हटल्यामुळे (वन्समोअर घेत) त्यांचा आवाज फुटला. त्यामुळे त्यांना गाता येईना. त्यामुळे पांगे यांनी त्यांना मोरे नावाच्या गृहस्थांकडे नृत्य शिकायला पाठविले. नृत्य शिकल्यानंतर काही काळ त्यांनी नृत्यशिक्षक म्हणूनही काम केले. त्या काळात वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले ‘अरे पाटलाच्या पोरा जरा जपून’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. प्रभू ज्या मोरे यांच्याकडे नृत्य शिकायला जात होते, त्यांचा मोठा भाऊ कविता करायचा. त्यांनी याच गाण्यासारखे ‘अगं पाटलाच्या पोरी जरा जपून’ हे गाणे लिहिले व त्याला चाल लावायला प्रभू यांना सांगितले. प्रभू यांनी त्याला चालही लावली. ‘एचएमव्ही’ने त्याची ध्वनिमुद्रिका काढली. प्रभू यांची ती पहिली ध्वनिमुद्रिका. ‘पाटलाचा पोर’ हा संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता, 

प्रभू यांनी काही काळ ‘एचएमव्ही’मध्येही संगीत दिग्दर्शक म्हणून नोकरी केली. ‘एचएमव्ही’चे वसंतराव कामेरकर यांनी प्रभू यांच्यातील गुणवत्ता आणि प्रतिभा हेरली होती. ‘एचएमव्ही’मध्ये नोकरी करत असतानाच्या काळातही प्रभू यांच्याकडून अनेक उत्तमोत्तम गाणी तयार केली गेली. प्रभू यांनी सुमारे २५ चित्रपटांना संगीत दिले. भावगीतांप्रमाणेच त्यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटांतील गाणीही गाजली. ‘मानसीचा चित्रकार’ हे वसंत प्रभू यांचे चरित्र/आत्मचरित्र प्रसिद्ध असून ते मधू पोतदार यांनी लिहिले आहे. 

भगवान श्रीकृष्णाने ‘ऋतुनाम कुसुमाकर:’ अशा शब्दात भगवद्गीतेमध्ये वसंत ऋतूचे कौतुक केले आहे. मराठी साहित्यातही अनेक लेखक आणि कवींनी वसंत ऋतूचे वेगवेगळ्या शब्दांत वर्णन केले आहे. हर्षांचा, उत्साहाचा आणि संपूर्ण सृष्टीला नवे रूप देणारा ऋतू म्हणून वसंत ऋतूचे विशेष महत्त्व आहे. मराठी संगीतातही संगीतकार वसंत देसाई, वसंत पवार आणि वसंत प्रभू या तीन ‘वसंत’ नावांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. वेगवेगळ्या प्रकारची अजरामर गाणी देऊन संगीतात ‘वसंत’ऋतू निर्माण केला. १९ जानेवारी १९२४ मध्ये जन्मलेल्या 'वसंत' ऋतूचा ( प्रभू) १३ ऑक्टोबर १९६८ या दिवशी अस्त झाला.‌

 प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली काही लोकप्रिय गाणी 

आली हासत पहिली रात, कळा ज्या लागल्या जिवा, कोकिळ कुहूकुहू बोले, घट डोईवर घट कमरेवर, जो आवडतो सर्वाना, डोळे हे जुलमी गडे, मानसीचा चित्रकार तो, रघुपती राघव गजरी गजरी, राधा कृष्णावरी भाळली, राधा गौळण करिते, रिमझिम पाऊस पडे सारखा, पाहुनी रघुनंदन सावळा, लाजली सीता..सप्तपदी हे रोज चालते, हरवले ते गवसले का, प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला, मधु मागसी माझ्या सख्या परी, सखी शेजारिणी