शुक्रवार, २३ जून, २०२३

भूमिकांची उलटापालट आणि दुतोंडीपणा उघड

'आदिपुरुष'च्या निमित्ताने...

भूमिकांची उलटापालट आणि दुतोंडीपणा उघड 

शेखर जोशी

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या वादग्रस्त, बिभत्स चित्रपटाच्या निमित्ताने तथाकथित ढोंगी पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्या भूमिकांची उलटापालट झाली असल्याचे दिसून येत आहे. आणि या दोन्ही बाजूंचा दुतोंडीपणाही उघड झाला आहे.

सहा महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर/ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याचवेळी दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपटाच्या सादरीकरणावर प्रचंड टीका झाली. खरे तर त्या टिझरवरूनच चित्रपट टुकार, बीभत्स आणि तमाम भारतीयांच्या मनातील रामायणाचे प्रतिमाभंजन करणारा आहे हे लक्षात आले होते. त्यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी चित्रपटाला विरोध केला तर मनसेचे अमेय खोपकर यांनी राऊत यांना समर्थन दिले. चित्रपट पूर्ण पाहा आणि मग ठरवा, ओम राऊत हे हिंदुत्ववादी आहेत, अशी भलामण त्यांनी केली. चित्रपट प्रदर्शित झाला. आणि आता भाजपचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व नेते, लोकप्रतिनिधी यांची आणि मनसेची, राज ठाकरे यांचीही अळी मिळी गुप चिळी आहे.

आधुनिक काळातील क्रूरकर्मा मुस्लिम दहशतवादी किंवा इतिहासातील क्रूरकर्मा अफझलखानासारख्या दिसणा-या विध्वंसक मुसलमानाच्या वेषातील रावण, त्याच्याच जवळ जाणारा हनुमान, बीभत्स आणि वटवाघूळ सदृश्य पुष्पक विमान, काळोखी लंका, टॅट्यू काढलेला इंद्रजित, हनुमानाच्या तोंडी दिलेले 'जली' असले टपोरी प्रकारचे संवाद आणि बरेच काही. हे सर्वच न पटणारे आहे. काहीतरी नवीन, वेगळे करण्याच्या नावाखाली, दिग्दर्शकीय स्वातंत्र्याच्या नावाखाली ओम राऊत यांनी ज्या विकृत, बीभत्स पद्धतीने आदिपुरुष सादर केला आहे, ते पाहता कोणाही सुजाण, भारतीय संस्कृती, आपले वेद, पुराणे, पौराणिक देव देवता याविषयी आस्था, प्रेम, आदर असणा-यांना चीडच येईल. झापडे लावून याचे समर्थन करणेच चुकीचे आहे. 

हिंदुत्व, भारतीय संस्कृती, परंपरा याचा अभिमान, गर्व असणारी लोकं उजवी म्हणून ओळखली जातात, त्यांना कुचेष्टेने प्रतिगामी म्हटले जाते. तर बहुसंख्यांकांची आस्था, त्यांची दैवते, हिंदुत्व, हिदू संस्कृतीची टिंगल टवाळी करणे, अल्पसंख्याकांचे विशेषतः मुस्लिमांचे लांगुलचालन करणे म्हणजे पुरोगामी असल्याचे समजले जाते. काश्मीर फाईल्स, केरळ स्टोरी या चित्रपटांना याच ढोंगी पुरोगामी मंडळींनी विरोध केला. खरे तर भारतात काश्मीर प्रश्नांबाबत जे काही घडले त्याचे आणि लव्ह जिहादच्या भयाणतेचे वास्तव चित्रण अनुक्रमे या दोन्ही चित्रपटातून सादर करण्यात आले. ते कटू असले तरी सत्य होते. इतर वेळी भावना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणा-या ढोंगी पुरोगामी मंडळींनी दोन्ही चित्रपटाला विरोध केला. यात सर्व कॉंग्रेसी,डावे, समाजवादी, निधर्मवादी, सर्वधर्मसमभाववादी या पुरोगाम्यांचा समावेश होता. दोन्ही चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही यांनी केली होती. तर हिंदुत्ववादी म्हणवून घेणारा भाजप, कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर काही हिंदुत्ववादी संघटना, नेते यांनी या चित्रपटांचे समर्थन केले. 

आता आदिपुरुष बाबतीत याच भूमिकांची उलटापालट झाली आहे. आदिपुरुष म्हणजे रामायणाचे आणि त्यातील व्यक्तिरेखांचे उघडपणे केलेले प्रतिमाभंजनच आहे हे दिसताय. पण तरीही महाराष्ट्रातील किंवा देशातील एकाही भाजप नेत्यांने, लोकप्रतिनिधीने, पदाधिकाऱ्यांने चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलेली नाही. सादरीकरणावरून दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मुंतशीर यांचा विरोध/ निषेध केलेला नाही. 'पठाण' चित्रपटात भगवी बिकिनी घातली म्हणून तो चित्रपट बंद पाडण्याची भाषा करणारे हिंदुत्ववादी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिपुरुषबाबत मूग गिळून गप्प आहेत. आणि याच्या उलट डावे, कॉंग्रेसी, समाजवादी असे तथाकथित पुरोगामी चित्रपटाच्या विरोधात बोलत आहेत. बंदी घालण्याची मागणी करत आहेत. राज ठाकरे, मनसेही गप्प आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत आलो असे सांगणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चित्रपटाचा निषेध किंवा विरोध केलेला नाही. आता शिंदे गटातील खासदार श्रीरंग बारणे यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 


मुळात हा चित्रपट केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने मंजूर कसा केला हे कोडे आहे. याच केंद्रीय सेन्सॉर बोर्डावर प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे, हिंदुत्ववादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रमेश पतंगे सदस्य आहेत. चित्रपटासाठी तज्ज्ञ अभ्यासक म्हणून व्याख्याते, प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे यांनी काम केले आहे. ज्या देवदत्त नागे यांनी 'खंडोबा' ची भूमिका केली ते या चित्रपटात हनुमानाच्या भुमिकेत आहेत. याशिवाय अजय अतुल, प्रसाद सुतार, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे ही मंडळीही चित्रपटाशी संबंधित आहेत. या सर्वांनी झापडे लावून, डोळ्यांवर पट्टी बांधून काम केले का? चित्रपटाचा टिझर आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, सर्व स्तरातून प्रचंड टीका होत असताना, समाज माध्यमांतूनही अत्यंत प्रक्षुब्ध भावना व्यक्त होत असताना ही सर्व मंडळी गप्प आहेत. ओम राऊत, मनोज मुंतशीर यांच्याकडून किंवा वरील अन्य काही जणांकडून केलेल्या कृतीचे समर्थन करण्यात येत आहे ते अजिबात न पटणारे व चीड आणणारे आहे. तुम्ही चुकलात, माती खाल्ली हे मान्य करायला, कबुली द्यायला हिंमत लागते, ती तुम्ही दाखवावी.

तुमच्याविषयी सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनात जी प्रतिमा आहे, त्याला तुम्ही स्वतःच तडा देण्याचे कृती केली आहे. 'काम केले/झाले, सर्व काही मिळाले' आता होऊ दे काहीही. समाज माध्यमातून लोक चार दिवस बोलतील आणि विसरून जातील., अशी तुमची भूमिका आहे आणि असणार. म्हणूनच तुम्ही सर्व गप्प आहात. तुमचेही बरोबरच आहे म्हणा. खरेच आहे, लोकं चार, आठ दिवसांत सर्व काही विसरून जातात. अशा लिहिण्याने काही फरक पडणार नाही, हे माहीत असूनही मनातील खदखद व्यक्त केली आहे. मला वाटले ते लिहिले.

शेखर जोशी

२३ जून २०२३

1 टिप्पणी:

KG म्हणाले...

तुम्ही योग्य परीक्षण केले आहे... खरंच सेन्सॉर बोर्डावरील कमिटी मूग गिळून कशी बसू शकतात... किंवा त्यांनीही गप्प बसण्याचे काही घेतले असेल अशी शंका येते...