सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५
'आवाज'चा अमृत महोत्सव!
'आवाज'चा अमृत महोत्सव!
शेखर जोशी
'विनोदी वार्षिक' असे बिरूद मिरविणाऱ्या 'आवाज' या वार्षिकाचा यंदाचा दिवाळी अंक 'अमृत महोत्सवी' अंक आहे. 'आवाज' चे संस्थापक- संपादक मधुकर पाटकर यांनी १९५१ च्या दिवाळीमध्ये आवाज वार्षिक प्रकाशनला सुरुवात केली. यंदा आवाज ७५ वर्षांचा झाला.
'हवालदिल मानवाला प्रफुल्लित करणाऱ्या फटाकड्यांच्या 'आवाजां'ची तरी आजच्या काळात खात्री कोण देईल? इतके मात्र खरे 'आवाज'चा हा दिवाळी अंक त्यांना पोटभर हासवील, रिझवील नि त्यांची करमणूकही करील' असे 'आवाज' वार्षिकाच्या पहिल्या दिवाळी अंकाच्या मनोगतात मधुकर पाटकर यांनी म्हटले होते. मधुकर पाटकर यांच्या पश्चात पाटकर यांचे सुपुत्र आणि 'आवाज'चे संपादक -प्रकाशक भारतभूषण पाटकर यांनी हा वारसा 'आवाज'च्या अमृत महोत्सवी वर्षीही पुढे चालविला आहे.
त्या काळात दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर महिलांची चित्रे/ छायाचित्रे असणे हा अलिखित नियम होता. 'आवाज' त्याला अपवाद ठरला आणि 'आवाज' ने मुखपृष्ठावरती विनोदी चित्रे/हास्यचित्रेच प्रकाशित केली. १९६० च्या दिवाळी अंकापासून ' आवाज'च्या मुखपृष्ठाला 'खिडकी चित्रां'ची जोड मिळाली. खिडकी चित्र हे आवाजचे खास वैशिष्ठ्य आहे. पुढे इतर काही दिवाळी अंकात या खिडकी चित्रांचे अनुकरण केले गेले.
'आवाज'च्या सुरुवातीच्या काही अंकांचे स्वरूप निखळ विनोदी नव्हते. मात्र १९५३ पासून मुखपृष्ठापासून ते आतील मजकूरापर्यंत 'आवाज' मध्ये अधिकाधिक विनोदी साहित्य, व्यंगचित्रे, हास्यचित्रे, कथा, कादंबरी देण्यास सुरुवात झाली. आणि 'आवाज' संपूर्ण विनोदी वार्षिक झाले. वाचनालयात वाचक 'आवाज' साठी नंबर लावू लागले. १९८९ मध्ये 'आवाज'च्या सुमारे पाऊण लाख अंकांची विक्री झाली आणि दिवाळी अंक विक्रीत 'आवाज'ने एक नवा इतिहास निर्माण केला.
'आवाज' दिवाळी अंकात सुरुवातीपासून ते आजपर्यंत प्रथितयश तसेच प्रयोगशील नवोदित लेखक आणि चित्रकारांना स्थान दिले. महिला लेखिकांचेही विनोदी साहित्य 'आवाज' विनोदी वार्षिकात सातत्याने प्रकाशित होत आहे. 'आवाज' वार्षिकाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे 'आवाज'मध्ये प्रसिद्ध झालेल्या कथांवरून पुढे काही मराठी, हिंदी चित्रपट आणि नाटके सादर झाली.
गेल्या ७५ वर्षात 'आवाज'ला उत्कृष्ट निर्मितीसह विविध गटांत विभागात शासन आणि सार्वजनिक संस्थांकडून अनेक पुरस्कार, 'आवाज' मधील विविध साहित्याला आणि चित्र साहित्यालाही स्वतंत्र पुरस्कार मिळाले आहेत.
आवाजाच्या पुढील वाटचालीसाठी आणि शतक महोत्सवी दिवाळी अंकासाठी शुभेच्छा.
शेखर जोशी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा