बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५

जल आणि वन संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ७३ वर्षीय विद्याधर भुस्कुटे यांची पदयात्रा

जल आणि वन संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ७३ वर्षीय विद्याधर भुस्कुटे यांची पदयात्रा - महाराष्ट्रात ३ हजार १२५ किलोमीटरचा प्रवास डोंबिवली, दि. २९ ऑक्टोबर जल आणि वन संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी डोंबिवलीतील ७३ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुस्कुटे येत्या ३१ ऑक्टोबरपासून पदयात्रा सुरू करणार आहेत.‌ महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमधून ३ हजार १२५ किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे.‌ डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक येथून सकाळी साडेसात वाजता पदयात्रेला भुस्कुटे सुरुवात करणार आहेत.‌ आरोहण या संस्थेने या पदभ्रमंतीचे नियोजन केले आहे. जल आणि वनसंवर्धनासह देशात, राज्यात शांती, मानवता, भ्रृणहत्या प्रतिबंध, मूल्याधिष्ठीत शिक्षण व्यवस्था यावर पदयात्रेत ते जनजागृती करणार आहेत. २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत भुस्कुटे डोंबिवलीत परतणार आहेत. यावेळी भुस्कुटे यांची चौथी पदयात्रा असून भुस्कुटे यांनी पहिली पदयात्रा काश्मीर ते कन्याकुमारी केली होती.‌ चार हजार किलोमीटरच्या या पदयात्रेची लिम्का बुक, अशिया आणि इंडिया बुक्स ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे. दुसरी पदयात्रा अरूणाचल प्रदेशातील किबिथू ते गुजरातमधील पोरबंदर अशी चार हजार किलोमीटरची होती. या पदयात्रेचीही लिम्का बुकमध्ये नोंद झाली. तिसरी पदयात्रा गुजरातमधील साबरमती आश्रम, अहमदाबाद, शांतिनिकेतन, कोलकोता, भारताच्या किनारपट्टी मार्गाने तामीळनाडू ते कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक अशी केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: