कोट्यवधी भारतीयांच्या मनातील रामाच्या प्रतिमेचे उघडपणे भंजन
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का?
शेखर जोशी
काश्मीर फाईल्स, केरळ स्टोरीला विरोध करणा-यांच्या विरोधात भाजपवाले आक्रमक झाले होते. तो आक्रमकपणा आता कोट्यवधी भारतीयांच्या मनातील राम, हनुमान आणि रामायणाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणा-या 'आदिपुरुष' विरोधात का नाही? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपच्या इतर बोलघेवड्या नेत्यांनीही या विषयावर मत/ प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. किंवा आदिपुरुषच्या विरोधात चकार शब्द काढला नाही. सगळे मूग गिळून गप्प बसले आहेत.
देशभरातील विविध राज्यांमधील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची नावे 'विथ युवर ब्लेसिंग' या शीर्षकाखाली चित्रपटात दाखविण्यात आली आहेत म्हणे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव आहे. चित्रपटात राम, हनुमान, रावण यांचे जे प्रतिमाभंजन केले आहे, आक्षेपार्ह संवाद असल्याचे सांगण्यात येत आहे, त्याला फडणवीस यांची मुकसंमती आहे का? आणि चित्रपटात दाखविण्यात आलेली राम, रावण, हनुमान यांची प्रतिमा तुम्हालाही पटली नसेल तर मला ती पटलेली नाही, त्यामुळे
'विथ युवर ब्लेसिंग' या शीर्षकाखाली टाकण्यात आलेले आपले नाव काढून टाकावे, असे तरी फडणवीस यांनी जाहीर करावे. पण या विषयावर त्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही अळी मिळी गुप चिळी आहे.
सहा/आठ महिन्यांपूर्वी चित्रपटाची झलक (टिझर, ट्रेलर) प्रकाशित झाली तेव्हाच संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. याची दखल घेऊन चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने चित्रपटात काही बदल करण्यास सांगितले होते. मात्र आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समाजमाध्यमातून तीव्र संतापाच्या ज्या ठिणग्या उडत आहेत, ते वाचून/पाहून तसे कोणतेही बदल केले गेले नाहीत, हे दिसून येते. या हजारो/लाखो समाजमनांची, त्यांच्या भावनांची दखल किमान महाराष्ट्रापुरती तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली नाही, ही चीड आणणारी गोष्ट आहे.
मूळ शिवसेनेने आत्ताचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी हिंदुत्व सोडले म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती शिवसेना सोडली. आता तर शिंदे यांचीच शिवसेना खरी यावरही निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. 'आदिपुरुष' मधून राम, हनुमान, रावण आणि एकूणच रामायणाचे जे प्रतिमाभंजन करण्यात आले त्याच्याशी शिंदे सहमत आहेत का? नसतील तर ते आपले नाव 'विथ युवर ब्लेसिंग' मधून काढायला सांगणार का? हिंदुत्ववादी म्हणून या टुकार, बीभत्स चित्रपटावर बंदी घालणार का? किमान चित्रपटात रामायण ज्या प्रकारे सादर करण्यात आले आहे ते आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका घेणार का?
आम्ही हिदुत्व सोडलेले नाही, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे सतत सांगत असतात. पण या चित्रपटाच्या विरोधात त्यांनीही तोंड उघडलेले नाही. त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार असलेल्या भारतकुमार राऊत यांच्या मुलाचा चित्रपट असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीही अळी मिळी गुप चिळी आहे का?
खरे तर हा चित्रपट बहिष्कार टाकून पूर्ण पूर्णपणे आपटवला पाहिजे. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या एक, दोन दिवसांत जो गल्ला जमा झाला ते पाहता हे झालेले नाही, हे दिसून येते. आमच्या तमाम भारतीयांच्या मनात रामानंद सागर यांचेच रामायण आणि या मालिकेतील पात्र ठसलेली आहेत. त्यामुळे काहीतरी नवीन करण्याच्या कारणाने, हा आजच्या काळातील चित्रपट आहे असे सांगून ओम राऊत, संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी सांगितले, त्यांनी ज्या प्रकारे चित्रपट सादर केला आहे, त्याचे समर्थन केले आहे ते अजिबात पटणारे नाही.
चित्रपटातील 'रावण' मला आजच्या काळातील क्रूरकर्मा/राक्षस म्हणून दाखवायचा होता, असे ओम राऊत म्हणतात. मग ओसामा बिन लादेन, दाऊद इब्राहिम, सद्दाम हुसेन हे आजच्या काळातील क्रूरकर्मा, राक्षस आहेत/होते. म्हणून रावणाला यांच्या 'लूक' मध्ये दाखवणार का? राऊत यांचे हे स्पष्टीकरण आणि समर्थन चीड आणणारे आणि न पटणारे आहे. कोट्यवधी भारतीयांच्या मनात राम, हनुमान, रावण आणि एकूणच रामायणाविषयीची जी प्रतिमा आहे त्याला छेद देण्यासाठी/त्या प्रतिमेचे भंजन करण्यासाठीच 'आदिपुरुष' तयार केलाय का?😡 कोट्यवधी भारतीयांच्या मनातील रामाच्या प्रतिमेचे उघडपणे भंजन करणा-या चित्रपटावर बंदी घालण्याचे धाडस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे.
शेखर जोशी
#आदिपुरुषबहिष्कार
#देवेद्रफडणवीस
३ टिप्पण्या:
भाजप वाले आता ढीले पडले आहेत. काँग्रेसचे राज्य असताना हेच भाजप वाले शिवसेनेच्या साथीने रस्त्यावर नमाज नको म्हणून महा आरती करीत असत. आता तर या दोघांच्या हातात सत्ता आहे तरीसुद्धा रस्त्यावर नमाज पडणे सुरूच आहे कोर्टाच्या आदेशाविरुद्ध मशिदी वरून लाऊड स्पीकर वाजणे सुरूच आहे. याचा अर्थ या भाजपवाल्यांचे डोळे आणि कान बधिर झाले आहे इतकाच. हल्ली हल्ली तर फडणवीस इतक्या तार स्वरात बोलतात की ऐकून वीट येतो. त्यांना सांगावसं वाटतं की जरा अटलजींची जुनी भाषण ऐका किती संयमी शब्दात खालच्या आवाजात अटलजी बोलत असत आणि तरी ते प्रभावी होत असे.
अगदी आमच्या मनातलं लिहीलं आहे
खुप सुन्दर व सत्य प्रतिपादन
टिप्पणी पोस्ट करा