मंगळवार, २० जून, २०२३

राष्ट्रवादीच्या उलट्या बोंबा!

राष्ट्रवादीच्या उलट्या बोंबा!

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. तुमच्या पिताश्रींनी काही वर्षांपूर्वी आत्ताची उबाठा सेना फोडली होती. छगन भुजबळ यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार (अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या घाऊक प्रमाणात फोडले/ आपल्या बाजूने वळविले त्या तुलनेत तुमचे पिताश्री कमीच पडले) फोडून कॉंग्रेस आय पक्षात आणले होते. तेव्हा तुमचे पिताश्री या पक्षात होते.‌त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म...

तेव्हाची शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी भुजबळ यांच्यासह फुटलेले सर्व आमदार गद्दारच होते. पण तेव्हा पवार साहेबांनी शिवसेना फोडली म्हणून ते किती ग्रेट आहेत, कसे चतुर, चाणाक्ष, मुत्सद्दी आहेत म्हणून त्यांची आरती ओवाळली होती. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून काही आमदार फोडून तुमच्या पिताश्रींनी ते सरकारही पाडले होते. म्हणजे खरे तर या गद्दारीची सुरुवात तुमच्या पिताश्रींनी केली आहे.

उबाठा गटाचे प्रवक्ते, खासदार जे 'उत' आल्यासारखे नेहमीच बोलत असतात त्यांनी तर षटकार ठोकला. संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहून २० जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी केली. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही याची री ओढली. ( हा 'उत' आलेला माणूस वेळोवेळी उबाठा यांना आणि गटालाही अडचणीत आणतोय हे उबाठा यांना कधी कळणार? शिल्लक सेना पूर्णपणे संपेल बहुदा तेव्हा यांचे डोळे उघडतील)

'उत 'आलेले प्रवक्ते, खासदार आणि माननीय उबाठाजी अहो या गद्दारीचे जनक,मूळपुरुष तुमचेच बॉस आहेत याचा सोयिस्कर विसर पडला का? 

ज्या शिंदे यांना मिंधे मिंधे म्हणून शिव्या घालता त्या शिंदे यांच्या आधी मिंधेपण तुमच्याच साहेबांनी शरद पवार यांनी केले. एक वेळ मी अंगाला राख फासून हिमालयात जाईन पण पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार नाही, अशी गर्जना करणा-या तुमच्याच साहेबांनी तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. ते मिंधेपण नाही तर काय होते? 

सोनिया गांधींच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणा-या तुमच्या याच साहेबांनी नंतर सत्तेसाठी सोनिया गांधी आणि काँग्रेस आय पक्षाशी सूत जुळवून केंद्रात मंत्रीपद भुषवले. महाराष्ट्रात सत्ता उपभोगली. ते मिंधेपण नाहीतर काय होते? 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे  छगन भुजबळ यांचा उल्लेख कायम 'लखोबा लोखंडे' असाच करत असत. तेव्हाच्या शिवसेनेसाठी छगन भुजबळ हे गद्दारच होते. आणि याच गद्दार छगन भुजबळ यांना (सुप्रियाताई तुमच्या पिताश्रींनी, 'उत' आलेले खासदारजी, महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या बॉसनी)  अर्थात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले, उपमुख्यमंत्री केले. उद्धवराव याच गद्दार छगन भुजबळ यांच्याबरोबर तुम्हाला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर काम केले. मांडीला मांडी लावून बसावे लागले होते. सुप्रियाताई, 'उत' आलेले खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ही तुम्ही विसरलात का? 

त्यामुळे तुम्ही सर्वजण आता काहीही बोललात, म्हणालात तरी गद्दारीचे खरे जनक शरद पवार हेच आहेत. 

शेखर जोशी

२० जून २०२३

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

खुप सुन्दर व स्पष्ट लेखन

अनामित म्हणाले...

नमस्कार छान विश्लेषण हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह शुभ रात्री.जय हिंदुराष्ट्र