मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण

पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुंबई दि.८ महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोधचिन्हाचे अनावरण झाले.महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार- मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, तसेच महोत्सवाचे संचालक ज्येष्ठ निर्माते,दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे उपस्थित होते. मराठी सिनेमाची चित्रपताका घेऊन अटकेपार जाणारा मावळा या अर्थाने राज्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे नाव 'चित्रपताका' असे ठेवण्यात आले आहे. त्याचेच प्रतिकात्मक रूप बोधचिन्हात उमटले असून घोड्यावर बसलेला, हातात पताका आणि रिळ स्वरूपातील ढाल घेऊन पुढे चाललेला मराठी चित्रपटकर्मी मावळा या बोधचिन्हात दाखविण्यात आला आहे, असे ॲड. शेलार यांनी सांगितले. चार दिवसांच्या चित्रपट महोत्सवात एकूण ४१ दर्जेदार मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. चित्रपटांची निवड करण्यासाठी डॉ.संतोष पाठारे, सुकन्या कुलकर्णी, समीर आठल्ये आणि पुरुषोत्तम बेर्डे या तज्ज्ञांची निवड समिती नेमण्यात आली होती. महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील विविध विषयांवर पाच परिसंवाद, दोन मुलाखती आणि दोन कार्यशाळा होणार असल्याचेही ॲड. शेलार म्हणाले. महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेश असून ऑनलाईन वा प्रत्यक्ष कला अकादमी येथे येऊन महोत्सवासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: