सोमवार, २८ एप्रिल, २०२५

तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल - रणजित सावरकर

बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल - रणजित सावरकर मुंबई, दि. २८ एप्रिल येत्या पाच ते दहा वर्षांत महाराष्ट्रातील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढले नाही, तर सध्याचे सरकार हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी येथे केले. विक्रम भावे लिखित 'दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येथील दादर येथील काशीनाथ धुरू सभागृह शनिवारी पार पडला. त्यावेळी सावरकर बोलत होते. सावरकर यांच्यासह हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, लेखक भावे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पहलगाम येथील आक्रमण हे हिंदू म्हणून केलेले पहिले आक्रमण नाही. यापूर्वी काश्मिरमधून काश्मिरी पंडीतांना हिंदू म्हणूनच निर्वासित करण्यात आले होते. बंगालमधील मुर्शिदाबाद येथे यापूर्वीच हिंदूंच्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्या. त्यामुळे अशा घटनांचा प्रतिशोध घेतला गेला नाही, हिंदू संघटित होत नाहीत, तोपर्यंत अशी आक्रमणे सुरुच रहातील. दहशतवादी जर धर्म म्हणून हिंदूंना गोळ्या घालत असतील, तर धर्मासाठी हिंदू मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार का टाकू शकत नाहीत ? असा प्रश्न सावरकर यांनी उपस्थित केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबआय’ने) मला आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अन् अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांना विनाकारण गोवून आमचा तीव्र मानसिक छळ केला. हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्याला येनकेनप्रकारेण खोट्या गुन्ह्यात अडकवून यंत्रणा कशा कार्य करतात, याचे प्रत्यक्ष स्वरूप तुम्हाला या पुस्तकातून पाहायला, अनुभवायला मिळेल, असे भावे यांनी सांगितले. तर विक्रम भावे यांचे पुस्तक म्हणजे हिंदूंच्या शौर्याचे कहाणी आहे , असे अधिवक्ता पुनाळेकर म्हणाले तर सत्याचा चेहरा नीटपणे दिसण्यासाठी आपण जागे व्हायला हवे, असे आवाहन अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी केले. दाभोलकरांची हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केल्याचे नॅरेटिव्ह निर्माण करण्यासाठी काही लोक कार्यरत होते, असे वर्तक यांनी सांगितले‌.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: