बुधवार, १६ एप्रिल, २०२५

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचे सर्वेक्षण करा- डॉ. नीलम गोऱ्हे

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचे सर्वेक्षण करा- डॉ. नीलम गोऱ्हे ठाणे, १६ एप्रिल राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचे सर्वेक्षण करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई केली जावी, असे आदेश विधान परिषदेच्याउपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी दिले. ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन डॉ. गोऱ्हे यांनी उल्हासनगर येथील ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाला भेट दिली. पीडित २० मुली आणि ९ मुले यांच्याशीही संवाद साधला. या प्रकरणातील पीडित मुली आणि मुलांचे शिक्षण खंडित होता कामा नये. त्यांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळावे. मुली व मुलांना कुठे राहायचे आहे, याबाबत बाल न्यायालय निर्णय घेईल, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. जिल्हा परिषद किंवा महापालिकेच्या शाळांमध्ये एकच पत्ता असलेली मुले आढळल्यास, त्या ठिकाणी अवैध बालिका आश्रम आहेत का तसेच 'पसायदान' संस्थेत जिथे पीडित मुले राहत होती तिथे प्रत्येक मुलाचा पत्ता ‘रेल्वे स्टेशन’ असा नमूद असून हे अत्यंत संशयास्पद आहे. ही मुले खरंच स्टेशनवर राहत होती का? की संस्थाचालकांनी मुद्दाम चुकीची माहिती दिली? याचीही चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाच्या अनुषंगाने उल्हासनगर शहरातील इतर सामाजिक प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून येत्या महिन्यात आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: