बुधवार, १६ एप्रिल, २०२५

चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल्सचे थांबे रद्द करा

चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल्सचे थांबे रद्द करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश मुंबई, दि. १६ एप्रिल लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे आदेश परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याच्या सूचनाही एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी हे आदेश दिले. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याशी कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, अशी स्पष्ट सूचनाही सरनाईक यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: