गुरुवार, १ जानेवारी, २०२६

डोंबिवली पूर्व भागातील टपाल कार्यालयाचे स्थलांतर

कठड्याचा स्लॅब कोसळून धोकादायक झालेल्या इमारतीमधील टपाल कार्यालयाचे स्थलांतर - कार्यालय 'एमआयडीसी' त गेल्याने नागरिकांचीही गैरसोय डोंबिवली, दि. १ जानेवारी डोंबिवली पूर्व भागातील टपाल कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. एमआयडीसी टपाल कार्यालय, के.वि. पेंढरकर महाविद्यालयामागे, डोंबिवली पूर्व येथे हे टपाल कार्यालय हलविण्यात आले आहे. डोंबिवली पूर्व भागातील लक्ष्मी सागर इमारतीत हे टपाल कार्यालय होते. काही दिवसांपूर्वी या इमारतीचा स्लॅब ( गच्चीचा कठडा) कोसळला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी या दुर्घटनेत झाली नव्हती. स्लॅब कोसळल्यानंतर महापालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली आणि इमारतीमधील रहिवासी, व्यावसायिक गाळे रिकामे केले होते. डोंबिवली पूर्व भागात रेल्वे स्थानकापासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले हे टपाल कार्यालय या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून होते. नागरिक, ज्येष्ठ नागरिकांसाठीही ते सोयीचे होते. आता डोंबिवली एमआयडीसी भागात हे टपाल कार्यालय हलविण्यात आल्याने नागरिक व टपाल कार्यालयात येणा-यांना तिथे जाणे गैरसोयीचे ठरते आहे. स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून हे कार्यालय मूळ इमारतीत आणण्यासाठी किंवा रेल्वे स्थानकाच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: