गुरुवार, १ जानेवारी, २०२६

मुंबईत रंगणार दोन दिवसांची रंगजत्रा

स्वामीराज प्रकाशन आयोजित दोन दिवसीय 'रंगजत्रा' - स्वामीराज महोत्सवात तीन एकांकिका, दोन दीर्घांक आणि नाटक सादर होणार, रसिकांना मुक्त प्रवेश मुंबई, दि. १ जानेवारी स्वामीराज प्रकाशन संस्थेतर्फे प्रायोगिक रंगभूमीला ऊर्जा देणारी वार्षिक रंगजत्रा अर्थात 'स्वामीराज महोत्सव' येत्या १७ आणि १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष आहे. ज्येष्ठ अभिनेते जनार्दन लवंगारे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. महोत्सवात गावय, मास्क, थिम्मक्का या तीन एकांकिका, युगानुयुगे तूच, जन्म एक व्याधी हे दोन दीर्घांक आणि साठा उत्तरांची कहाणी हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे. समारोप सोहळ्याला जेष्ठ अभिनेते अनिल गवस, दिग्दर्शक अनिल बांदिवडेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात अभिनेता चेतन दळवी (रंगसेवा पुरस्कार), विजय टाकळे (संहिता सन्मान), अमर हिंद मंडळ, दादर (प्रयोगघर पुरस्कार), लीला हडप (धुळाक्षर पुरस्कार), जयवंत देसाई (सेवाव्रती पुरस्कार) यांना गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा महोत्सव दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक रघुनाथ कदम यांच्या स्मृतीला समर्पित असून यशवंत नाट्य मंदिर, दादर येथे होणा-या महोत्सवासाठी नाट्यरसिकांना मुक्त प्रवेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: