शुक्रवार, २ जानेवारी, २०२६
खांद्यावरील झेंड्याचा दांडा आणि पालखीचा गोंडा मराठीच असला पाहिजे- संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील
खांद्यावरील झेंड्याचा दांडा आणि पालखीचा गोंडा
मराठीच असला पाहिजे- संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील
सातारा, दि. २ जानेवारी
तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा किंवा धर्माचा असला तरी हरकत नाही, पण त्याचा दांडा मराठीच असला पाहिजे. खांद्यावर पालखी कोणाचीही असो तिचा गोंडा मराठीच असायला हवा, असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शुक्रवारी येथे अध्यक्षीय भाषणात केले.
सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा तारा भवाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
लेखक/कवीला कोणतीही जात नसते, मात्र, त्याला धर्म असतो आणि तो म्हणजे फक्त मानवता धर्म. जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते तेव्हा गेल्या दोनशे वर्षात सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकाही साहित्यिकांनी पेलली असल्याचेही पाटील म्हणाले.
धान्य पिकविणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा आणि मातेचा गौरव करण्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना सुरू करावी, माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी, ग्रंथालये, मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, महाराष्ट्रातच माय मराठीचे अध:पत होऊ नये या करीता सर्व स्तरांवर प्रयत्न व्हावेत, अशा सूचनाही पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केल्या.
अन्य भाषांची सक्ती करणे अयोग्य- डॉ. भवाळकर
साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. भवाळकर म्हणाल्या, प्राथमिक स्तरावरील मुलांवर इतर भाषांचे ओझे, दडपण देऊ नका. मराठी व्यतिरिक्त इतर भाषांची सक्ती करणे अयोग्य आहे. आणि हे मी मराठी भाषेची शिक्षिका असल्यामुळे अनुभवातून ठामपणे सांगते आहे.
ग्रामीण, अर्ध ग्रामीण गावात नवीन मुले-मुली लिहिती झाली आहेत, तसेच नवीन प्रकाशक निर्माण होत आहेत, ही बाबही आश्वासक आहे. जेव्हा निरनिराळ्या जाती जमातीतील लोकं लिहायला लागतील तेव्हा त्यातील शब्द मराठी साहित्यात रुजतील आणि त्यातूनच मराठी भाषा समृद्ध होईल, असा विश्वासही डॉ. भवाळकर यांनी व्यक्त केला.
गोदावरीकाठी असलेल्या तपोवनावर कुऱ्हाड चालणार नाही, याची दक्षता आपण घेतली पाहिजे. प्रकृती टिकली तरच आपण टिकणार आहोत. आपल्याला जगायचे असेल तर झाडे, वने टिकायला हवीत. झाडे टिकली तरच आपली पुढची पिढी जगेल.
महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची- फडणवीस
महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची आहे. परदेशी भाषांना पायघड्या घालताना भारतीय भाषांना विरोध करण्याची वृत्ती योग्य नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. माय मराठीची अवहेलना होत असताना अन्य भाषांचे कोडकौतुक नको. भाषेला विरोध नाही परंतु सक्तीला विरोध आहे’, अशी भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडली होती. त्याला उत्तर म्हणून फडणवीस यांनी उपरोक्त भूमिका मांडली.
इंग्रजी, फ्रेंच जर्मन अशा परदेशी भाषांना आपण पायघड्या घालतो; परंतु भारतीय भाषांना मात्र विरोध करतो. ही भूमिका योग्य नाही. स्वभाषेचा सन्मान नक्कीच व्हायला हवा. त्याचवेळी इतर भाषांचेही स्वागत व्हायला हवे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा