मंगळवार, १७ जून, २०२५

देशातील पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत - २१ जून रोजी 'आशा रेडिओ' पुरस्काराचे वितरण

देशातील पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव मुंबईत - २१ जून रोजी 'आशा रेडिओ' पुरस्काराचे वितरण मुंबई दि. १७ सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने येत्या २१ जून रोजी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव' पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी मुंबईत दिली. मराठी निवेदक, अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक, तंत्रज्ञ, संपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कला, साहित्य, संस्कृतीचे जतन व्हावे, असा आमचा प्रयत्न असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.
प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात 'आशा रेडिओ गौरव पुरस्कार' ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावाने देण्यात येणार आहे. याचबरोबर सर्वोत्कृष्ट रेडीओ केंद्र, कम्युनिटी रेडिओ, मनोरंजन कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, पुरुष निवेदक, महिला निवेदक इत्यादी गटातही पुरस्कार देण्यात येणार असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात येणार आहेत. संबंधित कलाकार, तंत्रज्ञ, रेडिओ केंद्र यांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करायची आहे. मानचिन्ह आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेडिओ निवेदकांसोबत संवाद साधणार असून तसेच रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्यांत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी, किस्से यांचेही सादरीकरण होणार आहे. येत्या २१ जून रोजी नरिमन पॉइंट, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: