मंगळवार, २४ जून, २०२५

आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले

आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले - महापालिकेतील तत्कालिन सत्ताधारी दोन्ही काँग्रेसने आपलाच हट्ट पूर्ण केला शेखर जोशी डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाट्यगृहाला डोंबिवलीकर असलेले ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार पु. भा. भावे यांचे किंवा नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यक्तीचे नाव देण्यात यावे, अशी मागणी तत्कालिन एकसंघ शिवसेना व भाजप यांनी केली होती.‌ सर्वसामान्य रसिकांनाही तसे वाटत होते. पण तेव्हा कडोंमपात सत्तेवर असलेल्या कॉग्रेस व एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ती मागणी डावलली आणि नाट्यगृहाला हट्टाने सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले. शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, महापालिकेच्या एखाद्या शाळेला, शैक्षणिक संस्थेला त्यांचे नाव दिले असते तर ते योग्य ठरले असते. नाट्यगृहाला त्यांचे नाव देणे अप्रस्तुतच होते. पण तेव्हा महापालिकेतील दोन्ही काँग्रेसनी आपला हट्ट कायम ठेवला आणि पु. भा. भावे किंवा नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यक्तीचे नाव नाही म्हणजे नाही देऊ दिले. 'भावे' या नावाची दोन्ही काँग्रेसला जर ॲलर्जी होती तर बहुजन समाजातील पण नाट्य क्षेत्रातीलच लेखक, नाटककार, अभिनेता, अभिनेत्री यांचे नाव का नाही दिले? अभिनेते अरुण सरनाईक या नावाचा पर्यायही पुढे आला होता असे आठवते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनीही तेव्हा आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे कान उपटले नाहीत किंवा सावित्रीबाई फुले हे नाव नको, असा आदेशही दिला नाही. पवार यांनी मनात आणले असते तर कॉग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी बोलून ते सावित्रीबाई फुले हे नाव देणे अगदी सहज टाळू शकले असते, पण त्यांनी सोयिस्कर मौन बाळगले.‌ आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला अखेर सावित्रीबाई फुले यांचेच नाव दिले गेले. आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकसंघ शिवसेनेत गेलेले आणि शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले पुंडलिक म्हात्रे तेव्हा कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर होते. शरद पवार यांचे हे असेच आहे. त्यांना एखादी गोष्ट घडून यावी असे वाटते तेव्हा ते सक्रिय होतात. आपल्या पाठिराख्यांना सर्व पातळ्यांवर कामाला लावतात आणि त्यांना जे हवे आहे ते घडवून आणतात. आणि त्यांच्या मनातच नसले, एखादी गोष्ट घडायला नको असे ते ठरवतात तेव्हा मी त्या गावचाच नाही, असे म्हणत निष्क्रिय राहतात. याचा अनुभव आजपर्यंत वेळोवेळी महाराष्ट्राने घेतला आहे.‌ शेखर जोशी २४ जून २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: