मंगळवार, १० जून, २०२५

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम प्रवाळमध्ये पाण्याखालील संग्रहालय!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम प्रवाळमध्ये पाण्याखालील संग्रहालय! - निवती रॉकजवळ नियोजित प्रकल्प मुंबई, दि. १० जून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ कृत्रिम प्रवाळमध्ये पाण्याखालील संग्रहालय उभारण्यात येणार आहे. नौदलाच्या 'आयएनएस गुलदार' (आता सेवेत नाही) या युद्धनौकेचा यासाठी उपयोग केला जाणार असून देशातीलहा पहिलाच उपक्रम असणार आहे. सागरी संवर्धन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून केंद्र शासनाने भारतीय नौदलाचे 'आयएनएस गुलदार' हे जहाज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे.
मुंबईतील मंगळवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नियोजित प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.‌उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल हे उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर सहभागी झाले होते. समुद्रातील या जहाजाभोवती प्रवाळ निर्मितीकरून त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटकांना या प्रवाळ व समुद्रतळाशी विराजमान जहाजाची सफर घडविण्याची योजना आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: