सोमवार, १६ जून, २०२५

नवीन पनवेलमध्ये 'कुंडमळा' घडण्याची शक्यता? - गाढी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

नवीन पनवेलमध्ये 'कुंडमळा'घडण्याची शक्यता? -गाढी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी -देवद ग्रामस्थांकडून सिडकोला निवेदन सादर पनवेल,दि.१६ जून सिडकोकडून गाढी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या नियोजनातील काही त्रुटींमुळे हा पूल अद्याप सुरू झालेला नाही.त्यामुळे येथे असलेल्या अरुंद पाईपलाईन पुलाचा वापर केला जात आहे. या पुलाचे बांधकाम लवकरच लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी देवद ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात 'सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देण्यात आले आहे.
'सिडको'ने गाढी नदीवर एक नवीन पूल बांधला असून त्यावर आत्तापर्यंत ११ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. नियोजनातील त्रुटींमुळे हा पूल अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे हा पूल सार्वजनिक वापरासाठी खुला केलेला नाही. येथे असलेल्या अरुंद पाईपलाईन पुलाचा वापर केला जात आहे.‌ मुळात हा पाईपलाईन पूल वाहनांसाठीचा नाही. पण तरीही नदीवरील या पुलाचा वाहनचालक, पादचाऱ्यांकडून वापर केला जात आहे. ही परिस्थिती अतिशय धोकादायक असून कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
अरुंद पाईपलाईन पुलावरील वाहतुकीमुळे नवीन पनवेलमध्ये 'कुंडमळा' घडण्याची भीतीही या निवेदनात व्यक्त करण्यात येत आहे. या निवेदनाची प्रत 'नैना' चे मुख्य नियोजकार, सिडकोचे मुख्य अभियंता यांनाही देण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: