शुक्रवार, ६ जून, २०२५

आळंदीजवळ पशूवधगृहासाठी जागा आरक्षित होणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट

आळंदीजवळ पशूवधगृहासाठी जागा आरक्षित होणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट वारकरी आणि जागरूक हिंदु समाज आळंदी तीर्थक्षेत्राजवळ कोणत्याही परिस्थितीत पशूवधगृह होऊ देणार नाहीत; परंतु या क्षेत्रात पशूवधगृहासाठी जागा आरक्षित होणे, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असे मत, दैनिक सनातन प्रभातचे विशेष प्रतिनिधी प्रितम नाचणकर यांनी व्यक्त केले आहे. नाचणकर यांनी लिहिलेला 'पुणे जिल्ह्यातील आळंदी क्षेत्राजवळ पशूवधगृहाचे आरक्षण : महाराष्ट्राने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता !'हा लेख ६ जून २०२५ च्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रकाशित झाला आहे.‌ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १४ मे या दिवशी शहराचा सुधारित विकास आराखडा घोषित केला. प्रशासनाच्या संकेतस्थळावर हा आराखडा अधिकृतरित्या ठेवण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आळंदी तीर्थक्षेत्राच्या जवळ मोशी-डुडुळगावी या मार्गावर ३.७८ एकर जागा पशूवधगृहासाठी आरक्षित करण्यात आली आहे. यापूर्वी वर्ष १९९५ मध्ये महानगरपालिका प्रशासनाने शहरात अन्य ठिकाणी पशूवधगृहासाठी जागा आरक्षित केली होती; मात्र नागरिकांच्या विरोधामुळे ते आरक्षण रहित करण्यात आले. सामाजिक समतोलासाठी समाजात पशूवधगृह आवश्यक असल्याची सूचना हरित लवादाकडून प्राप्त झाल्यावर यापूर्वीच्या आराखड्यात रहित केलेले पशूवधगृह महानगरपालिकेने आळंदी तीर्थक्षेत्राजवळ आरक्षित केले. ‘पशूवधगृह धार्मिक स्थळाजवळ असू नये’, हे तारतम्यही महानगरपालिकेच्या लक्षात न येणे आणि आळंदीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्राजवळ त्यासाठी जागा आरक्षित करणे, ही प्रशासनाची अक्षम्य चूक असल्याचे नाचणकर यांनी या लेखात म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आराखडा संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने हरकती मागवण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली. याविषयी समजताच वारकरी, धर्मप्रेमी हिंदु आणि सतर्क नागरिक महानगरपालिकेकडे निषेध नोंदवत आहेत. महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात राज्य सरकारचा थेट हस्तक्षेप नसला, तरी आळंदी तीर्थक्षेत्राजवळ पशूवधगृह आरक्षित झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष घालणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याविषयी स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते; मात्र तसे आढळले नाही दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी श्रीक्षेत्र आळंदी येथे जाऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थानाचे दायित्व असलेल्या ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी’ यांच्या विश्वस्तांची भेट घेतली. ‘आळंदी क्षेत्राजवळ पशूवधगृह होऊ नये, यासाठी त्यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे का ?’, याविषयी विचारणा केली; मात्र हे खेदाने सांगावे लागते, ‘या देवस्थानने साधे पत्रही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला पाठवण्याचा सोपस्कार केला नव्हता, अशी माहिती लेखात पुढे देण्यात आली आहे. दरम्यान आळंदीक्षेत्राजवळ पशूवधगृहाच्या आरक्षणाचा निर्णय सरकारने रद्द केला नाही, तर सरकारला वारकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. वारकर्‍यांच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका, असा इशारा वारकरी युवक संघाचे संस्थापक ह.भ.प. अनंत महाराज पाटेकर यांनी प्रशासन आणि सरकारला दिला आहे. या लेखाची लिंक पुढीलप्रमाणे https://tinyurl.com/4avty6bf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: