शुक्रवार, २० जून, २०२५

पुस्तकात वह्यांची पाने देण्याचा प्रयोग फसला- सुराज्य अभियान

पुस्तकात वह्यांची पाने देण्याच्या प्रयोगात शासनाचे १३५ कोटी रुपयांचे नुकसान - सुराज्य अभियानाकडून चौकशीची मागणी मुंबई, दि. १९ जून विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पुस्तकातच वह्यांची पाने देण्याच्या प्रयोगात शासनाचे १३५ कोटी रुपये वाया गेले आहेत. आणि हा निर्णय बदलण्याची वेळ आली असून याची चौकशी केली जावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ने केली आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांना निवेदन देण्यात आले असून या चुकीच्या निर्णयासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी‘सुराज्य अभियान’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी या निवेदनात केली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०२३–२४ पासून इयत्ता २ री ते ८ वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे लेखन साहित्य उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव पाठ्यपुस्तकांमध्ये काही पाने लिहिण्यासाठी जोडण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ही पाने अपुरी ठरली आणि विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच वह्याही घ्याव्या लागल्या. परिणामी दप्तराचे वजन कमी होण्याऐवजी वाढलेच. शिवाय वह्यांची पाने जोडल्यामुळे पाठ्यपुस्तकांची जाडी आणि किंमत वाढल्याचे निवेदनात निदर्शनास आणून देण्यात आले आहे. हा निर्णय प्रायोगिक स्वरूपात काही शाळांमध्ये अमलात आणून त्याचा आढावा घेतला गेला असता, तर शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळता आले असते. शिक्षण क्षेत्रातील निर्णय अभ्यासपूर्वक आणि प्रात्यक्षिक तपासणीच्या आधारे घेणे आवश्यक आहे, हे या घटनेतून अधोरेखित होते, असे मुरकुटे यांनी सांगितले.
बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे शैक्षणिक वर्ष २०२३–२४ मध्ये ७२ कोटी रुपये आणि २०२४–२५ मध्ये ६३.६३ कोटी रुपये, असा एकूण १३५.६३ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च शासनाला करावा लागला. २८ जानेवारी २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयात ‘सदर योजनेचा आढावा घेतला असता, पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकवलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही’,असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: