मंगळवार, १७ जून, २०२५

‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घालण्याची मागणी

आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घालण्याची मागणी मुंबई, दि. १७ जून मुंबईत २०१२ मध्ये झालेल्या आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उद्या (१८ जून) रोजी मुंबईत आझाद मैदानात निघणाऱ्या ‘गाझा-पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्च्यावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना, संस्था, व्यक्ती यांनी केली आहे. मुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक, तसेच मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांना याविषयी सविस्तर निवेदन देण्यात आले असल्याचे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. म्यानमारमध्ये मुसलमानांवर होत असल्याच्या कथित अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात आझाद मैदानात काढण्यात आलेल्या मोर्चाचे रूपांतर दंगलीत झाले होते. ‘अमर जवान ज्योती’ची विटंबना, पोलीस आणि प्रसार माध्यमांच्या गाड्यांची जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची हानी, महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ला असे प्रकार यावेळी घडले होते, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. मंगळवारी निघणाऱ्या मोर्चाबाबत अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी 'एक्स' (ट्विटर) या समाज माध्यमातून माहिती दिली असून डाव्या संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याचे स्वरूप एकतर्फी, भारताच्या परराष्ट्र धोरणाविरोधात आणि इस्रायलसारख्या मित्र राष्ट्राविरोधात आहे. 'हमास' या दहशतवादी संघटनेने केलेल्या हिंसाचारावर आंदोलक मौन बाळगतात आणि भारतातील मुस्लिम समाजाला चिथावणी देण्याचे काम करतात, असा आरोपही समितीने केला आहे. १८ जून रोजी निघणाऱ्या या मोर्चामुळे मुंबईत पुन्हा धार्मिक तेढ व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हिंदूंवरील अत्याचार, काश्मिरी विस्थापन, बांगलादेशातील हिंसा किंवा भारतावरील दहशतवादी हल्ले या प्रश्नांवर ही आंदोलक मंडळी कधीही रस्त्यावर उतरली नाहीत. हे आंदोलन मानवतावादी नसून भारतविरोधी, हिंदूविरोधी आणि अप्रत्यक्षपणे दहशतवादास समर्थन देणारे आहे. त्यामुळेच, या मोर्च्यावर बंदी घालावी आणि आयोजकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: