शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

'सागरी सीमा मंच‘ कोकण प्रांतातर्फे किनारपट्टी स्वच्छता अभियान

'सागरी सीमा मंच‘कोकण प्रांतातर्फे किनारपट्टी स्वच्छता अभियान मुंबई, दि. २० सप्टेंबर जागतिक किनारपट्टी अभियान दिन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या औचित्याने 'सागरी सीमा मंच'च्या कोकण प्रांतातर्फे किनारा स्वच्छता अभियान उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शनिवारी ( २० सप्टेंबर) या अभियानाची सुरुवात झाली. कोकण किनारपट्टीवरील तब्बल शंभरहून अधिक ठिकाणी हा उपक्रम एकाचवेळी राबविण्यात येणार आहे. समुद्र किनाऱ्यांवरील प्लास्टिक व घनकचरा हटविणे, किनाऱ्यांची प्रत्यक्ष स्वच्छता करणे आणि किनारपट्टी सुरक्षेबाबत जनजागृती करणे असे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. 'स्वच्छ सागर - सुरक्षित सागर, सुरक्षित किनारपट्टी - समर्थ भारत' संकल्पनेला या उपक्रमात मूर्त स्वरूप देण्यात येणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय सेवा योजना, मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास खाते, विविध अशासकीय संस्था, शासकीय विभाग, पर्यावरण स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये व शाळा या उपक्रमात सहभागी होणार आहेत. 'सागरी सीमा मंचा' तर्फे विद्यार्थी व स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छ व सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांचे महत्त्व पटवून दिले जात आहे. भारतीय संस्कृतीत भूमातेबद्दल असलेला आदर लक्षात घेऊन आजच्या पिढीने समुद्र, किनारे आणि निसर्ग जतन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, हा संदेश रा. स्व. संघाच्या शताब्दीवर्षातील अभियानातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे 'सागरी सीमा मंच' कोंकण प्रांतच्यावतीने सांगण्यात आले.‌ अधिक माहितीसाठी संपर्क दुर्गेश बोराडे (अभियान प्रमुख) ८१०८०६६२३८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: