शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई, दि. १३ सप्टेंबर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी शनिवारी येथे दिली. सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या एका बैठकीत बारव संवर्धन, संरक्षण याबाबत आढावा घेण्यात आला.‌ राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी सापडतात अशा तीन हजारांहून अधिक बारव आहेत. येथे ज्या पद्धतीचे स्थापत्यशास्त्र वापरले आहे, त्या स्थापत्यशास्त्राचा नमुना जगामध्ये दुर्मिळ असून या बारवमुळे जलसंवर्धन आणि जलसंधारणाचेही काम केले जात आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी तसेच जलसंधारण, ऐतिहासिक वारसा विषयांमध्ये काम करणाऱ्या तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे शेलार यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्यांचं दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व बारवांच्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या अहवालाचे काम येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: