शनिवार, २४ जून, २०१७

'वार'करी पवार


'वार'करी पवार

(शेखर जोशी)

राज्यात आणि केंद्रात नसलेली सत्ता, 'मराठा कार्ड'चे कमी झालेले महत्व, आधी पंतप्रधान व आता राष्ट्रपतीपद मिळवायची हुकलेली संधी, स्वतच्या राष्ट्रवादी पक्षाची (जी काही शिल्लक होती ती) घसरत आणि संपत चाललेली विश्वासार्हता, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कमी संख्येत निवडून आलेले पक्षाचे उमेदवार, मराठा मोर्चा, शेतकरी संपातील संपलेली हवा, त्याचा पक्षाला न झालेला फायदा, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्ष अस्तित्वात तरी राहील की नाही याची भेडसाविणारी चिंता या सगळ्यामुळे शरद पवार अस्वस्थ झाले आहेत. त्यातून शरद पवार असे 'वार' अधूनमधून करत असतात. अफजल खान, गो ब्राह्मण प्रतिपालक या विषयांवर त्यांनी नुकतेच केलेले विधान त्याचेच द्योतक आहे.

शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या नावाचा जप ते सतत करत असतात. सामाजिक समता व बंधुभावाचा आव आणून बहुजन व दलित समाजासाठी आपण काहीतरी करतोय असे ढोलही पवार आणि त्यांचे समर्थक नेहमी बडवतात. पण तो केवळ मुखवटा आहे. कारण पवार यांनी आजपर्यंत केवळ मराठा राजकारण व सत्ताकारणच केले आहे. राज्यात मुख्यमंत्रीपद, केंद्रात कृषीमंत्रीपद आणि केंद्रात व राज्यात सत्तेवर असताना यांना ना शेतकऱयांचे प्रश्न सोडविता आले ना त्यांच्या आत्महत्या थांबविता आल्या. आणि तरी हे म्हणे शेतकऱयांचे कैवारी.

इशरत जहाँ सारखी निष्पाप बिचारी मुलगी अतिरेकी झाली, मालेगाव स्फोटाप्रकरणी तीन वर्ष तुरूंगात खितपत पडणाऱ्यांना मुलांना हा देश आपला का वाटावा?,'या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी कोणी इतर कृत्य केलं तर त्याला दोषी का ठरवावं?, अल्पसंख्याक समाजाचा व्यक्ती ‘जुम्मा’च्या दिवशी मशिदीत कधी हल्ला करेल, हे शक्य नाही. मी अजूनपर्यंत हे पाहिले नाही, अशी वादग्रस्ते विधानेही पवार यांचीच.

निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशाचा उल्लेख करत भटा-ब्राह्मणांच्या हाती सत्ता देणार का, अशी विचारणा शरद पवार यांनी केली होती, संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर निवड करण्यात आल्यानंतर पवार यांनी, छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्‍ती केली हा इतिहास सर्वज्ञात आहे. पेशवाईत फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्‍ती कधीच केली नव्हती; मात्र संभाजीराजे छत्रपती यांच्या रुपाने प्रथमच पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्‍ती केल्याची घटना घडली आहे, अशा शब्दांत टीका केली होती. ब्राह्मण द्वेष करत असताना शिवाजी महाराज यांना फितुर असलेल्या, स्वराज्याशी बेईमानी करणारया मराठा सरदारांबद्दल ते एक अवाक्षर काढत नाहीत. त्याबाबत मात्र अळी मिळी गुप चिळी!

समाजात जाणीवपूर्वक कलागती लावण्याच्या उद्देशातून ते नेहमीच वादग्रस्त विधाने आणि असे 'वार' करत असतात.

हे 'वार'करी

कसले राष्ट्रवादी

हे तर राष्ट्रघातकी!

-शेखर जोशी