मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला


मराठीत 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' अशी म्हण आहे. सध्या काही राजकीय नेत्यांनी हा प्रकार सुरु केला असून सभा, संमेलने, जाहीर कार्यक्रमातून राजकीय नेत्यांची जीभ घसरत चालली आहे. हातात माईक आणि समोर श्रोता मिळाला की काय बोलावे, कसे बोलावे याचे भान व ताळतंत्र सुटत चाललेले पाहायला मिळत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. दारु विक्री वाढवायची असेल तर दारुला महिलांचे नाव द्या. कारखान्यात तयार केलेल्या दारुला 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' असे नाव ठेवा त्याची विक्री वाढेल असा सल्ला महाजन यांनी सातपुडा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिला. महाजन यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध झाल्यानंतर त्यांना उपरती झाली आणि त्यांनी जाहीर माफी मागितली. पण मुळात जाहीरपणे असे बोलायची खुमखुमी महाजन यांना का आली हा प्रश्नच आहे.

जाहीर कार्यक्रमातून बोलताना जीभ घसरणारे महाजन हे काही पहिलेच राजकीय नेते किंवा मंत्री नाहीत. याही अगोदर अजित पवार, आर. आर. पाटील, गिरीश बापट, रावसाहेब दानवे आदी राजकीय नेत्यांची जीभ घसरली होती. महाराष्ट्रात ऐन दुष्काळी परिस्थीती असताना धरणात पाणी नाही तर मी काय xx का?, असा सवाल जाहीरपणे विचारुन अजित पवार यांनी खालची पातळी गाठली होती. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 'बडे बडे शहरोंमे ऐसे छोटे छोटे हादसे होते है असे विधान करुन गदारोळ उडविला होता. 'भाजप'चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 'साले'हा शब्द उच्चारला आणि स्वतला व पक्षालाही अडचणीत आणले होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही 'तसल्या'व्हिडिओ क्लिपा आम्ही पण पाहतो, आम्ही पिकलेलं पान असलो तरी आमचे हिरवे देठ आहेत असे वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. भाजप समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांचीही जीभ अशीच घसरली. राजकारण कसे असते हे उपस्थीतांना समजून सांगताना परिचारकांनी सैनिकांविषयी संतापजनक वक्तव्य केले. ‘सीमेवरील जवान वर्ष भर घरी येत नाही. तरीदेखील घरी आल्यावर त्याला मुलगा झाल्याचे समजते आणि तो गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पेढेही वाटतो’, असे परिचारक बोलले होते. केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात पत्रकार आणि नागरिकांना उद्देशून‘तुमच्या नशिबी लक्ष्मीदर्शनाचा योग आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाकारू नका’, असे वक्तव्य केले होते. निवडणुक आयोगनेही गडकरी यांच्या या विधानाची दखल घेऊन ताशेरे ओढले होते.लोकसभा निवडणुकीच्या वेळी साताऱ्यातील सभेत बोलताना ‘बोटाची शाई पुसून पुन्हा मतदान करा’ हे त्यांचे विधान भलतेच गाजले. त्यांच्या या विधानाची निवडणुक आयोगानेही दखल घेतली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मराठी साहित्यिकांची ‘बैल’ या शब्दांत संभावना करून तसेच ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ पु. ल. देशपांडे यांना दिलेल्या ‘महाराष्ट भूषण’ पुरस्कारावरून ‘झक मारली आणि पुलंना हा पुरस्कार दिला’, 'मोडका पूल' अशी विधाने केली होती.

खरे तर सार्वजनिक जीवनात वावरताना मोठ्या पदावर किंवा समाजात ज्याला मान व प्रतिष्ठा आहे अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीने आचार-विचार आणि कृतीचे काही किमान संकेत पाळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही सर्व मंडळी ज्या पदावर काम करत आहेत, त्यांना अशा प्रकारची बेजबाबदार आणि जीभ घसरणारी वक्तव्ये करणे न शोभणारे आहे. आजही आपल्या समाजात अशा प्रकारचे बोलणे हे असंस्कृत आणि निषेधार्ह मानने जाते आणि त्यात काहीही चूक नाही. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला असला तरी त्याचा अर्थ उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा होत नाही, याचे भान राजकीय नेत्यांनी ठेवण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काहीही कृती करून, काहीही बोलून, आपल्या जीभेचा पट्टा वाट्टेल तसा सैल सोडून इतरांना दुखावणे नव्हे. आपण बोलतो किंवा वागतो त्याचा काय परिणाम होईल याचा विचार प्रत्येक राजकीय नेत्याने केला पाहिजे. अशी विधाने करताना त्याचा इतरांवर, समाजावर काय परिणाम होईल याचे भान ठेवले पाहिजे. जीभ घसरणार नाही याची त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य एखाद्या राजकीय नेत्याने केले तर तो माफी मागून मोकळा होतो आणि सुटतो. काही दिवसांनी लोकही तो काय बोलला होता ते विसरुन जातात. या मंडळींच्या विरोधात पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे राजकीय मंडळीही पुन्हा आपल्याला हवे ते बोलायला मोकळी होतात. असे वक्तव्य पुन्हा होणार नाही याची जरब बसण्यासाठी त्यांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, तरच असे प्रकार थांबतील. राजकीय पक्ष त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करणा नसेल तर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे, न्यायालयात याचिका दाखल करणे किंवा निवडणुकीत मत मागायला आले की त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन देऊन त्यांना मतदान न करणे अशी पावले उचलून त्यांना धडा शिकविला पाहिजे.

असे जो पर्यंत होत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांची जीभ अशीच वळवळत राहणार, घसरणार आणि उचलली जीभ व लावली टाळ्याला असेच घडत राहणार...

-शेखर जोशी