मंगळवार, २८ मार्च, २०२३

'नाना'ची टांग



क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी वंदनीय आहेत. युती आणि आघाडीच्या दळभद्री आणि गलिच्छ राजकारणात स्वातंत्र्यवीर सावरकर किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असे म्हणणेही त्या क्रांतीसूर्याचा अपमान आहे. 

काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही पक्षांची सावरकर यांच्याबाबतची भूमिका भिन्न आहे. ‘सावरकर’ आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीत. लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या सडक्या मेंदूचे लक्षण आहे. 

राहुल गांधी आणि काँग्रेसधील सडक्या मेंदूचे भोंदू आणि ढोंगी धर्मनिरपेक्षवादी नेते वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची मुस्लिम लांगुलचालनाची, हिंदुत्व द्वेषाची भूमिका नवी नाही आणि तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्ष दोन्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतानाही राहल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी, पक्षाने आजवर कधीही राहुल गांधी यांच्या विरोधात थेट आणि ठोस कृती केली नाही. 

परवा मालेगावच्या सभेतही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राहुल गांधी यांचा तोंडदेखला निषेध केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तुम्ही खरोखरच दैवत मानत असता तर राहुल गांधी यांनी आजवर सावरकर यांचा वेळोवेळी जो अपमान केला त्यासाठी रस्त्यावर उतरायला हवे होते. मणिशंकर अय्यर विरोधात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतली होती ती भूमिका तुम्ही घ्यायला हवी होती. पण? ते होणार नाही.



आताही नाना पटोले यांनी ‘सावरकर’ आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीत, असे वक्तव्य केल्यानंतर तातडीने पटोले यांचा निषेध करणारे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून यायला हवे होते. आणि महाविकास सरकार स्थापन करण्यापूर्वी कॉंग्रेसने सावरकर’ किमान समान कार्यक्रमाचा भाग होऊ शकत नाहीत, अशी जर अट घातली होती तर त्याच वेळी सावरकरप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना म्हणून ती अट धुडकावून लावायला हवी होती. पण मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर बसायची अतीघाई झाल्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष केलेत. आणि खरे तर त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्ववाला तुम्ही तिलांजली दिली हे सत्य आहे. 

शेखर जोशी

२८ मार्च २०२३

गुरुवार, २३ मार्च, २०२३

ठाकरे, फडणवीस यांची 'दिल दोस्ती' आणि बासनात गुंडाळलेली प्रकरणे

 ठाकरे, फडणवीस यांची 'दिल दोस्ती' 

आणि बासनात गुंडाळलेली प्रकरणे

 


'निनावी' पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना थेट वरुन अभय मिळाले? आणि म्हणून त्यांनी आपले कट्टर राजकीय हाडवैरी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी हसतखेळत गप्पा मारल्या? 

आधी अडीच वर्षे याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर   किती गरळ ओकली होती? 

आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे. सुशांतसिंह, दिशा सालियन संशयास्पद मृत्यू प्रकरण, पालघर साधू हत्याकांड,  पत्राचाळ प्रकरण, करमुसे मारहाण, रश्मी उद्धव ठाकरे यांचे कथित बंगले, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कुटुंबीय यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी, 'मातोश्री'च्या गळ्याशी आलेला 'पाटणकर' काढा‌ ही सगळी प्रकरणे देवेंद्र फडणवीस यांनी बासनात गुंडाळून ठेवली का? की गुंडाळून ठेवा म्हणून वरुन आदेश आले? 

सर्वसामान्य नागरिकांच्या मनात या घडलेल्या सर्व घटनांबाबत संशयाचे वातावरण आहे. त्या त्या वेळी भाजपने, भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि दस्तुरखुद्द फडणवीस यांनीही त्यावेळी अगदी घसा खरवडून आवाज उठवला होता. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्ता स्थापन करून झाले की बरेच महिने. फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे. काढा की सगळे पहिल्यापासून खणून. यावर, याची चौकशी केंद्रीय तपास संस्थांकडून सुरू आहे, असे तकलादू कारण पुढे केले जाईल. पण महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून जे तुमच्या हातात आणि अधिकारात आहे, ते तरी करा.

महाराष्ट्रात राजकीय शत्रुत्व नाही, आपली राजकीय संस्कृती, परंपरा वेगळी आहे, ही वाक्ये टाळ्या घेण्यासाठी ठिक आहेत. सत्ताधारी आणि विरोधक मग ते कोणत्याही राजकीय पक्षांचे असोत आतून सर्व एकमेकांशी मिळालेलेच असतात, एका मर्यादेपर्यंत एकमेकांच्या भानगडी, घोटाळे राजकीय सोयीसाठी बाहेर काढले जातात आणि नंतर बासनात गुंडाळूनही ठेवले जातात. 

विद्यमान सत्ताधारी विरोधक आणि विद्यमान विरोधक सत्ताधारी झाले की लुटुपुटूची लढाई सुरू होते. कोणी किती ताणायचे हे आधीच ठरलेले असते. त्या त्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक मात्र एकमेकांचे गळे धरतात आणि सर्वपक्षीय राजकीय नेते पडद्याआड गळ्यात गळे घालून याची मजा लुटतात, हेच कटू आणि संतापजनक सत्य आहे. 

आम्ही योगायोगाने समोरासमोर आलो आणि म्हणून काही वेळ हसत खेळत गप्पा मारल्या, त्यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये किंवा भाकित करू नये अशी ठोकळेबाज मखलाशी उद्या ठाकरे आणि फडणवीस करतीलही, पण त्याला काहीही अर्थ नाही. कोणी शेंबडे पोरही त्यावर विश्वास ठेवणार नाही.‌

 शेखर जोशी

२३ मार्च २०२३

परंपरा आणि सामाजिकतेचे भान

महाराष्ट्र टाइम्स-ठाणे प्लस/ २२ मार्च २०२३

 

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

नवीन शालिवाहन शकवर्ष १३ महिन्यांचे

श्रावण अधिकमास आल्याने नवीन शालिवाहन शकवर्ष १३ महिन्यांचे- ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण

 येत्या २२ मार्च रोजी श्रीशालिवाहन शके१९४५ शोभननाम नाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. या नवीन संवत्सरात श्रावण महिना अधिक असल्याने हे वर्ष तेरा महिन्यांचे असणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. 

 

गुढीपाडव्याच्याच दिवशी भारतीय राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होत असून यापूर्वी २००४ या वर्षी असा योग आला होता. २०४२ मध्येही गुढीपाडव्याच्याच दिवशी राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले. नूतन शालिवाहन शक १९४५ हे संवत्सर २२ मार्च २०२३ पासून ८ एप्रिल २०२४ पर्यंत असणार आहे. या नूतन संवत्सरामध्ये १८ जुलै २०२३ ते १६ ॲागस्ट २०२३ श्रावण अधिकमास आला असल्याचे सांगून सोमण म्हणाले, त्यामुळे नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती, गणेशचतुर्थी , नवरात्र, विजया दशमी, दीपावली इत्यादी सण १९ दिवस उशीरा येणार आहेत.


ठराविक सण हे ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी भारतीय पंचांगे ही चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असतांना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो , त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. या नूतन वर्षी कर्क राशीत सूर्य असतांना १८ जुलै रोजी आणि १७ ॲागस्ट रोजी अशा दोन चांद्रमासांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे अधिक श्रावण आणि निजश्रावण असे दोन श्रावणमास आले आहेत, अशी माहिती सोमण यांनी दिली.  


या नूतन शालिवाहन शक वर्षामध्ये ३५० वा शिवराज्याभिषेकोत्सव दिन येत असून २ जून २०२३ रोजी शिवराज शक ३५० चा प्रारंभ होत आहे. शालिवाहन शके १९४५ या नूतन वर्षामध्ये एकही अंगारकी संकष्ट चतुर्थी येत नाही. सुवर्ण खरेदीदारांसाठी सहा गुरुपुष्यामृत योग येणार आहेत. या नूतन संवत्सरामध्ये भरपूर विवाहमुहूर्त देण्यात आले असल्याचे सोमण यांनी सांगितले. 

शेखर जोशी 
 १७ मार्च २०२३

शुक्रवार, १० मार्च, २०२३

मुंबईत राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव

 


मुंबई विद्यापीठात उद्यापासून राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव

- नाट्य रसिकांना विनामूल्य प्रवेश, 

मुंबई विद्यापीठाच्या ‘ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्’ विभागातर्फे ११ ते १८ मार्च या कालावधीत वसंत राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  यंदा नाट्य महोत्सवाचे १३ वे वर्ष आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपुर आणि दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांचे विशेष सहकार्य या नाट्य महोत्सवासाठी लाभले आहे.


पुरुषोत्तम बेर्डे आणि मनोज जोशी 

विद्यापीठाच्या कलिना संकुलातील  ‘मराठी भाषा भवन’ च्या नाट्यगृहात ११ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी हे प्रमुख पाहुणे तर अध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा. प्रा. डी. टी. शिर्के,  प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

११ मार्च रोजी महोत्सवाच्या उदघाटनानंतर ‘स पा न, नाशिक’ या संस्थेच्या दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘तो राजहंस एक’ हे नाटक सादर होणार आहे. 

नाट्यमहोत्सवामध्ये भारतातील विविध नामांकित संस्था सहभागी होणार असून विशेषतः झारखंड, नैनिताल, गुजरात, गोवा या राज्यांसह मुंबई, नाशिक, अहमदनगर येथील नाट्यसंस्थांचे प्रयोग सादर होणार आहेत. 

कुमार सोहनी आणि अभिराम भडकमकर 

१८ मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता नाट्य महोत्सवाचा समारोप होणार असून ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी, नाटककार अभिराम भडकमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्या नंतर संध्याकाळी ७.३० वाजता  ‘आधे अधुरे’ हे नाटक सादर होणार आहे.

योगेश सोमण

मुंबई विद्यापीठाच्या ‘ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्’चे संचालक योगेश सोमण,  महोत्सवाचे प्रमुख प्रा. डॉ. मंगेश बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा नाट्योत्सवाची आखणी करण्यात आली आहे.  नाट्योत्सवास रसिक प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश असून जास्तीत रसिकांनी या नाट्योत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन योगेश सोमण यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ९९२०४२०३८८/ ९८९२१४३१६३ 


नाट्य महोत्सवात सादर होणारी अन्य नाटके- 

रविवार १२ मार्च, दुपारी ४ वाजता  ‘३ मेन’ 

संध्याकाळी ७.३० वाजता ‘सेम सेम बट डीफरंट’ 

सोमवार १३ मार्च, दुपारी चार वाजता‘ ‘राशोमान’ 

संध्याकाळी ७.३० वाजता ‘दास्तान-ए-रामजी’ 


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील सावरबेट 

मंगळवार १४ मार्च, दुपारी ४ वाजता  ‘सावरबेट’   

बुधवार,१५ मार्च,  दुपारी ४ वाजता ‘स्त्री, जातं, ओवी आणि कविता’

संध्याकाळी ७.३० वाजता- ‘पगला घोडा’

गुरुवार १६ मार्च, दुपारी चार वाजता ‘खटारा’

संध्याकाळी ७.३० वाजता, ‘लहरों के राजहंस’ 

शुक्रवार १७ मार्च, दुपारी ४ वाजता  ‘आमचं तुमचं नाटक’ 

-------

रविवार, ५ मार्च, २०२३

'वसंत' ऋतूचे संगीत

 

संगीतकार वसंत प्रभू 

‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला’, ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’, ‘कळा ज्या लागल्या जिवा’, ‘चाफा बोलेना’, ‘जेथे सागरा धरणी मिळते’, ‘जन पळभर म्हणतीतल हाय हाय’, ‘मानसीचा चित्रकार तो’, ‘राधा कृष्णावरी भाळली’ ही आणि अशी अनेक अवीट गोडीची गाणी संगीतबद्ध करणारे संगीतकार वसंत प्रभू यांचे जन्मशताब्दी वर्ष या वर्षीच्या जानेवारी (१९ जानेवारी) पासून सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने...

पी. सावळाराम यांनी लिहिलेल्या ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’ या गाण्याने इतिहास निर्माण केला. पुणे रेल्वे स्थानकावर एका नवविवाहित मुलीची सासरी पाठवणी करताना आईच्या डोळ्यांत अश्रू होते. आईने मुलीची ‘सासरी सुखी राहा, डोळ्यात पाणी आणू नको’अशा शब्दांत समजूत काढली. पी. सावळराम हे त्या प्रसंगाचे एक साक्षीदार होते. प्रतिभावान सावळाराम यांनी त्या प्रसंगाला डोळ्यांसमोर ठेवून ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा’ हे गाणे लिहिले. लता मंगेशकर यांच्या आर्त स्वरातील या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक निर्माण केला. त्या काळात तर गाजलेच, पण आजही प्रत्येक मराठी लग्न या गाण्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आचार्य अत्रे यांनी या गाण्याचे कौतुक करताना ‘गंगा जमुना हे गाणे एका पारडय़ात आणि इतर सगळी गाणी दुसऱ्या पारडय़ात टाकली तरीही ‘गंगा जमुना’चे पारडेच जड होईल’ असे म्हटले होते. संगीतकार वसंत प्रभू, कवी/गीतकार पी. सावळाराम आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्रयीने मराठी भाव व चित्रपट संगीताला अनेक अवीट गोडीच्या गाण्यांची अमूल्य भेट दिली.


साधी व सोपी आणि सहज गुणगुणता येईल अशी चाल हे प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याचे ठळक वैशिष्टय़. संगीतकार अशी ओळख असलेल्या प्रभू यांनी सुरुवातीला हिंदी चित्रपटात ‘बाल अभिनेता’ म्हणून काम केले. वसंत प्रभू यांचे मूळ नाव व्यंकटेश प्रभू. पण हिंदी चित्रपटासाठी हे नाव चालणार नाही म्हणून त्यांचे ‘वसंत’ असे नामकरण करण्यात आले. प्रभू यांनी बाल कलाकार म्हणून पाच हिंदी चित्रपटांत काम केले. १९३८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जमाना’ या हिंदी चित्रपटात प्रभू यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन राम दर्यानी यांचे होते. ‘व्यंकटेश’ हे नाव चित्रपटासाठी योग्य ठरणार नाही म्हणून दर्यानी यांनी व्यंकटेशचे नामकरण ‘वसंत’ असे केले. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत ‘बाल अभिनेता वसंत’ असे त्यांचे नावही देण्यात आले. ‘जमाना’ या चित्रपटाखेरीज प्रभू यांनी ‘मास्टर मॅन’, ‘राजकुमारी’, ‘देखा जाएगा’, ‘जीवनसाथी’ या हिंदी चित्रपटात काम केले होते.


भार्गवराव पांगे हे प्रभू यांचे गुरू. त्यांच्या मेळ्यामधून ते काम करायला लागले. मेळ्यात ते गाणीही म्हणत असत. ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील एक गाणे २४ वेळा म्हटल्यामुळे (वन्समोअर घेत) त्यांचा आवाज फुटला. त्यामुळे त्यांना गाता येईना. त्यामुळे पांगे यांनी त्यांना मोरे नावाच्या गृहस्थांकडे नृत्य शिकायला पाठविले. नृत्य शिकल्यानंतर काही काळ त्यांनी नृत्यशिक्षक म्हणूनही काम केले. त्या काळात वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले ‘अरे पाटलाच्या पोरा जरा जपून’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. प्रभू ज्या मोरे यांच्याकडे नृत्य शिकायला जात होते, त्यांचा मोठा भाऊ कविता करायचा. त्यांनी याच गाण्यासारखे ‘अगं पाटलाच्या पोरी जरा जपून’ हे गाणे लिहिले व त्याला चाल लावायला प्रभू यांना सांगितले. प्रभू यांनी त्याला चालही लावली. ‘एचएमव्ही’ने त्याची ध्वनिमुद्रिका काढली. प्रभू यांची ती पहिली ध्वनिमुद्रिका. ‘पाटलाचा पोर’ हा संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता, 

प्रभू यांनी काही काळ ‘एचएमव्ही’मध्येही संगीत दिग्दर्शक म्हणून नोकरी केली. ‘एचएमव्ही’चे वसंतराव कामेरकर यांनी प्रभू यांच्यातील गुणवत्ता आणि प्रतिभा हेरली होती. ‘एचएमव्ही’मध्ये नोकरी करत असतानाच्या काळातही प्रभू यांच्याकडून अनेक उत्तमोत्तम गाणी तयार केली गेली. प्रभू यांनी सुमारे २५ चित्रपटांना संगीत दिले. भावगीतांप्रमाणेच त्यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटांतील गाणीही गाजली. ‘मानसीचा चित्रकार’ हे वसंत प्रभू यांचे चरित्र/आत्मचरित्र प्रसिद्ध असून ते मधू पोतदार यांनी लिहिले आहे. 

भगवान श्रीकृष्णाने ‘ऋतुनाम कुसुमाकर:’ अशा शब्दात भगवद्गीतेमध्ये वसंत ऋतूचे कौतुक केले आहे. मराठी साहित्यातही अनेक लेखक आणि कवींनी वसंत ऋतूचे वेगवेगळ्या शब्दांत वर्णन केले आहे. हर्षांचा, उत्साहाचा आणि संपूर्ण सृष्टीला नवे रूप देणारा ऋतू म्हणून वसंत ऋतूचे विशेष महत्त्व आहे. मराठी संगीतातही संगीतकार वसंत देसाई, वसंत पवार आणि वसंत प्रभू या तीन ‘वसंत’ नावांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. वेगवेगळ्या प्रकारची अजरामर गाणी देऊन संगीतात ‘वसंत’ऋतू निर्माण केला. १९ जानेवारी १९२४ मध्ये जन्मलेल्या 'वसंत' ऋतूचा ( प्रभू) १३ ऑक्टोबर १९६८ या दिवशी अस्त झाला.‌

 प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली काही लोकप्रिय गाणी 

आली हासत पहिली रात, कळा ज्या लागल्या जिवा, कोकिळ कुहूकुहू बोले, घट डोईवर घट कमरेवर, जो आवडतो सर्वाना, डोळे हे जुलमी गडे, मानसीचा चित्रकार तो, रघुपती राघव गजरी गजरी, राधा कृष्णावरी भाळली, राधा गौळण करिते, रिमझिम पाऊस पडे सारखा, पाहुनी रघुनंदन सावळा, लाजली सीता..सप्तपदी हे रोज चालते, हरवले ते गवसले का, प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला, मधु मागसी माझ्या सख्या परी, सखी शेजारिणी


शनिवार, ४ मार्च, २०२३

कामगारांचे कैवारी

विस्मरणातील अंबरनाथकर या लेखमालिकेतील पुढील लेख. कामगारांचे कैवारी
पुरुषोत्तम वासुदेव ऊर्फ भाऊसाहेब परांजपे
महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लस
४ मार्च २०२३


महाराष्ट्र टाइम्स- ठाणे प्लस/ ४ मार्च २०२३

शुक्रवार, ३ मार्च, २०२३

गड-दुर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार - पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती



 गड-दुर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी 

स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार 

- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती 

महाराष्ट्रातील सर्व गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण करण्यासाठी आणि त्यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी स्वतंत्र ‘गड-दुर्ग महामंडळा’ची स्थापना येत्या तीन महिन्यांत करण्यात येईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे दिले.

‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी  लोढा यांनी आझाद मैदानात येऊन समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यावेळी बोलताना लोढा यांनी हे आश्वासन दिले.

ठराविक कालमर्यादा ठरवून सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यात येतील, तसेच उर्वरित सर्व मागण्यांच्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर सर्व दुर्गप्रेमी संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात येईल, असेही लोढा यांनी सांगितले.

महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’ आयोजित ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्च्या’त राज्यभरातून गड-दुर्गप्रेमी संघटनांचे सुमारे दीड हजारांहून अधिक शिवप्रेमी सहभागी झाले होते.‌ मुंबईतील मेट्रो चित्रपटगृह ते आझाद मैदान काढण्यात आलेल्या मोर्च्यात नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार  कुणाल मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज संदेश देशपांडे, धर्मवीर संभाजी महाराज यांची दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील आणि सरनोबत अंतोजीराजे गाडे पाटील यांचे वंशज अमित गाडे, वीर कोयाजी बांदल यांचे वंशज अक्षय बांदल, मोरोपंत पिंगळे यांचे वंशज विश्वजित देशपांडे, कृष्णाजी गायकवाड यांचे वंशज अप्पासाहेब गायकवाड, वीर शिवा काशिद यांचे वंशज  आनंदराव काशिद,  पंताजीकाका बोकील यांचे वंशज गौरव बोकील या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वंशजांचा सहभागही लक्षवेधी होता, 



‘समस्त हिंदु बांधव संघटने’चे रविंद्र पडवळ, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर,  वसई येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संचालक भार्गव श्री बी.पी. सचिनवाला, श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य पिठाच्या ‘धर्मसभा-विद्वत्संघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, ‘सनातन संस्थे’च्या धर्मप्रसारक अनुराधा वाडेकर यांच्यासह   समस्त हिंदू बांधव संघटना, शिवराज्याभिषेक समिती, मराठा वॉरीयर्स, गड-दुर्ग संवर्धक संघटना, दुर्गवीर प्रतिष्ठान, श्री शंभूदुर्ग प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी (महिला शाखा), युवा मराठा महासंघ, शिववंदनेश्वर प्रतिष्ठान, स्वतंत्र सवर्ण सेना, हिंदु धर्मजागरण, सनातन संस्था, अखिल भारतीय मराठा सेवा महासंघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी गड-दुर्गप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’चे समन्वयक सुनील घनवट म्हणाले,  विशाळगडावर शंभरहून अधिक अनधिकृत पक्की बांधकामे झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले. अशाच प्रकारे रायगड, लोहगड, कुलाबा, वंदनगड, दुर्गाडी किल्ला यांसह राज्यातील महत्त्वाच्या ३५ महत्त्वाच्या गड-दुर्गांवर अवैधपणे घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य विविध प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांवरील ही अतिक्रमणे शिवप्रेमींच्या श्रद्धांवर आघात करणारी तर आहेतच, तसेच प्रचंड चीड आणणारीही आहेत. याला पुरातत्व विभागाचे जे अधिकारी उत्तरदायी असतील, त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई करावी.



अनेक गड-दुर्गांच्या ठिकाणी होणारे मद्यपान, विद्रूपीकरण, अस्वच्छता आदी अपप्रकार थांबवावेत, तसेच अनेक गड-दुर्गांची मोठ्या प्रमाणावर झालेली पडझड, ढासळलेले बुरूज, तोफांची दुरावस्था थांबविण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष घालावे. 

शासनाने गड-दुर्ग संवर्धनासाठी पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत, तसेच गडांची नियमित स्वच्छता आणि पावित्र्यरक्षण यांसाठी शासनाने गड-दुर्गप्रेमी संघटनांचे साहाय्य घ्यावे. पुरातत्त्व खात्याने सर्व गड-दुर्गांची योग्य माहिती आणि कायदेशीर बाबी सांगणारे संकेतस्थळ चालू करावे. त्यात नागरिकांना तक्रार करण्याची सोय असावी. गड-दुर्ग रक्षणासाठी स्थापन करण्यात येणार्‍या महामंडळात गड-दुर्ग संवर्धनासाठी कार्य करणारे प्रतिनिधी, मावळ्यांचे वंशज, गड परिसरातील दुर्गप्रेमी-शिवप्रेमी यांना सहभागी करावे, आदी विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या.

गुरुवार, २ मार्च, २०२३

कसबा पोटनिवडणूक निकाल; भाजपने आत्मपरीक्षण करावे आणि कॉंग्रेसने हुरळू नये

 

'

आधी कोथरूड आता कसबा गृहित धरणा-यांना धडा शिकवा' अशी चर्चा समाज माध्यमांतून रंगली होती. आज निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारांना गृहीत धरणा-या भाजपला मतदारांनी खरोखरच धडा शिकवला, असे म्हणावे लागेल. ठेच लागल्यामुळे भाजपने आत्मपरीक्षण करावे आणि कॉंग्रेसने, पर्यायाने महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये, हा कसबा पोटनिवडणूक निकालाचा धडा आहे. 

मतदारांना कोणीही, कोणत्याही राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय पक्षांनी गृहीत धरू नये. सुजाण आणि सुबुद्ध मतदार कधी, केव्हा आणि कसा धडा शिकवितील हे अनाकलनीय आहे. कसबा हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. २८ वर्षांनंतर पहिल्यांदाचा भाजपला येथे पराभवाची धूळ चारली गेली.‌ कसब्यातील नाराजांनी 'नोटा' मताधिकार वापरून की 

की उमेदवार पाहून भाजपला धडा शिकवला? महापालिका किंवा नगरपालिका निवडणुकीत अनेकदा स्थानिक प्रश्न, दिलेला उमेदवार, त्याची ओळख हेच महत्वाचे ठरते. महापालिका पातळीवर राष्ट्रीय राजकारण, प्रश्न फारसे महत्त्वाचे ठरत नाहीत.‌ कसब्यातील पोटनिवडणूक विधानसभेची असली आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात होणारी होती, राज्यात भाजप व शिवसेना (शिंदे गट) सत्ताधारी होते. तरीही भाजपला पराभव पत्करावा लागला याचे मुळात जाऊन चिंतन करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व ताकद पणाला लावूनही भाजपचा बालेकिल्ला ढासळला.

 


'पार्टी विथ डिफरन्स' अशी टिमकी वाजविणा-या भाजपची भगवी कॉंग्रेस होत चालली आहे.‌ कॉंग्रेस (आय) असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो. दोन्हीही काँग्रेसला मत देऊच नये. आज देशातून दोन्ही काँग्रेस आपल्या कर्माने संपत चालल्या आहेत, त्यांना त्यांच्या कर्माने संपू दे. भाजप, विशेषतः महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमधील आयारामांना पायघड्या घालून भाजपमध्ये प्रवेश दिला. 'आयारामांना पायघड्या आणि निष्ठावंतांचे पोतेरे' कशासाठी? दोन्ही काँग्रेसमधील ओवाळून टाकलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मोठे करून त्यांची सोय कशासाठी लावली गेली? हे राजकारण तत्कालिक फायद्याचे ठरले तरी दीर्घकाळ ते सोयीचे किंवा फायद्याचे न ठरता अडचणीचेच ठरू शकते.‌

खरे तर पोटनिवडणुकीत मृत झालेल्या महिला किंवा पुरुष लोकप्रतिनिधींच्या निकटच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जाते.‌ हे चूक की बरोबर हा वेगळा मुद्दा. पण सर्व राजकीय पक्ष हाच निकष लावतात आणि भाजपनेही चिंचवडमध्ये तोच निकष लावला तर हाच न्याय कसब्यात का लावला गेला नाही? की पोटनिवडणुक होती म्हणून भाजपने जुगार खेळायचे ठरवले? 

या आधी कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आणि ब्राह्मण वर्गाची नाराजी ओढवून घेतली. पण कोथरुडकरांना जे जमले नाही ते कसबाकरांनी करून दाखवले. काही वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही डोंबिवलीकर मतदारांनी भाजपला धडा शिकविला होता. डोंबिवलीत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या अधिकृत उमेदवारांना पाडून त्या प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक निवडून आले होते.  

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली होती.‌ काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली.तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळाली. इथे जयश्री जाधव विजयी झाल्या. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत रमेश कटके यांच्या पत्नीला शिवसेनेने उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या.‌ भाजपने इथे आधी उमेदवार उभा केला आणि नंतर माघार घेतली. 


कसब्यातील रासने यांचा पराभव आणि धंगेकर यांचा विजय भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धक्कादायक आहे. काही दिवसांपू्र्वी झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही भाजपला पराभवाचा धक्का बसला. कसब्यातील सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठेतील ब्राह्मण समाज हे भाजपचे पारंपरिक मतदार आहेत आणि तरीही येथे कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होणे धक्कादायक आहे. यापुढे सर्वसामान्य मतदाराला गृहित धरू नये, असा धडा कसब्यातील मतदारांनी भाजपसहित सर्व राजकीय पक्षांना दिला आहे. या विजयामुळे कॉंग्रेसला पर्यायाने महाविकास आघाडीला आनंदाचे भरते आले आहे. पण म्हणून कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीने किंवा भाजप विरोधकांनी हुरळून जाऊ नये. असेच चित्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल या भ्रमात राहू नये. धंगेकर यांच्या विजयाने संपत चाललेल्या दोन्ही काँग्रेसना, शिवसेनेला थोडी धुगधुगी मिळाली, एवढाच याचा अर्थ आहे. भाजपनेही एकूणच आपल्या धोरणांचा, निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे.‌ 

राजकारणात कोणीही आणि कोणताही पक्ष धुतल्या तांदुळासारखा स्वच्छ नसतो. कोणी होऊन गेले ते सन्माननीय अपवाद म्हणता येतील. सध्याच्या 'मनी, मसल पॉवर' आणि 'निवडून येणे' हीच क्षमता असलेल्या राजकारणात सर्वसामान्य मतदारांच्या हातात 'दगडापेक्षा वीट मऊ' एवढाच पर्याय असतो. आता दगड की वीट निवडायची? तो शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे. असो. 

पण एकदा कधीतरी निवडणूक आयोगाने जो नकाराधिकार मतदानाचा अधिकार (नोटा) दिला आहे, त्याला सर्वाधिक मते मिळावीत आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला कमी मते पडून सर्वाधिक मते घेतलेल्या उमेदवाराची निवडणूक रद्द व्हावी अशी इच्छा आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत जाऊ दे पण किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकदा तरी असे घडू दे.‌ कसब्यातील ऐतिहासिक निकालाने एक वेगळी वाट चोखाळली गेली आहेच तसेच 'नोटा' बाबतीत व्हावे.

शेखर जोशी

२ मार्च २०२३