काही जणांना विषय कोणताही असो त्यात नाक खुपसायची सवयच असते. येन केन प्रकारेण चर्चेत व बातम्यात राहण्यासाठीची ही धडपड असते. 'थोरल्या' साहेबांचा हात कायम आपल्या पाठीवर कसा राहिल, याचीही दक्षता ही मंडळी घेत असतात. अशी 'जित्या'ची खोड अनेकांना असते.
याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे पुण्यातील फर्ग्यसन महाविद्यालयातील प्रकरण. इतिहासाचा किती विपर्यास करायचा, त्यालाही काही मर्यादा असते.काही 'जित्या'ना कायम फुले, शाहु, आंबेडकर यांच्या नावाचा जप करायची सवय लागलेली असते. पण हे करताना इतरांचे थेट सांगायचे तर ब्राह्मणांचे कर्तृत्व, त्यांनी दिलेले सामाजिक योगदान, त्यांनी केलेल्या सामाजिसुरुचक सुधारणा ते जाणीवपूर्वक नाकारतात. किंवा त्यांच्याबाबत नाहक द्वेष पसरवतात. अनेक 'जित्या'ना त्यातच धन्यता वाटते. पण त्यांना हे कळत नाही की यातून ती मंडळी खुजी होत नाही किंवा त्यांचे योगदान कमी होत नाही तर तुम्ही खुजे ठरता व यातून तुमचा फक्त द्वेष आणि द्वेषच दिसून येतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्र पोहोचविणारे आणि त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेले बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करताच अशाच काही 'जित्यां'चे पीत्त खवळले होते.
मागे एकदा मुंब्रा येथे अशाच एका 'जित्या'च्या खोडाने एका पोलीस अधिकाऱयाला नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी हा मोर्चा अडवला म्हणून तीळपापड झालेल्यांनी पोलीस अधिकाऱयाशी हुज्जत घालून ही धमकी दिली.
इशरत जहॉं प्रकरण असो, फेस्टिव्हलमध्ये वादग्रस्त चित्रकार एम. एफ. हुसेन यांची चित्रे लावणे असो किंवा ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महात्मा गांधी यांची हत्या करणाऱया नथुराम गोडसे यांच्यावरील लेख स्मरणिकेत छापण्यात आला म्हणून ती स्मरणिका जाळण्याचे हिंसक आंदोलन असो, अशा 'जित्या'च्या खोड्या सुरुच असतात.
या सगळ्या प्रकरणात अशा 'जित्यां'च्या घरातील वडीलधारी मंडळी आणि थोरले साहेबही मुग गिळून गप्प असतात. ते चकार शब्दाने अशा 'जित्यां'ना काहीही बोलत नाहीत की दटावत नाही. त्यामुळे आपण जे करतो ते बरोबरच आहे, असा समज करुन ते चेकाळतात. अर्थात काही 'जित्यां'च्या थोरल्या साहेबांनाही अप्रत्यक्षपणे तेच हवे असते.
अशा वाचाळ, बोलघेवड्या, चमकेश 'जित्या'नीच राजकारणाची वाट लावली आहे. अर्थात ते सगळीकडेच आहेत. 'जित्या'ही व्यक्ती नसून प्रवृत्ती झाली आहे.
असो. आपल्या आजूबाजूला तुम्हाला असा 'जित्या' आढळून आला तर तो योगायोग.... समजू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा