शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३

शिवपिंडीवरील बर्फ आणि विरोधकांच्या हातात कोलीत

त्र्यंबकेश्वर- संग्रहित छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील शिवपिंडीवर बर्फ जमा होण्याचा प्रकार बनावट असल्याचे उघड झाले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ज्यांनी हा प्रकार घडवून आणला तो पुजारी आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई झालीच पाहिजे. गेल्या वर्षी ३० जून २०२२ या दिवशी मंदिरातील एक पुजारी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी शिवपिंडीवर बर्फ जमा झाल्याची ध्वनिचित्रफित तयार करून ती समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आली. घडलेल्या घटनेनंतर देवस्थानच्या ट्रस्टने तीन विश्वस्त सदस्यांची समिती नेमून समितीला अहवाल सादर करण्यास सांगितला. या समितीने मंदिराचे सीसीटीव्ही चित्रीकरण आणि चौकशी करून बर्फ तयार झाल्याचा हा प्रकार बनावट असल्याचा अहवाल सादर केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत 'पुजारी' असा उल्लेख करण्यात आला आहे.‌ त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाने पुजारी म्हणजे पुरोहित नाही. त्र्यंबकेश्वर येथे हे हे दोन घटक वेगवेगळे आहेत, अशी जाहीर सूचनाच पुरोहित संघाने केली आहे. तथाकथित ढोंगी पुरोगामी, अंनिसवाले आणि हिंदू धर्म, संस्कृतीविरोधक आधीच टपून बसलेले असतात. त्यांच्या हातात नाहक कोलीत मिळेल असे कृत्य करायचेच कशाला? हा सगळा प्रकार चीड आणणारा आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असून ते अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते. लाखो भाविकांच्या श्रद्धेशी खेळण्याच हा प्रकार संतापजनक आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव आणला जाणार नाही हे पाहिले पाहिजे. हा प्रकार पुजा-यानी केला आहे. भविष्यात कोणा पुरोहिताकडूनही समजा असे गैरकृत्य घडले तर त्यांच्या विरोधातही कठोर कारवाई केली जावी. मुळातच भावना,श्रद्धेशी खेळण्या-यांना कोणतीही दयामाया दाखविली जाऊ नये.‌बर्फ ठेवणारे ते आरोपी महादेवाच्या पिंडीवरील विंचू ठरू नयेत, ही त्या त्रंबकेश्वरचरणी प्रार्थना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: