दादरच्या शिवाजी उद्यानासमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात अंदमानच्या तुरुंगाची प्रतिकृती आणि
कोलूची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तेल काढण्यासाठी ब्रिटिशांनी अंदमानात कोलूला जुंपले होते. उन्हात,पावसात ही शिक्षा दिली. हा अनुभव घेण्यासाठी नाईक यांनी सावरकर स्मारकाला कोलू फिरविण्यास अनुमती द्यावी अशी विनंती केली होती.
हा कोलू थेट ऊन येत नाही तिथे आहे. मात्र तरीही सध्याचा उन्हाळा आणि कोलूची कृती यातून माणसाच्या अंगातून घामाच्या धारा तर निघतातच पण त्याशिवाय ताकद लावायला लागते, गोल फिरवत चक्करा माराव्या लागतात. मी अधूनमधून थांबून हा प्रयत्न केला मात्र नंतर दमल्याने तेथेच पथारी टाकून पडलो, असेही नाईक म्हणाले.
त्यानंतर सावरकर स्मारकाच्या कर्मचाऱ्यांनी मला आतमध्ये नेऊन विश्रांती घेण्याची व्यवस्था केली. विश्रांतीनंतर पुन्हा कोलू चालविण्यासाठी आलो पण पाय जडावले होते यामुळे काम थांबविले. यातून तेल निघण्यासाठी पांढरे नव्हे तर लाल शेंगदाणे वापरावे लागतात, असे तेथे आलेल्या एका तेल घाण्याच्या व्यावसायिकाने सांगितल्याने मी पांढरे शेंगदाणे टाकून जो प्रयत्न केला त्यातून आणखी वेळ जाणार हे नक्की झाले. त्यानंतर कोलू ओढता आला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात किती भीषण आणि भयावह त्रास सहन केला असेल, त्याची कल्पना करणेही कठीण असल्याचे नाईक यांनी सांगितले.
नाईक यांनी पहिल्यांदा बेड्या घालून कोलू ओढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या पँटवरूनही त्या बेड्यांमुळे कासले गेल्याने त्यांनी बेड्या काढून कोलू ओढला. त्यासाठी त्यांनी ५ किलो शेंगदाणे घेतले होते. त्यापैकी अडीच किलो शेंगदाणे कोलूमध्ये टाकले. कोलूला असलेला दांडा उचलणेही कठीण असून त्यासाठी दोन माणसे लागतात, हे त्यांना लक्षात आले. तर कोलू द्वारे सुमारे दोन ते अडीच तास त्यांनी थांबत थांबत कोलू चालवून शेंगदाणे बारीक केले.
(छायाचित्रे आणि चित्रफित स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र य. बिवलकर यांच्या सौजन्याने)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा