![]() |
नंदुरबार तालुक्यातील एका आदिवासी महिलेला शिधा देण्यात आला |
'शबरी शिधा' देऊन उभारली प्रेमाची गुढी!
महाराष्ट्राच्या वनवासी/ आदिवासी भागात शबरी सेवा समिती गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहे. यापैकी 'शबरी शिधा' हा उपक्रम गेली पाच वर्षे राबविण्यात येत असून गुढीपाडव्याच्या दिवशी धुळे जिल्ह्यातील भिलटपाडा, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तसेच ठाणे जिल्ह्यातील जव्हार, वाडा, विक्रमगड येथील ४६५ कुटुंबांना दोन महिने पुरेल इतका शिधा देण्यात आला. या सर्व घरी गुढीही उभारण्यात आली.
![]() |
धडगाव तालुक्यातील वयोवृद्ध, एकाकी महिलेस शिधा देण्यात आला. सोबत शेजारी आणि देवीसिंग पाडवी हे कार्यकर्ते |
येथील आदिवासी/ वनवासी कुटुंबांची हलाखीची परिस्थिती आहे. राहण्यासाठी जिथे धड घरही नाही तिथे दररोजच्या जेवणाची आणखीनच भ्रांत. राज्य शासनाकडून गहू, तांदूळ व अन्य काही वस्तू या आदिवासी/वनवासी कुटुंबांना शिधावाटप दुकानात मोफत मिळतात. पण त्याहीपेक्षा अधिक काही वस्तू शबरी सेवा समितीकडून या कुटुंबांना मोफत दिल्या जातात. यात तुरडाळ, मुगडाळ, तेल, काही कडधान्ये, बेसन, रवा,पोहे, शेंगदाणे, गुळ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. काही ठिकाणी आवश्यकता असेल तर कपडेही दिले जातात, अशी माहिती शबरी सेवा समितीचे संस्थापक प्रमोद करंदीकर यांनी दिली.
![]() |
पिंपळोद येथील केशाबाई वळवी यांना शबरी शिधा देण्यात आला |
गेली पाच वर्षे कोणतीही शासकीय आर्थिक मदत न घेता हा उपक्रम सुरू आहे. राजकीय पक्ष/ नेते यांच्याकडूनही मदत घेण्यात येत नाही. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, सर्वसामान्य नागरिक यांच्या आर्थिक मदतीतून शबरी सेवा समितीचे विविध उपक्रम राबविले जातात. या गुढीपाडव्याला ४६५ कुटुंबांना जो सर्व शिधा देण्यात आला त्यासाठी आनंदकुमार गाडोदिया यांनी आर्थिक मदत केली होती. आता सुमारे दोन महिन्यांनतर या कुटुंबांना पुन्हा शिधा देण्यात येईल. शिधा देताना त्या कुटुंबांची गरज, आवश्यकता याचाही विचार केला जातो, असेही करंदीकर यांनी सांगितले. आपली पत्नी रंजना, शबरी सेवा समितीचे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, देणगीदार या सर्वांच्या सहकार्याने आमची वाटचाल सुरू आहे, असेही करंदीकर म्हणाले.
काही आणू नकोस, पण पुन्हा भेटायला नक्की ये...
![]() |
भिलटपाडा येथील ताराबाई यांच्यासाठी जेवण तयार करताना प्रमिला |
धुळे जिल्ह्यातील आणि शिरपूर तालुक्यातील भीलटपाडा येथील एक अनुभव डोळ्यात पाणी आणणारा आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध असणा-या ताराबाई पवार यांच्या घराची अवस्था पाहून शबरी सेवा समितीच्या कार्यकर्त्या प्रमिला सायसिंग यांना हुंदका आवरता आला नाही. ताराबाई जिथे राहात होत्या त्या जागेला घर तरी कसे म्हणावे, अशी अवस्था होती. अक्षरशः उकिरडा झाला होता. प्रमिला यांनी ताराबाई यांचे घर आणि आजुबाजूचा परिसर स्वच्छ केला. प्रमिला यांनी गरम गरम स्वयंपाक केला व ताराबाईंना जेवण वाढले. त्यांच्या घरासमोर गुढी उभारली आणि त्यांना शबरी शिधा दिला. प्रमिला यांनी ताराबाई यांचा निरोप घेतला तेव्हा ताराबाई म्हणाल्या, पुन्हा भेटायला ये,पण काही आणू नको. मला म्हातारीला काय लागते? पण भेटायला मात्र ये. हो, अगदी नक्की परत येईन, असे सांगून प्रमिला यांनी ताराबाईंचा निरोप घेतला आणि त्या पुढच्या घराकडे निघाल्या.
शेखर जोशी
१४ एप्रिल २०२४
प्रमोद करंदीकर
शबरी सेवा समिती
संपर्क
+91 99205 16405