सोमवार, ८ एप्रिल, २०२४

भाऊ तोरसेकर यांचे भाकित, मोदीच पुन्हा दिल्लीत


भाऊ तोरसेकर यांचे भाकित, मोदीच पुन्हा दिल्लीत 

शेखर जोशी 

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. ज्येष्ठ पत्रकार आणि युट्युबर भाऊ तोरसेकर यांनी त्यावेळी मोदी पंतप्रधान होतील, असे भाकित वर्तवले होते.‌ आणि मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही तोरसेकर यांनी पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होतील, असे भाकित वर्तविले होते आणि ते दुसऱ्यांदा खरे ठरले. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील, असे भाकित तोरसेकर यांनी व्यक्त केले आहे. आधीची दोन भाकिते खरी ठरल्याने आता तिसऱ्यांदा वर्तवलेले भाकित खरे ठरणारच, असा ठाम विश्वास तोरसेकर यांना आहे. 

https://youtu.be/ezBhVw7HYRs?feature=shared

उपलब्ध आकडेवारी, राजकीय विश्लेषण, पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव याच्या बळावर तोरसेकर यांनी केलेले भाकित खरे ठरले.  तोरसेकर यांनी २०१४ मध्ये 'मोदीच का' तर २०१९ मध्ये 'पुन्हा मोदीच का?' या दोन पुस्तकांच्या माध्यमातून आपले हे विश्लेषण/भाकित मांडले होते. आत्ताही तोरसेकर यांनी 'फक्त मोदीच' या पुस्तकाच्या माध्यमातून पुन्हा मोदीच का? याचे सखोल विवेचन केले आहे. विशेष बाब म्हणजे ही तीनही पुस्तके मोरया प्रकाशन यांनी प्रकाशित केली आहेत.‌


'फक्त मोदीच' या पुस्तकाच्या मनोगतात तोरसेकर म्हणतात, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या दहा वर्षातील माझे हे तिसरे पुस्तक आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय मतदारांनी मी वर्तवलेले भाकित खरे ठरविले आहे.  आता 'फक्त मोदीच' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाचा अचूक आकडा सांगण्याबरोबरच असे आकडे कुठून येतात आणि कशामुळे येतात ते समजवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे निवडणुका जिंकण्यासाठी काम करावे लागते निवडणुकीतून जनतेकडून सत्तेचे वरदान मिळवताना सत्ता मिळाल्यास जनतेला अधिकाधिक सुखी कसे करता येईल असा विचार राजकीय पक्षांनी करणे अपेक्षित असते यातून जनमानस कसे बदलत जाते याचा अभ्यास हा या पुस्तकाचा हेतू आहे. 



https://youtu.be/ezBhVw7HYRs?feature=shared

'फक्त मोदीच' या पुस्तकात १९ प्रकरणे आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी बहुमताने पुन्हा जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मुद्दा किती जागांनी, किती फरकाने व किती टक्के मते मिळवून नरेंद्र मोदी पुन्हा १८ वी लोकसभा जिंकणार इतकाच आहे. आणि त्या जागा किती, कशा आणि कुठून मोदींच्या पदरात पडणार याचे विवेचन आणि भाकित या पुस्तकातील एकेका प्रकरणात भाऊ तोरसेकर यांनी केले आहे. निवडणुकांचे प्रकार, निवडणूक जिंकण्याचा निकष, उमेदवाराचे विभिन्न प्रकार, मतांच्या बेरजा आणि वजाबाक्या, सबळ दुर्बळ राजकीय पक्ष, मतसंख्या, टक्केवारी आणि ध्रुवीकरण, प्रगल्भ मतदाराने आणलेले मोदीयुग, नेहरु- इंदिरा युगाचा अस्त, भाजप नावाची राजकीय पहाट, मोदी युगाचा आरंभ, सत्ताकारणाचे बदलते आशय, निवडणुकांची बदलती समीकरणे, १८ व्या लोकसभेचे गणित आणि मोदी दिग्विजय हाच विरोधकांचाही अजेंडा अशी ही विविध प्रकरणे आहेत. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला तोरसेकर यांनी आयन रॅण्ड, अल्बर्ट आईन्स्टाईन, हेनरिख हायने, विस्टन चर्चिल, वॉल्ट डिस्ने, मार्क ट्वेन, प्लेटो, ॲंड्रू जॅक्सन, ॲरिस्टॉटल, जॉर्ज बर्नार्ड शॉ, थॉमस जेफरसन इत्यादी विचारवंत, बुद्धीवतांचे एखादे वाक्य/ वचन/ विचार दिला आहे. 

https://youtu.be/ezBhVw7HYRs?feature=shared

२०१४ मध्ये लोकसभा शर्यतीत मोदी उतरले, त्याच्या दोन वर्षे आधी त्यांनी एक रणनीती आखली होती आणि ती साधीसरळ होती. एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही तरी मोदींनी बहुमताचे सरकार बनवले त्यासाठी त्यांनी १७ ते १८ टक्के मुस्लिम मतपेढीला निकामी करण्याची हिंदू मतपेढी बनवली होती. मौलवीने देऊ केलेली टोपी नाकारून मोदी हिंदू मनाचे ताईत झाले. मग पाच वर्षे सत्ता राबवताना मोदींनी लाभार्थी नावाची नवी मतपेढी त्याला जोडली.  त्यातून लोकसभेत आपले संख्याबळ वाढवले आणि आता तिसऱ्या लढतीत १८ व्या लोकसभा निवडणुकीत उतरताना मोदींनी नवी तिसरी मतपेढी जोडून घेतली आहे ती नवी मतपेढी 'महिला लाभार्थी' अशी आहे या तीन नव्या मतपेढ्या आणि त्यांच्या मतांचे गठ्ठे राजकारणाला निर्णायक वळण देऊ शकतात याचा २०१४ पूर्वी कोणी विचारच केला नव्हता.  यापूर्वीच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्याची ओळखही कोणाला नव्हती.  निकाल लागले तेव्हा त्याचे विश्लेषण करताना या गोष्टी समोर आल्या. मोदी यांच्या या तीन नव्या मत पेढ्याने जुन्या जातीपाती धर्माच्या मतपेढ्यांना शृंग लावलेला आहे एका बाजूला भाजपासाठी मोदींनी नव्या मतांचे गठ्ठे तयार केले आणि त्यातून जुन्या जातीपातीच्या मतपेढ्यांना निकालात काढले. मग सगळी जुनी गणिते विस्कटली असून नवीन गणिते आकाराला येत आहेत, असे भाऊ तोरसेकर यांचे म्हणणे आहे. 

१९९१ च्या निवडणुकीतील अर्ध्याहून अधिक मतदान पूर्ण झालेले असताना एका प्रचार सभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची घातपाती हत्या झाली आणि त्याचा नंतरच्या मतदानावर खूप प्रभाव पडला.  पूर्वार्धात मागे पडलेल्या काँग्रेस पक्षाला नंतरच्या मतदानात कमी जागांमध्ये अफाट यश मिळवून तो लोकसभेतील सर्वात मोठे पक्ष बनला. अशा अनपेक्षित घटना ऐनवेळी निवडणुकांना प्रभावित करू शकतात, पण प्रत्यक्ष मतदानापूर्वी चार महिने आधी असलेल्या परिस्थितीच्या आधारे आपण केलेले हे राजकीय आकलन /अंदाज आहे. आणि तशीच परिस्थिती राहिली तर माझ्या अपेक्षेनुसार भाजप ३२५ ते ३५९ जागांचा पल्ला नक्की गाठणार आहे, असा भाऊ तोरसेकर यांचा दावा आहे.

https://youtu.be/ezBhVw7HYRs?feature=shared



फक्त भाजपच नव्हे तर इतर राजकीय पक्ष, राजकीय नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य मतदार, राजकीय अभ्यासक, विश्लेषक, पत्रकार, विद्यार्थी, प्राध्यापक अशा सर्वांसाठी 'फक्त मोदीच' हे पुस्तक अभ्यास आणि गृहपाठ म्हणून उपयुक्त आहे. १६६ पृष्ठांच्या या पुस्तकाचे मूल्य २०० रुपये आहे. 

- शेखर जोशी 

८ एप्रिल २०२४

पुस्तकासाठी संपर्क- मोरया प्रकाशन 

ई-मेल info@morayaprakashan.com

संकेतस्थळ www.morayaprakashan.com

दूरध्वनी ७०२१९१३६४५/८६००१६६२९७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: