योग ही प्राचीन भारतीय पद्धती असून प्रत्येक माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योग आवश्यक आहे, असे कैवल्यधाम या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुबोध तिवारी यांनी सांगितले.
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात या तीन गोष्टींना महत्व असून योगाच्या माध्यमातून या तीनही गोष्टींचा समन्वय राखला जातो. सध्याच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकालाच योगाची गरज आहे. योगातील योगासने, प्राणायाम, कपालभाती, भस्त्रिका, व अन्य कृतींमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारे टिकून राहाते. योगाच्या जोडीला आपल्याकडे सुयोग्य आहाराची जोड दिलेली आहे. आहार हा सात्विक व मर्यादित असावा. यासाठी काही नियम केले आहेत. धावपळीचे जीवन, जीवघेणी स्पर्धा, ताण व तणाव, जेवण आणि खाण्याच्या बदललेल्या वेळा व सवयी, पोट भरण्यासाठी खाल्ले जाणारे फास्ट फूड, मसालेदार, तळलेले पदार्थ याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावरही होत असतो. यातून शारीरिक व्याधी जडतात. या सगळ्यावर आपल्या ऋषीमुनींनी योगाच्या माध्यमातून उपाय दिला आहे. कितीही धावपळ असली तरी प्रत्येकाने किमान अर्धा तास योग करण्यासाठी द्यावा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करु नका. मर्यादा पाळा आणि योगाला आपली जीवनशैली बनवा, असेही तिवारी यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कशी झाली याविषयी माहिती देताना तिवारी म्हणाले, नऊ वर्षांपूर्वी पोर्तुगाल येथे २१ जून या दिवशी योग दिन साजरा करणयात आला होता. योगाचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व योगाच्या प्रसारासााठी एक दिवस निश्चित करुन तो दिवस आंतरराष्टीय पातळीवर साजरा केला जावा, यासाठी काही योग संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरु केले होते. संंयुक्त राष्ट्रसंघाकडे एक निवेदनही देण्यात आले होते. २७ सप्टेंबर २०१४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांसमोर भाषण करताना योगाची प्राचीन भारतीय परंपरा, योगाचे महत्व सांगितले होते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याची सूचना केली होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधी सभेत या विषयावर मतदान घेण्यात आले. नव्वद टक्क्यांहून अधिक मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
भारतीय सस्कृतीत योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. पतंजली ऋषींनी १९५ योगसुत्रे लिहिली असून योगाची व्याख्याही केली आहे. त्यामुळे पतंजली ऋषींना योगाचे मुख्य प्रवर्तक किंवा संस्थापक म्हणता येईल. पुढे महर्षी घेरंंड, वासिष्ठ यांनीही त्यात आपले योगदान दिले. योगविषयक प्राचीन संस्कृत ग्रंथही आपल्याकडे आहेत. अर्थात योग म्हणजे केवळ आणि केवळ आसने नाहीत. पतंजली ऋषींनी सांगितलेल्या योग सुत्रात फक्त तीन सुत्रे आसनांबाबत आहेत. नाथ संप्रदायाने योगासनांना विशेष महत्व दिले. आजही सर्वसामान्य लोकांमध्ये योग म्हटले की फक्त योगासने असा एक गैरसमज आहे.स्वामी कैवल्यानंद यांनी १९१७ मध्ये अमळनेर येथे कैवल्यधामची स्थापना केली. त्यानंतर १९२४ मध्ये लोणावळा येथे कैवल्यधाम सुरु झाले. योग आणि विज्ञान यांची सांगड स्वामी कैवल्यानंद यांनी घातली. १९२६ मध्ये त्यानी योग मिमांसा हे माासिक सुरु केले. संस्थेतर्फे योगविषयक २०० संशोधन प्रबंध आत्तापर्यंत सादर झाले आहेत. योग हा वैद्यकशास्त्रालाही कसा पुरक आहे ते पटवून देण्याची सुरुवात स्वामी कैवल्यानंद यांनी केल्याचेही तिवारी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात विविध संस्थांककडूनन योग प्रसाराचे, योग शिक्षक तयार करण्याचे काम सुरु आहे. या संस्थांमधून दरवर्षी २०० ते ३०० योग शिक्षक तयार होत आहेत. या सर्व योगशिक्षण संस्थांचा आत्तापर्यंत अभ्यासक्रम वेगवेगळा होता. आता केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार सर्वांचा समान अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. योग परीक्षांमध्येही समानता आणण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयातर्फे योग विषयात सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. योग या विषयात भविष्यात खूप चांगली संधी आहे. देशभरातील सीबीएसईच्या २७ हजार शाळांमधून आता योगशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येत योग शिक्षकांची गरज लागणार आहे. योगतज्ज्ञ आणि योग शिक्षकांना परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शळा, महाविद्यालये, कॉपोरेट क्षेत्र, रिसार्ट, स्पा येथेही योग शिक्षक लागतात. करिअर म्हणून यात चांगली संधी असल्याचेही तिवारी म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा