गुरुवार, २ मार्च, २०१७

दफन नको दहनच हवे


दफन नको दहनच हवे

खासदार साक्षी महाराज हे त्यांच्या वक्तव्याबाबत नेहमीच प्रसारमाध्यमातून चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद-विवाद व चर्चा घडत असते. भारतात कोणाचाही अंत्यसंस्कार दहन पद्धतीनेच केला जावा. हिंदू धर्मात ज्यांनी संन्यास घेतला आहे अशा साधूंचे दहन केले जात नाही तर त्यांची समाधी बांधली जाते. मात्र साक्षी महाराज यांनी मुसलमानांसह साधूंचेही दहन करावे, असे प्रतिपादन केले आहे. या देशात सुमारे वीस कोटी मुसलमान आहेत. सर्वांसाठी कबर/ दफनभूमी बनवायची म्हटली तर जागा कशी पुरणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. खरे तर साक्षी महाराज यांनी अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाला वाचा फोडली आहे.

हेच विधान साक्षी महाराज यांच्याऐवजी एखाद्या पुरोगामी किंवा समाजवादी, धर्मनिरपेक्ष व्यक्तीने केले असते तर कदाचित त्यावर वाद झालाही नसता. मृत व्यक्तीचे दफन न करता दहन करण्याची हिंदू धर्मात पद्धत आहे. (अर्थात हिंदू धर्मातील काही पंथांमध्ये दहनाऐवजी दफनाचीही पद्धत आहे) मृत व्यक्तीचे दहन करणे ही चांगली व योग्य पद्धत असल्याचे आता समोर येत आहे. पारशी समाजातील काही मृत व्यक्तींचेही दहन केले गेले असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातूनच पुढे आल्या होत्या. त्यामुळे भारतातील हिंदूंसह इतर अन्य धर्मियांनीही दफनाऐवजी दहन करायला सुरुवात करावी, हे साक्षी महाराज यांनी केलेले विधान योग्यच आहे. काळानुरुप त्यात बदल करणे मात्र अत्यंत गरजेचे आहे. ते म्हणजे दहनासाठी लाकडांचा वापर अजिबात करु नये. ती मानसिकता आपण सर्वानीच बदलण्याची गरज आहे. लाकडाऐवजी मृत व्यक्तीचे दहन हे विद्युत दाहिनीत किंवा डिझेल, गॅस शव दाहिनीतच केले जावे. आज बहतेक स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी, डिझेल/गॅस शवदाहिनी बसविण्यात आल्या आहेत. काही जणांकडून त्याचा वापरही केला जात आहे. मात्र ज्या प्रमाणात लाकडांऐवजी याचा वापर झाला पाहिजे तेवढा तो होत नाही, असे दिसते.

हिंदू धर्मात जे सोळा संस्कार सांगितले आहे (यात जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या विविध विधिंचा समावेश आहे) त्यात शेवटचा संस्कार हा अंत्येष्टी संस्कार आहे. हिंदू धर्मातील काही पंथीयांमध्येही दहनाऐवजी दफन केले जाते. अंत्येष्टी संस्कारानुसार मृत व्यक्तीचे लाकडाच्या चितेवर दहन करावयास सांगितले आहे. हिंदू धर्मातील सती रुढी आणि अन्य अनिष्ट प्रथा/परंपरा आपण बंद केल्या. तसेच बदलत्या काळानुसार यातही बदल होणे खरोखरच गरजेचे आहे. विद्युत दाहिनी किंवा गॅस/डिझेल शवदाहिनीत दहन करताना जे काही धार्मिक/अंत्यविधिचे संस्कार करता येतात.त्यामुळे चितेवरच दहन केले पाहिजे हा अट्टहास आता सोडला पाहिजे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही विचार केला तर चितेवर दहन करण्याएेवजी विद्युत दाहिनी किंवा डिझेल/गॅस शवदाहिनीतच अंत्यसंस्कार करणे ही काळाची गरज आहे. सुजाण व सुशिक्षित लोकांकडून त्याचा अधिक मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे.

पारसी समाजातील अनेकांना आता, आपल्या मृत्यूनंतर पारसी धर्मपद्धतीप्रमाणे आपला अंत्यविधी होऊ नये, असे वाटते. हे वाटणाऱ्यांची संख्या मुंबईत अधिक आहे, याला अर्थातच महत्त्व आहे कारण मुळात अगदीच अल्पसंख्य असले तरी पारसी लोकांची या महानगरातील संख्या केवळ राज्यातील अन्य शहरांच्या नव्हे तर देशातील पारसी लोकसंख्येच्या मानाने लक्षणीय आहे. धार्मिक रीतीनुसार ‘डूंगरवाडी’मध्ये, म्हणजे टेकडीवरील विहीरवजा बांधीव जागेत पारसी मृतदेह ठेवले जातात आणि इराणी संस्कृतीत मातास्वरूप असलेली गिधाडे तसेच सूर्य यांमुळे त्या कलेवरांची विल्हेवाट पुढील काही काळात लागत राहते. पण प्रश्न आहे गिधाडांच्या घटत्या संख्येचा आणि झपाटय़ाने वाढणाऱ्या शहरांत अशी विल्हेवाट लागणे शक्य होईल काय, याचाही. यातून व्यवहार्य आणि मनाला पटणारा मार्ग म्हणून ‘माझ्या मृत्यूनंतर माझे दहनच करा’ असे इच्छापत्र अनेक पारसी जाणत्यांनी करून ठेवले. हे एक प्रकारे, पारसी धर्मापुढले मोठे आव्हानच होते. माझे दहनच करा, अशी इच्छा ज्यांनी लिहून ठेवल्यामुळे पूर्ण करावी लागली, अशांमध्ये ३० वर्षांपूर्वी दिवंगत झालेले दाराब टाटा (जेआरडींचे बंधू) जसे होते, तसेच मुंबईच्या कलादालन विश्वाची पायाभरणी करणारे केकू गांधीदेखील होते. अशा दहन-इच्छापत्रांची संख्या वाढत असतानाच गिधाडे कमी होतच होती. मग काही पारसी धर्मगुरूंनीच मुंबई महापालिकेकडून विद्युतदाहिनी आणि तिला जोडून पारसी प्रार्थनालय अशा सुविधेची अनुमती मिळवली.भारतभरात अवघ्या ६९ हजारांच्या आसपास असलेल्या पारसी समाजातून एकटय़ा मुंबईतल्या विद्युतदाहिनीत २०१६ या वर्षात आठ महिन्यांत सुमारे ८० दहनविधी झाले. धर्मसंस्कार बुडाला तरी चालेल, सुधारणा हवीच अशी धमक पारसी समाजाने दाखविली तशी ती हिंदू धर्मियांसह अन्य धर्मियानीही दाखविण्याची आवश्यकता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: