व्होडाफोनचा मराठी द्वेष
डोंबिवली पश्चिमेच्या व्होडाफोन गॅलरीत मराठी आकड्यातील टोकननंबर घेत नाहीत. फक्त इंग्रजीतलेच घेतात. त्यावरुन ग्राहक आणि तेथील कर्मचारी यांच्यात वाद झाला.
मराठीतील टोकन नंबर दिले आणि ते न स्वीकारल्यावरुन सोमवारी सकाळी एका ग्राहकाचा व तेथील कर्मचारयाचा वाद झाला. तो ग्राहक तेथील महिला कर्मचाऱयाला म्हणाला, हा टोकन नंबर तुमच्याच सुरक्षा रक्षकाने मला दिला आहे.मराठीत लिहिलेला (मराठी आकडे) टोकन नंबर तुम्ही घेत नसाल तर बाहेर तसा फलक लावा.

त्यावर तेथील महिला कर्मचारयाने त्या ग्राहकाला, आमच्याकडे मराठीतले नाही तर इंग्रजीतलेच टोकन नंबर स्विकारले जाते. तुम्ही पुन्हा नवीन इंग्रजीत लिहिलेले टोकन घ्या. तुम्ही म्हणता तसा बाहेर फलक लावणे आम्हाला करता येणार नाही. तुमची जी तक्रार असेल ती आमच्या मुख्य कार्यालयाकडे करा असे उत्तर दिले.
हा वाद ऐकून तो सुरक्षा रक्षक त्या ग्राहकाकडे आला व मी तुम्हाला इंग्रजीत दुसरे टोकन देतो असे सांगितले. त्या ग्राहकाने विचारणा केली की आता हे नवीन टोकन नंबर घेऊन मी पुन्हा माझा नंबर येईपर्यंत वाट पाहायची का? त्यावर व्होडाफोनच्या त्या महिला कर्मचाऱयाने शांतपणे हो असे उत्तर दिले.
यातून काही प्रश्न समोर येतात.
मुळात टोकननंबरवरील मराठीतील आकडा त्या ग्राहकाने लिहिलेला नव्हता. तो व्होडाफोन गॅलरीतील सुरक्षा रक्षकानेच लिहून दिलेला होता. मग त्या सुरक्षा रक्षकाने तो आकडा इंग्रजीतच लिहायचा, म्हणजे मग काहीच प्रश्न आला नसता. किंवा व्होडाफोन गॅलरीतील कर्मचाऱयांनी त्यांच्याकडे नोंद करताना ती इंग्रजीत करायची, व्होडाफोन गॅलरीत असलेल्या संगणकावर मराठी आकडे स्वीकारले जात नसतील तर त्यांनी त्यांच्या संगणकावर तसा बदल तातडीने करुन घेण्याची आवश्यकता आहे. टोकननंबर देण्याचे जे यंत्र असेल त्यावरही मराठी आकडे नसतील तर ते टाकून घेण्याची व्यवस्था तातडीने झाली पाहिजे.

टोकन नंबरवरील आकडा इंग्रजीतूनच असला पाहिजे हा अट्टहास का? मुळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात, मुंबईत ते ही महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीतील टोकन नंबर का स्वीकारले जात नाह? हे धोरण फक्त व्होडाफोनच्या डोंबिवलीतील गॅलरीत आहे? की व्होडाफोनच्या सगळ्या ठिकाणी असणाऱया गॅलरीत असेच चालते. केंद्र शासनाच्या त्रिभाषा सुत्रानुसार मराठी, हिंदी आणि इंग्रजी असाच कामकाजाचा/ व्यवहाराचा क्रम असला पाहिजे. व्होडाफोनने त्या सुत्रालाच हरताळ फासला आहे. मध्यंतरी एका बॅंकेच्या एटीएम केंद्रावरही गुजराथी भाषेतील पर्याय असल्याचे तसेच वीजदेयक की मोबाईलचे देयकही गुजराथी भाषेत पाठवले गेल्याचे समोर आले होते.
व्होडाफोनचा हा मराठी द्वेष संतापजनक आहे. मराठीच्या नावाने टाहो फोडणाऱया राजकीय पक्षानी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी (आमदार व खासदार) या प्रश्नाकडे तातडीने लक्ष ध्यावे. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठीतील टोकन नंबर नाकारले जाण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी.
-शेखर जोशी
२ टिप्पण्या:
मराठी आकडे ईंग्लीश आकडे ही काय भानगड आहे?? ना मराठी लिपी आहे, ना ईंग्लीश.., मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहीतात हेच आपल्याला कळत नाही तिथे व्होडाफोन ला दोष देउन काय ऊपयोग???
मराठी आणि हिंदी ही देवनागरी लिपी आहे. त्यात न कळण्यासारखे काय आहे. सर्व बॅंकांमध्येही मराठीत लिहिलेले धनादेश (चेक) घेतात.नव्हे ते घेेणे बंधनकारक आहे. मग आकडे देवनागरीत (मराठी) लिहिलेले असले तर काय बिघडले? हा निव्वळ मराठी द्वेषच आहे.
टिप्पणी पोस्ट करा