बुधवार, १५ मार्च, २०१७

'साडेतीन टक्के' वाल्यांनीही महाराष्ट्र घडविला...


'साडेतीन टक्के' वाल्यांनीही महाराष्ट्र घडविला...

महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते विशेषत; कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मंडळी नेहमी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असा उल्लेख जमेल तिथे करत असतात. तसेच ब्राह्मणांचा उल्लेखही जाणीवपूर्वक 'साडेतीन टक्केवाले' असा कुचेष्टेने केला जातो. जाहीर सभा, संमेलने आणि कार्यक्रमातून तसेच खासगीतही ब्राह्मणांना शिव्या दिल्या जातात. जणू काही आजचा पुरोगामी महाराष्ट्र 'त्या' तीन जणांमुळेच घडला आहे, असेच भासविले आणि ठसविले जाते.महाराष्ट्र घडण्यात त्या तिघांचे योगदान आहेच ते कोणीही नाकारत नाही. पण महाराष्ट्र घडविण्यात बाकीच्यांचेही विशेषत 'साडेतीन टक्केवाल्यां'चे म्हणजेच ब्राह्मणांचेही महत्वाचे योगदान आहे, हे मात्र ही मंडळी सोयीस्कर विसरतात किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. सर्वच बाबतीत अग्रेसर असलेल्या आणि महाराष्ट्र घडविण्यात ज्या ब्राह्मण मंडळींंचेही मोठे योगदान आहे, त्यांची नावे कधीही जाहीरपणे घेतली जात नाहीत. महाराष्ट्राच्या अलिकडच्या काही वर्षातील इतिहासावर सहज नजर टाकली तरी साडेतीन टक्केवाल्यांनी केलेले सामाजिक कार्य, सामाजिक सुधारणा या ठळकपणे जाणवतील अशा आहेत. पण या तथाकथित बेगडी, पुरोगामी आणि केवळ ब्राह्मण द्वेष हाच ज्यांचा एककलमी कार्यक्रम आहे त्यांनी या इतिहासाकडे डोळेझाक केली आहे. महाराष्ट्रात या साडेतीन टक्केवाल्यांनी जे काही काम करून ठेवले आहे, त्याची सर खरेतर कोणालाच नाही. हे ब्राह्मणेतरांना कितीही कटू वाटले तरी सत्य आहे.


‘सामाजिकपरिषद’, ‘डेक्कन सभा’ अशा संस्थांची स्थापना करून जातिभेद, वंशभेद, अंधश्रद्धेला विरोध करण्याचे महत्काचे काम केले. स्त्री-शिक्षण आणि विधवा विवाह,बुद्धीनिष्ठा यांचाही सातत्याने पुरस्कार केला ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या साडेतीन टक्क्यातीलच होते.‘सुधारक’ या नावाचे नियतकालिक काढून त्याद्वारे जातिभेद, बालविवाह, केशवपन, सतीची चाल, अस्पृष्यता या अनिष्ट रुढी व परंपरांना प्रखर विरोध करणारे गोपाळ गणेश आगरकर हे ही साडेतीन टक्केवालेच. विधवा विवाह आणि स्त्रीयांचे शिक्षण याविषयी समाजाचा विरोध पत्करून प्रसंगी अवहेलना सहन करुन ज्यांनी या क्षेत्रात खूप मोठे काम केले, स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी घातला ते आणि आजच्या नाथीबाई दामोदार ठाकरसी महिला विद्यापीठाचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे हे ही ब्राह्मणच होते. ज्या काळात संतती नियमन, त्यासाठी वापरायची साधने याविषयी बोलणेही अवघड होते, अशा काळात ज्यांनी संतती नियमन, लैंगिक शिक्षण याचा पुरस्कार केला, त्यासाठी समाजस्वास्थ्य हे मासिक चालविले ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे हे ही ब्राह्मणच होते.


हिंदू धर्मातील अनिष्ट रुढी व परंपरा यावर घणाघात करणारे, अस्पश्यता निवारणाचे काम करणारे आणि दलित, अस्पश्य व इतर जाती-धर्मीयांसाठी रत्नागिरी येथे पतीतपावन मंदिराची स्थापना करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, सामाजिक समरसता आणि विविध धर्माच्या ऐक्याचा पुरस्कार करणारे, पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात अस्पश्यांनाही प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषण करणारे पांडुरंग सदाशिव साने हे ही ब्राह्मणच होते.कोळी व आगरी समाजातील अनिष्ट प्रथा, व्यसनाधिनता दूर करून त्यांच्यात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणारे स्वाध्याय परिवाराचे पांंडुरंगशास्त्री आठवले, १९३४ मध्ये आपल्या निर्भीड साप्ताहिस्कापश्च्याय माध्यमातून सामाजिक समरसतेचा पुरस्कार करणारे, स्पृश्य-अस्पृश्यता, केशवपन या अनिष्ट प्रथांच्या विरोधात जनजागृती करणारे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दलित व सवर्ण यांच्यातील दरी मिटविण्यासाठी झुणका भाकर चळवळ व यातून समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचे एकत्र भोजन सुरु करणारे समतानंद अनंत हरी गद्रे तसेच काही शतके मागे गेलो तर संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी हे ही या साडेतीन टक्क्यातीलच आहेत. या सगळ्यांचेच योगदान नाकारणार आहात का?

भारतीय असंतोषाचे जनक व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक हे तेल्या-तांबोळ्यांंचे पुढारी म्हणूनही ओळखले जात. लोकमान्य टिळकही साडेतीन टक्क्यातीलच होते.

अनेकदा ब्राह्मण मंडळींनी ब्राह्मणेतर लोकांवर अन्याय केला, असा डांगोराही पिटला जातो. काही अंशी ते सत्य असे मानले तर त्यांच्याच पुढच्या पिढ्यांनी ब्राह्मणेतरांना वर येण्यासाठी आणि प्रसंगी स्वजातीयांचा तीव्र विरोध पत्करुन मोलाची मदत केली हे ही सोयीस्कर विसरले जाते. ब्राह्मणांकडून त्यांच्या पूर्वजानी ब्राह्मणेतरांवर केलेल्या तथाकथीत अन्यायाचे ते एक प्रकारे परिमार्जनच आहे. याचे दाखलेही सर्वांना तोंडपाठ आहेत. अनेक ब्राह्मणेतरानी आपल्या कामात ब्राह्मणांनी वेळोवेळी केलेल्या या मदतीचा व सहकार्याचा उल्लेख लेखनातून केला आहे. पण आज इतिहास बदलण्याच्या हट्टामुळे किंवा ब्राह्मण द्वेषामुळे ते नाकारले जात आहे.

सामाजिक सुधारणा किंवा अन्य क्षेत्रात ब्राह्मण मंडळींनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची ही केवळ काही सहज आठवली अशी वानगीदाखल उदाहरणे. साडेतीन टक्क्यातील या सगळ्या मंडळींनी साहित्य,कला, नाट्य, गायन, राजकारणासह सामाजिक कार्य, समाजसुधारणा आणि समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. महाराष्ट्र घडविण्यात या सर्व मंडळींचे महत्वाचे योगदान आहे. केवळ ब्राह्मण द्वेषातून ही मंंडळी हे नाकारत असतील किंवा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून केवळ त्या तिघांचाच डंका वाजवित असतील तर महाराष्ट्र आणि या साडेतीन टक्के असलेल्या मंडळींच्या कार्याचा, कर्तृत्वाचा तो घोर अपमान ठरेल. पण त्यामुळे या ब्राह्मण मंडळींचे महत्व व कर्तृत्व कमी होत नाही तर यातून या मंडळींचे योगदान नाकारणारे मात्र अधिक खुजे ठरतात.


-शेखर जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: