सोमवार, १३ मार्च, २०१७

मोडक्या घरात राहा पन मुलाले शिक्षन दिल्याविने सोडू नका-गाडगे बाबा


कला वक्तृत्वाची-११

समाजसुधारक गाडगे बाबा

मोडक्या घरात राहा पन मुलाले शिक्षन दिल्याविने सोडू नका

गाडगे बाबा यांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. श्रोत्यांशी संवाद साधत, प्रश्न विचारत आणि त्यांच्याकडून उत्तर मिळवून घेत त्यांचे कीर्तन पुढे जात असे. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा यावर त्यांनी कोरडे ओढले आणि समाजजागृती केली. त्यांनी वेळोवेळी केलेल्या काही कीर्तनांतील निवडक भाग..

हे लोक का गरिबीत राहिले?

एक तर पहिले नाही विद्या

काय नाही?

विद्या.

ज्याले विद्या नसेल त्याले खटाऱ्याचा बैल म्हनलं तरी चालल. आता तरी मुलाले शिक्षन द्या. पैसे नाही म्हनाल तर जेवनाचं ताट मोडा. हातावर भाकरी खा. बायाकोले लुगडं कमी भावाचं घ्या. इव्हायाला पाहुनचार करु नका. पन मुलाले साळतं घ्यातल्याविने सोडू नका. विद्या मोठं धन आहे. यातलेच मानसं दिल्लीच्या तक्तावर भाशेन करतात आणि यातलेच मानसं बोरिबंदरच्या ठेसनावर पोतं उचलतात.

ते मानसं अन् हे कोन?

हे काई बैल नाहीत ना?

कोन आहेत..

मानसं

विद्या केवढी मोठी गोष्ट हाये. डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या पिढय़ान पिढीनं झाडू मारायचं काम केलं. यांच्या वडिलाले सुबुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाले साळतं घातलं. आंबेडकर साहेबानं काही लहानसहान कमाई नाही केली. हिंदुस्थानची घटना केली. घटना!

अन तेच साळतं जाते ना, अन शिकते ना तर झाडू मारनचं त्यांच्या कर्मात होतं. तवां विद्या मोठं धन आहे.

सोन्याची नाव वर काढा, आपल्या देशाचं लई भलं होऊन जाईल

काऊन रे

तुमी सत्यनारायण करता ना?

मग सत्यनारायण केल्यावर पोथिमदी लिवलय ना, बुडालेली नाव वर येते. मग आता सत्यनारायण कराव. इंग्लंडची नाव पान्यात बुडाली. तिच्यात लई मोठं सोनं है. अरे, सत्यनारायण करा, ते नाव वर काढा. आपल्या देशाचं लई भलं होऊन जाईल.

काऊन रे, एका सत्यनारायणानं होत नाही काय? मंग दहा दहा सत्यनारायण घाला. धा सत्यनारायणानं होत नसलं तर दहा हजार सत्यनारायण घाला. इथून सत्यनारायण पावत नसल तर मम्हैच्या समुद्राजवळ जा. पैसे मी देतो. तिथं सत्यनारायण करा, पण बुडालेली नाव वर काढा! दहा हजार सत्यनारायण घालून जर ते नाव वर येत नायी तर कायले ती खोट्टारडी पोथी वाचता? कायले तो खोट्टारडा सत्यनारायण करता? आणि वरून त्याले सत्यनारायण म्हणता?

तुझ्या पोराले काप आणि घे देवाला प्रसन्न करुन काय करुन राहायला रे?

न्हाय जी नवस फेडून राहिलो.

म्या म्हनलं माझ पोरगं ठीक झालं की कोंबडं कापीन.

अरे कोंबडं कुनाचं लेकरु हाय,

देवाचचं लेकरु हाय?

आन तुह लेकरु?

माह व्हय ना जी

आन तू कोनाचा रं

मी माझ्या बापाचा न जी

म्हन्जे शेवटी कोनाचा?

देवाचं लेकरु.

मंग तूह लेकरु बी देवाचचं ना

व्हय जी

अरे, तूच म्हनते कोंबडं बी देवाचं, लेकरु आणि तूह बी देवाचं आणि आत्ताच मले सांगत्व्हताय की कोंबडं कापलं की देव प्रसन्न होतो. तूह पोरगं बी देवाचं लेकरु हाय.. मग काप त्याले आणि देवाले प्रसन्न करुन!

तुमचा देव तुमचं गंडांतर काय हाकलनार रे!

काउन रे तुमी देव मानता का नाय? अरे मी बी देव मानतो. माहा देव माझ्या मनात असते. अरे, तुमच्या देवळातल्या देवाला धोतर असतं का न्हायी? मंग, तुमच्या देवळातले देवाला धोतर कोन नेसवते रे? लोकं म्हणायची आमीच नेसवतो जी. काउन देवाले धोतर नेसता येत नाय काय? त्यावर लोक म्हणायचे, नाय जी नाय नेसता येत. त्यावर गाडगेबाबा म्हणायचे, अरे व्वा रे व्वा तुमचा देव, ज्या तुमच्या देवाले सोताच धोतर नेसता येत नाही तो तुमाला काय नेसवणार रे.. काय रे देवाला निवद दाखवता का नाय? लोक म्हणायचे, हो जी दाखवतो. मंग काय करता? लोक म्हणायचे, हातात काठी घेऊन बसतो. कायले काठी घेऊन बसता? लोक म्हणायचे, नाय मंजे के कुत्रं येतं, मांजर येतं त्याले हाकलाय लागते नव्ह. अरे व्वा रे व्वा तुमचा देव, तुमच्या देवाले सोताच्या निवदावरचं कुत्रं न मांजर हाकलता येत नाय तो तुमचं गंडांतर काय हाकलनार रे? अरं देवळात देव नसते, देव मानसाच्या मनात होयते. देवळात देव राहात न्हाई. देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट हायते!

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१० फेब्रुवारी २०१७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: