अभिनेता विवेक यांच्या आठवणींना उजाळा
मराठी चित्रपट सृष्टीतील देेखणे आणि प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून अभिनेते विवेक यांची ओळख आहे.मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या व्यक्तिमत्वाने आणि सहजसुंदर अभिनयाने त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. मराठीत त्यांनी सुमारे ८० चित्रपटातून काम केले होते. रंगभूमीवरही त्यांनी काही काळ काम केले.'दूधभात', 'देवबाप्पा', 'माझं घर माझी माणसं', 'गृहदेवता', 'धाकटी जाऊ', 'वहिनीच्या बांगड्या', 'पोष्टातली मुलगी' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.विस्मृतीत गेलेल्या या अभिनेत्याचा जीवनपट प्रेक्षकांसमोर उलगडण्यााचा प्रयत्न 'अभिनेता विवेक' या पुस्तकातून करण्यात आला आहे. सांगाती प्रकाशनाने (भारती मोरे-९८६७४१६०१८) हे पुस्तक प्रकाशित केले असून भारती मोरे, प्रभाकर भिडे, रविप्रकाश कुलकर्णी, प्रकाश चांदे यांनी ते संपादित केले आहे. डोबिवलीत झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

खरे तर विवेक यांना चित्रकार/ क्रिकेकपटू व्हायचे होते. पण नियती त्यांना चित्रपटांच्या दुनियेत घेऊन आली. चाळीस वर्षे ते मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत वावरले. प्रसन्न आणि चेहऱयावर कायम हास्य असणारे विवेक आजही जुन्या पिढीतील रसिकांच्या स्मरणात आहेत.विवेक यांचे खरे नाव गणेश अभ्यंकर. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील निर्माते बाळ कुडतरकर यांनी त्यांचे नामकरण 'विवेक'असे केले. 'अभिनेता विवेक'या पुस्तकात त्यांच्याबरोबर काम केलेले काही कलावंत, त्यांचे परिचित अशा मंडळींशी बोलून विवेक यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

गंगाधर महांबरे, विवेक यांच्या मुली रेशम आठवले, रेखा काळे यांनी तसेच ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर,वसंत इंगळे, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, अभिनेत्री चित्रा, उमा व प्रकाश भेंडे, अभिनेत्री जीवनकला, रमेश देव आणि सीमा देव, बाळ कुडतरकर आणि विवेक यांचे काही मित्र यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विवेक यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेल्या आठवणी, विवेक यांचे गाजलेले चित्रपट व त्या विषयीची सविस्तर माहिती, विवेक यांंच्या चित्रपटांची यादी, विवेक यांनी काम केलेल्या चित्रपटातील त्यांची छायाचित्रेही पुस्तकात आहेत.
विस्मृतीत गेलेल्या जुन्या पिढीतील अभिनेत्याविषयी सर्व माहिती एखाद्या पुस्तकात संकलित करण्यााचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. नव्या पिढीतील कलाकारांना तसेच प्रेक्षकानाही या पुस्तकाच्या निमित्ताने अभिनेता विवेक कोण व कसे होते हे कळेल. त्यासाठी अशी पुस्तके महत्वाची आहेत. २३ फेब्रुवारी २०१७ पासून विवेक यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु झाले आहे. त्या निमित्ताने पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा