परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा
'बोलाचा भात आणि बोलाचीच कढी'!
या पूर्वीही रावते कल्याण-डोंबिवलीत अरे होते तेव्हाही त्यांनी मुजोर आणि बेशिस्त रिक्षाचालकांना धडा शिकविण्याच्या घोषणा केल्या होत्या. मात्र त्या हवेतच विरल्या. कल्याण-डोंबिवलीत मीटरसक्ती लागू केली जाईल, ज्या प्रवाशांना मीटरनुसार प्रवास करायचा असेल त्यांना तो करता येईल, जे रिक्षाचालक मीटरनुसार रिक्षा चालविणार नाहीत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, कल्याण येथे मीटर प्रमाणे ज्यांना प्रवास करायचा असेल त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग असेल वगैरे, वगैरे घोषणा, आश्वासने फक्त कागदावर राहिली आहेत.
मुजोर रिक्षाचालकाकडून एस.टी.च्या चालकाला मारहाण झाल्याच्या प्रकरणी रावते कल्याण येथे आले होते. अशा काही घटना घडल्या, बेशिस्त व मुजोर रिक्षाचालकांच्या बाबतीत वृत्तपत्रे व अन्य प्रसारमाध्यमातून बातम्या आल्या की रावते यांच्यासह परिवहन विभाग, आरटीओ, वाहतूक पोलीस या सगळ्यांना जाग येते. रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतेही आम्हाला प्रवाशांचा किती कळवळा आहे याचा देखावा करतात. पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
खरे तर शेअर पद्धत बंद करा, अशी कोणाचीही मागणी नाही. ती सुरुच ठेवण्यात यावी. पण ज्या प्रवाशांना मीटरनुसार प्रवास करायचा असेल त्यांच्यासाठी रिक्षाचालकांनी कोणतेही कारण न देता मीटर टाकावे इतकीच सर्वसामान्य प्रवाशांची माफक अपेक्षा आहे. डोंबिवलीत पूर्वेहून पश्चिमेला किंवा पश्चिमेहून पुर्वेला जायचे असेल तर केवळ उड्डाणपूल पार करावा लागतो, परतीचे भाडे मिळत नाही अशी कारणे सांगून रिक्षाचालक मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा पैसे मागतात. प्रवाशांची ही लूट वर्षानुवर्षे सुरु आहे.

रावते साहेब कल्याण-डोंबिवलीतील मुजोर रिक्षाचालकांना तुम्हाला खरोखरच धडा शिकवायचा असेल तर पहिल्यांदा ते मनावर घ्या. प्रसारमाध्यमातून बातम्या आल्या की केवळ तात्तुरती मलमपट्टी करु नका. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्वपक्षीय रिक्षा संघटनांच्या नेत्यांना व पदाधिकाऱयांना पहिल्यांदा वठणीवर आणा. त्यांनी प्रवासी हिताचीच भूमिका घ्यावी अशी तंबी त्यांना द्या.
कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश रिक्षातळ हे शेअर पदधतीचे आहेत. मध्यंतरी मीटरनुसार रिक्षांची वेगळी रांग करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्याला यश आले नाही. त्यामुळे मीटर पद्धतीची वेगळी रांग न करता रिक्षातळावर (मग प्रवासी एकटा रिक्षात बसला आणि त्याला मीटरनुसार जायचे असले) तरी किंवा रिक्षातळसोडून अन्यत्र कुठेही प्रवाशाने रिक्षा पकडली तरीही प्रवाशाने मीटर टाका सांगितले तर रिक्षाचालकाने कोणतीही खळखळ न करता मीटर डाऊन केले पाहिजे, अशा सूचना सर्व रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱयांना द्या.ा त्यांनी आपापल्या रिक्षासंघटनेत त्याची कशी अंमलबजावणी करायची ते त्यांच्यावर सोपवा. पण हे तातडीने झालेच पाहिजे, अशा सूचना सर्वपक्षीय रिक्षा संघटनेचेने नेते आणि पदाधिकाऱयांना द्या. शिवसेनाप्रणित रिक्षासंघटनेपासून याची सुरुवत करुन अन्य संघटनांसाठी एक नवा आदर्श घालून द्या.
कल्याण-डोंबिवलीतील सर्वच रिक्षा संघटनांचे नेते राजकीय पक्षांचे पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आहेत. त्या सगळ्यांना हजारो प्रवाशांपेक्षा मुठभर रिक्षाचालकांचे हित जपण्यात जास्त धन्यता वाटते. डोंबिवलीत पश्चिमेला पं. दिनदयाळ चौकात, पश्चिमेलाच रेल्वेस्थानक फलाट क्रमांक एकच्या बाहेर (कल्याण दिशेकडे आणि विष्णू नगर पोलीस ठाण्यासमोर) बेशिस्त व मुजोर रिक्षाचालक रस्ता अडवून वाटेल तशा रिक्षा उभ्या करतात. ना रिक्षा संघटनांचे पदाधिकारी किंवा नेते, ना वाहतूक पोलीस ना आरटीओ कोणीही त्यांना वठणीवर आणू शकलेले नाही. इथे केवळ रिक्षाचालक दोषी नाहीत तर रिक्षात बसणारे प्रवासीही तेवढेच दोषी आहेत.
अन्य काही सूचना
-डोंबिवली पश्चिमेला रेल्वेस्थानकाबाहेर रस्ता अडविणाऱया रिक्षाचालकांच्या विरोधात सातत्याने काही दिवस मोहिम राबवा.
-डोंबिवली पश्चिमेला सारस्वत बॅंकेसमोरील फलाट क्रमांक एकच्या बाहेर कडोंमपा परिवहन सेवेचा केलेला बस थांबा कल्याणच्या दिशेकडे (फलाट क्रमांक एक) सरकवा. म्हणजे रस्ता अडविणाऱया बेशिस्त रिक्षाचालकांना लगाम बसेल.
-डोंबिवली पश्चिमेला रेल्वेस्थानक ते कोपर रस्ता, रेल्वेस्थानक ते पं. दिनदयाळ रस्तामार्गे रेतीबंदर, रेल्वेस्थानक ते गरिबाचा वाडा, नवापाडा, गणेशनगर आदी मार्गावर तातडीने कडोंमपाची परिवहन बससेवा सुरु करा.
-महिन्यातून किमान एकदा तरी कल्याण-डोंबिवलीत भेट द्या आणि प्रवासी सघटना, वाहतूक पोलीस, आरटओ यांची एकत्रित बैठक घ्या.
-सर्व रिक्षातळांवर शेअर पद्धतीचे भाडे कुठून किती त्याचे तसेच रिक्षातळावरील रांगेतील रिक्षात प्रवासी बसल्यानंतर प्रवाशाने मीटरनुसार जाण्यास सांगितले तर रिक्षाचालकाने गेले पाहिजे, असे फलक तातडीने लावण्याच्या सूचना वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱयांना द्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा