अशी मी अशी मी
आत्मचरित्र हा साहित्यप्रकार मराठीत आता चांगल्यापैकी रुळला आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर मागे वळून पाहताना जीवनाचा वीणलेला आणि उलगडलेला गोफ या आत्मकथनातून मांडण्याचा प्रयत्न केला जातो. विविध क्षेत्रातील 'सेलिब्रेटीं'च्या जीवनाबद्दल सर्वसामान्यांना एक कुतूहल असते. त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रातून ते त्यांचे चाहते व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते. अर्थात या आत्मकथनात जीवनात घडलेल्या सर्वच गोष्टी सांगितल्या जात नाही, काही हातचे ऱाखून ठेवले जाते.काही आत्मचरित्रातून मात्र वास्तव मांंडले जाते आणि ते वादग्रस्तही ठरते.
सर्वसामान्यांच्या आयुष्यातही संघर्षाचे असे अनेक प्रसंग येतात. त्याला तोंड देत आयुष्याला सामोरे जातांना त्यांचा हा जीवनप्रवास अन्य लोकांसाठी मागर्दर्शक ठरू शकतो. त्या व्यक्ती सेलेब्रेटी नसल्यामुळे त्यांच्याबाबत त्यांचे नातेवाईक, परिचित, मित्रपरिवार सोडला तर कोणाला माहिती असण्याचेही काही कारण नाही. पण तरीही अशी आत्मकथने सर्वसामान्यांना जगण्याचे व संघर्षाशी सामना करण्याचे बळ देतात हे नक्की. तारा रावत यांनी लिहिलेले आणि उद्वेली बुक्सने प्रकाशित केलेले 'अशी मी अशी मी' हे आत्मकथन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
गरीबी, जीवनातील अस्थिरता, अनाथपण तारा रावत यांच्या वाट्याला आले. पण या सगळ्यामुळे त्या खचून गेल्या नाहीततर धीराने त्यांनी आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला तोंड दिले. आपला हा जीवनप्रवास त्यांनी या पुस्तकात उलगडला आहे. या प्रवासातील विविध आठवणी, महत्वाचे प्रसंग, जीवनात आलेल्या व्यक्ती या सगळ्याबद्दल यात सांगितले आहे.
मंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. उषा देशमुख यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. प्रस्तावनेत डॉ. देशमुख लिहितात, माझ्या स्नेही व ज्येष्ठ कथाकार गिरिजा कीर यांच्यामुळे हे आत्मकथन माझ्या वाचनात आले. वर्तमानकाळात राहून भूतकाळाचा शोध घेण्याचा तारा रावत यांचा हा प्रयत्न आहे. निर्मळ मन, पारदर्शक विचार आणि आशावादी दृष्टीकोन हा या चिंतनाचा गाभा आहे. 'स्व'पासून तटस्थ होत आणि 'स्व'मध्ये विरघळून जात त्यांनी आपलेच रुप आपल्याच आत्मदर्पणात शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आत्मशोध व व्यक्तिशोध यातील ताणांमधून 'अशी मी अशी मी' उभी राहते.
उद्वेली बुक्स-०२२-२५८१०९६८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा