गुरुवार, २ मार्च, २०१७

महापौर निवासस्थानी स्मारक नकोच


ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महापौर निवासस्थानी स्मारक नकोच

'हेरिटेज वास्तू'असलेल्या मुंबई महापौरांच्या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कशासाठी? मुंबईत अन्यत्र भूखंड घेऊन किंवा शिवसेना भवन येथेही स्मारक उभारता येऊ शकते. बाळासाहेब ठाकरे हे कधीही महापौर निवास येथे राहायला नव्हते. त्यामुळे महापौर निवासातच त्यांचे स्मारक झाले पाहिजे असे नाही.

महापौर निवासस्थान ही हेरिटेज वास्तू (ऐतिहासिक वारसा लाभलेली) आहे. मुंबईचा प्रथम नागरिक अर्थात महापौर यांचे ते अधिकृत निवासस्थान आहे. उद्या अन्य राजकीय पक्षांनी मुंबईतील अशा हेरिटेज वास्तू असलेल्या ठिकाणी दुसऱया कोणाचे स्मारक करावे, अशी मागणी केली तर? त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंमध्ये कोणाचेही स्मारक केले जाऊ नये.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी ठरविले तर ते मुंबईत अगदी दादर किंवा वांद्रे येथे स्वतंत्र भूखंड घेऊन त्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारु शकतात. तेवढी आर्थिक ताकद या मंडळींची नक्कीच आहे. तसेच आवाहन केले तर सर्वसामान्य शिवसैनिकही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आर्थिक मदत नक्कीच करतील. त्यामुळे पैशांअभावी स्मारक रखडले किंवा उभारता येणे शक्य नाही, असे होणारच नाही. पण त्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्ती मात्र हवी आणि महापौर निवासस्थानीच स्मारक उभारण्याचा हट्ट सोडून देण्याची गरज आहे. महापालिकेत आज अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. समजा पालिकेत कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीची सत्ता अगदी भाजपची सत्ता असती आणि त्यांनी त्यांच्या कोणा नेत्याचे स्मारक महापौर निवासात करावे, अशी मागणी केली असती तर तेव्हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची काय भूमिका राहिली असती? त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता, राजकारण न करता पठिंबा दिला असता? की तेव्हा त्यांची भूमिका वेगळी राहिली असती?

'मातोश्री' या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. खरे तर याच ठिकाणी त्यांचे स्मारक होणे अधिक उचित ठरेल असे वाटते. भावनेचाच विचार केला तर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठीचे सगळ्यात पहिले प्राधान्य 'मातोश्री' येथेच असायला पाहिजे. त्यानंतर शिवसेना भवनाचाही विचार व्हावा. नाहीतर स्वतंत्र भूखंड घेऊन तिथे स्मारक उभे केले जावे. पण कोणत्याही परिस्थीतीत केवळ मुंबईतच नव्हे तर कुठेही ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूत कोणाही राजकीय नेत्याचे स्मारक केले जाऊ नये असे वाटते.

-शेखर जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: